आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
एम्स, गुवाहाटीच्या पहिल्या तुकडीच्या शुभारंभाच्या समारंभाच्या अध्यक्षपदी आरोग्य मंत्री डॉ हर्ष वर्धन
“देशात दुसऱ्या एम्सची संकल्पना जन्माला येण्यासाठी सुमारे 50 वर्षे आणि अटलबिहारी वाजपेयींचे शासन येण्याची प्रतीक्षा करावी लागली”-डॉ हर्ष वर्धन
“देशातील विविध भागातल्या एम्स मुळे परवडणाऱ्या आरोग्य व्यवस्थांमधली ‘दरी’कमी होण्यास मदत, देशातील सर्वसामान्य जनता निरोगी, सुदृढ करण्याचे दीर्घकालीन उद्दिष्ट
प्रविष्टि तिथि:
12 JAN 2021 8:02PM by PIB Mumbai
एम्स गुवाहाटीच्या एमबीबीएस च्या पहिल्या तुकडीचा आज शुभारंभ झाला. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे देखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

त्याशिवाय, आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल, आरोग्य मंत्री डॉ हेमंत बिस्वसर्मा ही या कार्यक्रमाला उपस्थित होते.
डॉ हर्ष वर्धन यांनी यावेळी एमबीबीएसच्या पहिल्या तुकडीतील विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पंतप्रधानांच्या ‘सर्वांसाठी आरोग्य’ या संकल्पनेचे स्मरण करुन देत, एम्स गुवाहाटीची निर्मिती प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेच्या पाचव्या टप्प्यात करण्यात आली आहे, असे सांगितले. पंतप्रधान मोदी, अटलबिहारी वाजपेयी यांचे काम पुढे नेत आहेत. वाजपेयी यांच्या काळातच तब्बल 50 वर्षांनी देशात दुसरे एम्स स्थापन करण्याची संकल्पना जन्माला आली, असे हर्ष वर्धन यांनी सांगितले. देशाच्या विविध भागात एम्सची स्थापना करण्यामागचा हेतू परवडणाऱ्या आरोग्य सुविधा मिळण्यातली दरी कमी करणे हा असून, दीर्घकालीन उद्दिष्ट ‘संपूर्ण भारताला निरोगी, सुदृढ बनवणे’ हे आहे, असे हर्ष वर्धन म्हणाले.
या एम्समुळे आसाममधील जनतेला उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध होतील याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. 750 खाटा असलेल्या या रुग्णालयात सुपर स्पेशालिटी विभाग असेल. या एम्ससाठी 1123 कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले. केंद्र आणि आसाम सरकारच्या देखरेखीखाली लवकरात लवकर एम्सच्या उभारणीचे काम पूर्ण होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
जागतिक आरोग्य संघटनेने निश्चित केलेले, ‘एक हजार रूग्णांमागे एक डॉक्टर’ हे गुणोत्तर गाठण्याचे लक्ष्य या वर्षातच पूर्ण केले जाईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. 2013-14 च्या शैक्षणिक वर्षापासून, सहा नवे एम्स सुरू झाले असल्यामुळे एम्समधील एमबीबीएस च्या जागा 600 पर्यंत वाढल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. गुवाहाटी च्या नव्या एम्समुळे देशभरातील सरकारी वैद्यकीय संस्थांमधील एमबीबीएसच्या जागा 42,545 पर्यंत वाढतील, असेही त्यांनी सांगितले. या जागा 80,000 पर्यंत वाढवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे, असे ते म्हणाले.
कोविडच्या काळात सर्व डॉक्टरांनी आणि वैद्यकीय कर्मचार्यांनी अथकपणे दिलेल्या सेवेबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. देश त्यांचा कायम ऋणी राहील असे हर्ष वर्धन म्हणाले.
अश्विनी कुमार चौबे यांनी या समारंभ स्वामी विवेकानंद आणि युवाशक्तीला समर्पित केला. देशात सुपर स्पेशालिटी रुग्णालयांचे विकेंद्रीकरण व्हावे आणि सर्वांना आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सरकार काम करत आहे, असे त्यांनी सांगितले.
****
Jaydevi P.S/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1688045)
आगंतुक पटल : 183