पंतप्रधान कार्यालय

16व्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

Posted On: 09 JAN 2021 9:30PM by PIB Mumbai

 

नमस्कार!

देश-विदेशात वास्तव्य करीत असलेल्या माझ्या सर्व भारतीय बंधू आणि भगिनींनो

नमस्कार ! आपल्या सर्वांना 2021 या नववर्षाच्या खूप-खूप शुभेच्छा!

आज जगभरातल्या कानाकोप-यातून आपण भलेही इंटरनेटच्या माध्यमातून जोडलेलो असलोतरीही आपल्या सर्वांचे मन सदोदित भारत मातेबरोबर जोडलेले असते. एकमेकांविषयी आपलेपणाच्या भावनेने आपण सर्वजण जोडले आहोत.

 

मित्रांनो,

संपूर्ण विश्वामध्ये भारत मातेचा गौरव वृद्धिंगत करणा-या तुम्हा सर्व सहका-यांना प्रत्येक वर्षी प्रवासी भारतीयाचा सन्मान देण्याची परंपरा आहे. भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या मार्गदर्शनाखाली या यात्रेला प्रारंभ झाला होताआत्तापर्यंत वेगवेगळ्या 60 देशांमध्ये वास्तव्य करीत असलेल्या जवळपास 240 सन्माननीय  व्यक्तींना हा सन्मान देण्यात आला आहे. यावेळीही या सन्मानाची घोषणा करण्यात येईल. याचप्रमाणे संपूर्ण जगभरातून हजारो मित्रांनी भारताला जाणून घ्या या प्रश्न मंजूषेमध्ये भाग घेतला आहे. या संख्येवरूनच लक्षात येते की, आपण जरी भारतापासून दूर वास्तव्य करीत आहात तरीही नवीन पिढी तितक्याच आपुलकीने भारताशी जोडली गेली आहे.

या प्रश्नमंजूषेमधील 15 विजेतेही आज या आभासी समारंभामध्ये आपल्यामध्ये उपस्थित आहेत. सर्व विजेत्यांचे मी अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. त्याचबरोबर या प्रश्नमंजूषेमध्ये सहभागी होणारे सर्वजण अभिनंदनास पात्र आहेत, असे मला वाटते. या प्रश्नमंजूषेमध्ये भाग घेणा-या सर्वांना माझा आग्रह आहे की, पुढच्यावर्षी ज्यावेळी अशी प्रश्नमंजूषा आयोजित करण्यात येईल, त्यावेळी नवीन 10 लोक यामध्ये सहभागी होतील यासाठी आपण जरूर प्रयत्न करावा, तसा आपण एक निश्चयच करावा.  ही साखळी अशीच बनली आणि वाढली पाहिजे. लोकांना आपण जोडले पाहिजे.  परदेशातले अनेक लोक भारतामध्ये शिकण्यासाठी येतात, शिक्षण पूर्ण करून त्यांच्या मायदेशी परत जातात. त्यांनाही आपण आग्रह करून अशा प्रश्नमंजूषेमध्ये सहभागी केले पाहिजे. अशा प्रश्नमंजूषेच्या माध्यमातून त्यांना भारताशी जोडून ठेवले पाहिजे. हेच लोक प्रश्नमंजूषेचे सदिच्छादूत -अॅम्बेसेडर बनले पाहिजेत. कारण विश्वामध्ये भारताचा परिचय निर्माण करण्यासाठी नवीन पिढीला भारताविषयी जाणून घेण्याची जिज्ञासा जागृत करण्यासाठी तंत्रज्ञानाधारित हा अतिशय सोपा उपाय आहे. आणि म्हणूनच माझा आग्रह आहे की, आपण सर्वांनी ही गोष्ट जरूर पुढे न्यावी.

 

मित्रांनो,

गेले वर्ष आपल्या सर्वांसाठी अतिशय आव्हानांचे, समस्यांचे वर्ष होते. परंतु या आव्हानांमध्येही विश्वभरातल्या आमच्या भारतीय समूहाने ज्या पद्धतीने कार्य केले आहे, आपले कर्तव्य पार पाडले आहे, ही गोष्ट भारतासाठीही गर्वाची- अभिमानाची बाब आहे. हीच तर आपली परंपरा आहे. हेच तर या मातीचे संस्कार आहेत. या स्थानावरून सामाजिक आणि राजकीय नेतृत्वासाठी विश्वभरामध्ये मूळ भारतीय वंशाच्या मित्रांवर भरवसा अधिक मजबूत होत आहे.

आपल्या आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी, सूरीनामचे नवीन राष्ट्रपती चंद्रिकाप्रसाद संतोखी, हे स्वतःही या सेवाभावाचे एक उत्कृष्ट उदाहरण आहेत, असे  मी मानतो.  या कोरोना काळामध्ये विदेशांमध्ये राहणा-या आमच्या अनेक भारतीय बंधू-भगिनींनीही आपले प्राण गमावले आहेत. त्यांच्याविषयी माझ्या मनात सहसंवेदना आहेत आणि त्यांच्या कुटुंबियांना परमात्म्याने खूप शक्ती द्यावी, अशी मी प्रार्थना करतो. आज सूरीनामच्या राष्ट्रपतींच्या  अतिशय उत्साही शब्दांमुळे आणि भारताविषयी त्यांना असलेला स्नेहभाव जाणून घेणे, सर्वांच्या दृष्टीने हृदयस्पर्शी अनुभव आहे. त्यांच्या प्रत्येक शब्दामधून, त्यांच्या प्रत्येक भावातून भारताविषयीच्या त्यांच्या भावना प्रकट होत होत्या. त्यांच्या स्नेहल भावना सर्वांना प्रेरणा देत होत्या. त्यांच्याप्रमाणेच , मीही आशा करतो की, आपण लवकरच भेटू! आणि आम्हाला भारतामध्ये सूरीनामच्या राष्ट्रपतींचे भव्य स्वागत करण्याची संधीही मिळेल. गेल्या वर्षामध्ये प्रवासी भारतीयांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली स्वतंत्र ओळख अधिक मजबूत केली आहे.

 

मित्रांनो,

गेल्या काही महिन्यांमध्ये माझी अनेक देशांच्या प्रमुखांबरोबर चर्चा झाली आहे. अनेक राष्ट्रप्रमुखांनी काही गोष्टींचा आवर्जुन उल्लेख केला की, त्यांच्या देशांमध्ये असलेले प्रवासी भारतीय डॉक्टर्स, निमवैद्यकीय कर्मचारी आणि सामान्य भारतीय नागरिक यांनी कशा प्रकारे सेवा केली. मग ते मंदिर असो, आमचे गुरूव्दारा असो, सर्व सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक संघटनांनी सेवाभावनेने कार्य केले आहे. प्रत्येक नागरिकाची सेवा करण्याचे काम अशा कठिण परिस्थितीमध्येही केले आहे. या गोष्टी विश्वातल्या प्रत्येक देशामधून मला ऐकायला मिळतात, त्यावेळी मला किती अभिमान वाटतो, याचा आपण केवळ अंदाज बांधू शकता. ज्यावेळी फोनवर मी तुम्हा लोकांचे कौतुक, प्रशंसा ऐकत होतो आणि जगताला प्रत्येक नेता बराच वेळ तुमचेच गुणगान करत होता, आणि ही गोष्ट ज्यावेळी मी आपल्या सहका-यांनाही सांगत होतो, त्या प्रत्येकाला आनंद होत असे, त्याला गौरव वाटत असे. आपले हे संस्कार संपूर्ण विश्वात प्रत्येक कानाकोप-यापर्यंत पोहोचत आहेत. कोणा भारतीयाला या गोष्टीचा आनंद होणार नाही? आपण सर्वांनी, जिथे कुठे आपण वास्तव्य करीत आहात, तिथेच नाही तर भारतामध्ये, भारताचा कोविडविरुद्ध सुरू असलेल्या लढ्यामध्ये सर्व प्रकारे सहकार्य केले आहे. पीएम केअर्समध्ये  आपण जे योगदान दिले, त्याचा उपयोग भारतामध्ये आरोग्याच्या पायाभूत सुविधा सशक्त करण्यासाठी केला जात आहे. यासाठी मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो.

 

मित्रांनो,

भारताचे महान संत आणि दार्शनिक-तत्वज्ञ संत तिरूवल्लुवर यांनी विश्वातल्या सर्वात प्राचीन भाषेमध्ये, आणि आपल्या सर्वांना अभिमान वाटावा, जगातल्या सर्वात प्राचीन भाषेत म्हणजे तमिळमध्ये म्हटले आहे की -

केए- डरीयाक केट्टअ इड्डत्तुम वड़न्गुन्ड्रा।

नाडेन्प नाट्टिन तलई।

याचा भावार्थ असा आहे की जगाची सर्वश्रेष्ठ भूमी ती आहे, जी आपल्या विरोधकांकडून वाईटपणा शिकत नाही आणि जर कधी कष्टाचा काळ आला तर इतरांचे कल्याण करताना कोणतीही कमतरता ठेवत नाही.

 

मित्रांनो,

तुम्ही हा मंत्र प्रत्यक्षात जगून दाखवला आहे. आपल्या भारताचे नेहमी हे वैशिष्ट्य राहिले आहे. शांतीचा काळ असो अथवा संकटाचा काळ, आपण भारतीयांनी प्रत्येक परिस्थितीशी नेहमीच ठाम राहून दोन हात केले आहेत. याच कारणाने या महान भूमीविषयी एक वेगळा व्यवहार आपण पाहिला आहे. ज्यावेळी भारताने वसाहतवादाच्या विरोधात आघाडी उघडली, त्यावेळी जगभारतल्या अनेक देशांना स्वातंत्र्यासाठी संघर्ष करण्याची प्रेरणा मिळाली. ज्यावेळी भारत दहशवादाच्या विरोधात  उभा राहिला, त्यावेळी दुनियेलाही या समस्येच्याविरोधात लढण्याचे नवीन धाडस मिळाले.

 

मित्रांनो,

भारत आज भ्रष्टाचार संपुष्टात आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करीत आहे. लाखों, कोट्यवधी रूपये, जे आधी कार्यप्रणालीतल्या पळवाटांमुळे चुकीच्या हातांमध्ये जात होते, ते आता थेट लाभार्थींच्या बँक खात्यांमध्ये जमा होत आहेत. आपण पाहिले असेल, भारताने जी नवीन व्यवस्था विकसित केली आहे, त्यांची कोरोना काळामध्ये विश्व स्तरावरील संस्थांनी खूप मोठ्या प्रमाणावर प्रशंसा केली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाने गरीबातल्या गरीबाला सक्षम करण्याचे अभियान आज भारतामध्ये सुरू आहे. त्याची चर्चा संपूर्ण जगभरातल्या कानाकोप-यात , प्रत्येक स्तरावर होत आहे.

 

बंधू आणि भगिनींनो,

नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रामध्ये विकसनशील जगतातील कोणीही देश नेतृत्व करू शकतो, हे आम्ही दाखवून दिले आहे. आज भारताने दिलेला वन सन, वन वर्ल्ड, वन ग्रिडहा मंत्र दुनियेलाही आवाहन करीत आहे.

 

मित्रांनो,

भारतीय इतिहास साक्षीदार आहे जेव्हा कधी भारताचे सामर्थ्‍य , भारतीयांचे सामर्थ्‍य यांच्याविषयी कोणी शंका उपस्थित केलीत्यावेळी त्या सर्व शंका चुकीच्या सिद्ध झाल्या आहेत. गुलामीच्या काळामध्ये विदेशामध्ये महान विव्दान सांगत होते की, भारत स्वतंत्र होऊ शकणार नाही, कारण हा देश खूप विभागला आहे. ही शंका चुकीची सिद्ध झाली आणि आपण स्वतंत्र झालो.

 

मित्रांनो,

ज्यावेळी भारताला स्वातंत्र्य मिळाले, त्यावेळी असेही सांगितले की, इतका गरीब आणि इतका कमी शिकलेला भारत आहे. या भारताचे तुकडे होणार, भारत विखरून जाणारया देशात लोकशाही नांदणे केवळ अशक्य आहे. आजचे सत्य हेच आहे की, भारत एकजूट तर आहेच आहे  आणि दुनियेमध्ये सर्वात मजबूत लोकशाही असलेला हा देश आहे. भारताची लोकशाही जीवंत आहे.

 

बंधू आणि भगिनींनो,

स्वातंत्र्यानंतरही अनेक दशकांपर्यंत भारताविषयी असेच बोलले जात होते. भारत गरीब-अशिक्षित आहे, त्यामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये गुंतवणुकीच्या शक्यता अतिशय कमी आहेत. आज भारताचा अंतराळ कार्यक्रम, आमच्याकडची तांत्रिक स्टार्टअप परिसंस्था संपूर्ण जगामध्ये अग्रणी आहे. कोविडच्या आव्हानात्मक वर्षामध्येही अनेक नवीन युनिकॉर्न आणि शेकडो नवीन तांत्रिक स्टार्टअप्स भारतामध्येच तयार झाले आहेत.

 

मित्रांनो,

महामारीच्या या काळामध्ये भारताने पुन्हा एकदा दाखवून दिले की, आमचे किती सामर्थ्‍य आहे. आमच्याकडे किती अमर्याद  क्षमता आहेत. इतका मोठी लोकशाहीवादी देश ज्या एकजूटतेने ठामपणाने उभा राहिला, असे उदाहरण अवघ्या दुनियेत दिसणार नाही. पीपीई संच असो, मास्क असो, व्हँटिलेटर्स असो, चाचणी संच असो आधी या सर्व गोष्टी भारताला बाहेरून मागवाव्या लागत होत्या. आज या कोरोना काळामध्येच भारताने आपली ताकद वाढवली आणि आज भारताने फक्त यामध्ये आत्मनिर्भरता साध्य केली असे नाही, तर यापैकी अनेक उत्पादनांची निर्यातही आपला देश करायला लागला आहे. आज भारत दुनियेतल्या सर्वात कमी मृत्यूदर असलेल्या आणि सर्वात वेगाने कोरोनामुक्तांचे प्रमाण वाढणा-या देशांपैकी एक आहे.

आज भारत, एक नाही तर दोन स्वदेशात निर्माण केलेल्या कोरोनाविरोधी लसींच्या मदतीने मानवतेच्या सुरक्षेसाठी सज्ज आहे. दुनियेसाठी औषधनिर्मितीचे केंद्र भारत बनल्यामुळे या नात्याने दुनियेतल्या प्रत्येक गरजवंतापर्यंत  त्याला आवश्यक असलेले औषध पोहोचवण्याचे काम भारताने याआधीही केले आहे आणि आजही करीत आहे. दुनियेत आज फक्त भारताच्या लसीची सर्वजण वाट पाहताहेत असे नाही तर दुनियेतला सर्वात मोठा लसीकरणाचा कार्यक्रम भारतामध्ये कशा पद्धतीने राबविण्यात येणार आहे, यावरही सर्वांच्या नजरा खिळून आहेत.

 

मित्रांनो,

या वैश्विक महामारीच्या काळामध्ये भारताने जे काही शिकले आहे, ते आता आत्मनिर्भर भारत अभियानासाठी प्रेरणा बनत आहे. आपल्याकडे असे म्हटले आहे की -

शतहस्त समाह सहस्त्रहस्त सं किर

याचा अर्थ असा आहे की, शेकडो हातांनी अर्जित करावे मात्र हजारो हातांनी वाटावे! आत्मनिर्भरता संकल्पनेच्या मागे हाच भाव आहे. करोडो भारतीयांच्या परिश्रमातून जे उत्पादन भारतामध्ये बनेल, जो पर्याय भारतामध्ये तयार होईल, त्याचा संपूर्ण दुनियेला लाभ मिळेल. ज्यावेळी वाय-2 केसमस्या निर्माण झाली होती, त्यावेळी भारताची भूमिका काय होती, भारताने संपूर्ण जगाला कशा प्रकारे चिंतामुक्त केले, या गोष्टी जग कधीच विसरू शकणार नाही. या संकटाच्या काळातही आमच्या औषध उद्योगाची भूमिका हेच दाखवते की, भारत कोणत्याही क्षेत्रामध्ये समर्थ होतो आणि  त्याचा लाभ संपूर्ण दुनियेला मिळतो.

 

मित्रांनो,

आज संपूर्ण जगाचा भारतावर इतका जास्त विश्वास आहे, यामध्ये तुम्हा सर्व प्रवासी भारतीयांचेही खूप मोठे योगदान आहे. तुम्ही जिथे कुठे गेलात, भारताला, भारतीयत्वाला बरोबर घेवून गेले आहात. तुम्ही भारतीयत्व जपत, जगत राहिले आहात. तुम्ही भारतीयत्वाने लोकांना जागृतही करीत आहात. आणि तुम्ही जरूर पहा, खाद्यपदार्थ असो, फॅशन असो, कौटुंबिक मूल्ये असो अथवा व्यावसायिक मूल्ये असो तुम्ही भारतीयत्वाचा प्रसार केला आहे. मला नेहमी असे वाटते की, भारताची संस्कृती जर संपूर्ण दुनियेमध्ये लोकप्रिय झाली तर नियतकालिके, पाककलेची पुस्तके, इतर लिखित साहित्य यापेक्षाही जास्त आपल्या सर्वांच्या जीवनाचे कारण, आपल्या सर्वांच्या आचरणाचे कारण, आपल्या सर्वांच्या व्यवहाराचे कारण हेच असणार आहे. भारताने कधीही, काहीही कोणतीही गोष्ट दुनियेवर थोपवली नाही की थोपविण्यासाठी प्रयत्नही केले नाहीत. इतकेच काय भारताने काही थोपविण्यासाठी  साधा विचारही केला नाही. उलट दुनियेत आपण सर्वांनी भारतासाठी एक जिज्ञासा, उत्सुकता निर्माण केली. एक रस निर्माण केला आहे. मग भले आधी त्याचा प्रारंभ कौतुकातून झाला आहे. परंतु आता ही उत्सुकता एका निश्चित मतापर्यंत पोहोचली आहे.

आज ज्यावेळी भारत, आत्मनिर्भर बनण्यासाठी पुढे जात आहे, त्यावेळी इथेही ब्रँड इंडियाची ओळख मजबूत करण्यासाठी आपली भूमिका महत्वपूर्ण आहे. ज्यावेळी आपण मेड इन इंडियाचे उत्पादने जास्तीत जास्त वापरणार आहे, त्यावेळी तुमच्या आजूबाजूला वास्तव्य करीत असलेल्या लोकांनाही त्या उत्पादनांविषयी विश्वास वाटणार आहे. तुमचे सहकारी, तुमची मित्रमंडळी, तुम्ही मेड इन इंडियाची उत्पादने वापरताना पाहतील, त्यावेळी तुम्हाला त्याचा गर्व-अभिमान वाटणार नाही का? चहापासून ते वस्त्रप्रावरणापर्यंत आणि औषधोपचारापासून ते काहीही भारतीय असू शकते. ज्यावेळी खादीविषयी दुनियेमध्ये आकर्षण निर्माण होते, त्यावेळी मला तर खूप आनंद होतो. यामुळे तुमची भारताच्या निर्यात क्षेत्राचा विस्तार करण्यासाठी मदत होणार आहे. त्याचबरोबर भारताची संपन्नता, समृद्ध विविधता दुनियेमध्ये पोहोचणार आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, आत्मनिर्भर भारत अभियानामध्ये तुम्ही दुनियेतल्या गरीबात गरीबापर्यंत परवडणा-या आणि उत्तम दर्जाचा पर्याय पोहोचविण्याचे माध्यम बनणार आहात.

 

मित्रांनो,

भारतामध्ये गुंतवणूक असो अथवा खूप मोठ्या प्रमाणावर निधी पाठविण्यासाठी दिलेले योगदान असो, आपला जो सहभाग असतो, तो अमूल्य असतो. तुमच्याकडे असलेले तज्ज्ञ, तुमची गुंतवणूक, तुमचे नेटवर्क, तुमचा अनुभव यांचा लाभ प्रत्येक भारतीयाच्या दृष्टीने, संपूर्ण हिंदुस्तानमध्ये नेहमीच गौरवाचा विषय आहे. असा लाभ घेण्यासाठी ते नेहमीच आतुरही असतात. यासाठी आवश्यक पावलेही उचलण्यात येत आहेत. त्यामुळे तुम्हाला संधी मिळेल आणि इथल्या लोकांच्या अपेक्षाही पूर्ण होवू शकणार आहेत.

आपल्यापैकी अनेक लोकांना माहिती आहे की, काही आठवड्यांपूर्वी पहिल्यांदाच वैश्विक भारतीय वैज्ञानिक परिषद म्हणजे वैभवचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनामध्ये 70 देशातल्या 25 हजारांपेक्षा जास्त वैज्ञानिक आणि तज्ज्ञ जवळपास सातशे तासांपर्यंत चर्चा करीत होते. आणि त्यामुळे विविध 80 विषयांवर जवळपास 100 अहवाल तयार करण्यात आले. यामुळे अनेक क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञान आणि कार्यप्रणाली विकसित करण्याचे काम करणे शक्य होणार आहे. असा संवाद आता अशाच प्रकारे पुढेही सुरू राहणार आहे. याशिवाय गेल्या महिन्यात भारताने शैक्षणिक विषयापासून ते उद्योगांमध्ये सार्थक परिवर्तन घडवून आणण्यासाठी संरचनात्मक सुधारणा केल्या आहेत. यामुळे आपल्याला गुंतवणूकीसाठी मिळणा-या संधींचा विस्तार झाला आहे. उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी उत्पादनाशी निगडीत अनुदान योजना अतिशय लोकप्रिय झाली आहे, आणि अतिशय कमी कालावधीत ही योजना लोकप्रिय झाली आहे. आपणही तिचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेवू शकता.

 

मित्रांनो,

भारत सरकार प्रत्येक वेळी, प्रत्येक क्षणी आपल्याबरोबर आहे. आपल्या बरोबरीने ठाम उभे आहे. संपूर्ण दुनियेत कोरोना काळामध्ये विदेशात लॉकडाउनमध्ये अडकलेल्या 45 लाखांपेक्षा जास्त भारतीयांना वंदे भारत अभियानातून मायदेशी आणण्यात आले. विदेशांमध्ये भारतीय समुदायाला वेळेवर योग्य मदत मिळावी, यासाठी सरकारने सर्वतोपरी प्रयत्न केले. महामारीमुळे विदेशातल्या भारतीयांचा रोजगार सुरक्षित रहावा, यासाठी दुतावासाच्या स्तरावरून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले.

आखातासहित अनेक देशांमधून परतलेल्या मित्रांसाठी स्किल्ड वर्कर अराव्हल डाटाबेस फॉर एम्प्लॉयमेंट सपोर्टम्हणजेच स्वदेसया नावाने एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. या माहितीच्या आधारे वंदे भारत मिशनमधून परतलेल्या श्रमिकांना त्यांच्या कौशल्याप्रमाणे काम मिळावे, तसेच त्यांना भारतीय आणि विदेशी कंपनी यांच्याबरोबर जोडून देण्याचे काम सुरू आहे.

याच पद्धतीने दुनियाभरातल्या  भारतीय समुदायांबरोबर चांगली संपर्क यंत्रणा निर्माण करण्यासाठी रिश्ताया नावाने नवीन पोर्टलचा प्रारंभ केला आहे. या पोर्टलच्या मदतीने संकटाच्या काळामध्ये आपल्या समुदायाबरोबर संपर्क साधणे, त्यांच्यापर्यंत वेगाने पोहोचणे सोपे जाणार आहे. या पोर्टलचा दुनियाभरातले आमचे सहकारी, तज्ज्ञ भारताच्या विकासासाठी मदत करण्यासाठी उपयोग  करू शकणार आहे.

 

मित्रांनो,

आता आपण स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षाकडे वाटचाल करीत आहोत. यानंतरचा प्रवासी भारतीय दिवस म्हणजे स्वातंत्र्याच्या 75व्या कार्यक्रमाशी जोडलेला असेल. महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि स्वामी विवेकानंद यांच्यासारखे अगणित महान व्यक्तित्वांकडून प्रेरणा घेवून दुनियाभरातल्या भारतीय समुदायाने स्वातंत्र्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे. अशावेळी ज्यांनी भारताच्या स्वांतत्र्यासाठी काम केले, त्या सर्व नेत्यांची, त्या सर्व सेनानींचे स्मरण करणे गरजेचे आहे.

संपूर्ण विश्वभरामध्ये विखुरलेल्या सर्व भारतीय समुदायाच्या लोकांना, आमच्या मिशनमध्ये सहभागी होत असलेल्या लोकांना माझा असा आग्रह असणार आहे की, आपण एक डिजिटल मंच तयार करावा, एक पोर्टल तयार करावे, आणि त्या पोर्टलवर ज्या ज्या भारतीयांनी स्वातंत्र्याच्या लढ्यात विशेष भूमिका बजावली आहे, त्याची सर्व माहिती, तथ्ये नमूद करावीत. ज्यांच्याकडे छायाचित्रे उपलब्ध आहेत, त्यांनी तीही तिथे द्यावीत, संपूर्ण जगामध्ये कोणी, काय केले, कसे केले या गोष्टींचे वर्णनही द्यावे. प्रत्येक भारतीयाच्या पराक्रमाचे, पुरूषार्थाचे, त्यागाचे, बलिदानाचे, भारत मातेच्याविषयी त्याच्या भक्तीचे गुणगान केले जावे. त्यांची जीवनगाथा असो, ज्यांनी विदेशात राहूनही भारताला स्वातंत्र्य मिळावे, यासाठी योगदान दिले, याची नोंद पोर्टलवर जरूर करावी.

आणि मला तर असेही वाटते की, आत्ता जशी प्रश्नमंजूषा झाली, तशीच वेगळा विषय म्हणून विश्वभरातल्या अशा भारतीय समुदायाच्या योगदानाविषयीही प्रश्नमंजूषा तयार करण्यात यावी. पाचशे, सातशे, हजार लोकांपर्यंत ही माहिती पोहोचावी. या प्रश्नांमुळे  विश्वभरांमध्ये विखुरलेल्या भारतीयांविषयीजिज्ञासू लोकांसाठी ज्ञानाचे एक खूप चांगले भंडार बनविण्यात यावे. अशी पावले आपल्यातील बंधन अधिक मजबूत करतील. भावी पिढ्यांना प्रेरणा देतील.

आपण सर्वजण इतक्या मोठ्या संख्येने आज आभासी माध्यमातून उपस्थित राहिला आहात. कोरोनाकाळामुळे प्रत्यक्ष संवाद साधणे शक्य झाले नाही. परंतु आपण स्वस्थ रहावे, आपण सुरक्षित रहावे, आपले आणि देशाचे नाव उज्ज्वल करावे अशीच इच्छा भारताच्या प्रत्येक नागरिकाची नेहमीच असणार आहे.

या भावनेबरोबरच मी पुन्हा एकदा सूरीनामचे राष्ट्रपतींचे अगदी मनापासून आभार व्यक्त करतो.  त्यांना आपल्या सर्वांना जी प्रेरणा दिली आहे, त्यांच्यासारखे महापुरूष  आपल्याबरोबर जोडले गेले आहेत, ही गोष्ट भारताचा गौरव खरोखरीच वाढविणारी आहे. मी त्यांनाही विशेष धन्यवाद देतो. आणि या कामनेबरोबरच आपल्या सर्वांना खूप-खूप धन्यवाद!

-----

S.Mhatre/S.Bedekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1687295) Visitor Counter : 287