शिक्षण मंत्रालय

आयआयएम संबलपूरच्या स्थायी परिसराचा पंतप्रधानांच्या हस्ते शिलान्यास


विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर भारत मोहिमेत योगदान द्यावे-पंतप्रधानांचे आवाहन

Posted On: 02 JAN 2021 6:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 जानेवारी 2021


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आयआयएम संबलपूरच्या स्थायी परिसराचा शिलान्यास  केला. दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमाला ओडिशाचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’, धमेंद्र प्रधान आणि प्रतापचंद्र सरंगी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आयआयएम संबलपूरचा स्थायी परिसर ओडिशाची संस्कृती आणि स्त्रोत यांचे फक्त दर्शन घडवणाराच आहे असे नाही तर, व्यवस्थापनाच्या क्षेत्रामध्ये ओडिशाला जागतिक मान्यता मिळवून देणारा आहे. अलिकडे देशात नवीन कल निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. त्यानुसार बाहेरच्या बहुराष्ट्रीय गोष्टींचा भारतात तितका स्वीकार केला जात नाही मात्र भारतीयांच्या बहुराष्ट्रीय बनण्याला प्राधान्य दिले जात आहे. अलिकडच्या संकटाच्या काळामध्ये  दुस-या आणि तिस-या दर्जाच्या शहरांमध्ये स्टार्टअप्स  आणि ‘युनिकॉर्न’ पहिल्यापेक्षा तिप्पट वेगाने निर्माण होत आहेत. कृषी क्षेत्रामध्ये झपाट्याने सुधारणा होत आहेत. अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्‍यांनी आपल्या करिअरची म्हणजे कारकिर्दीची आखणी करताना देशाच्या आकांक्षापूर्तीचा विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले. नवीन दशकामध्ये ‘ब्रँड इंडिया’ला संपूर्ण जगभरामध्ये मान्यता मिळवून देणे ही तुम्हा विद्यार्थ्‍यांची जबाबदारी असल्याचेही पंतप्रधान मोदी  यांनी यावेळी सांगितले.

स्थानिक गोष्टींना जागतिक पातळीवर नेण्यामध्ये विद्यार्थी अतिशय महत्वाची भूमिका बजावतात, याकडे लक्ष वेधताना पंतप्रधान मोदी म्हणाले, संबलपूर परिसरातल्या स्थानिक गोष्टींमध्ये पर्यटनाच्या दृष्टीने असलेल्या अपार संभावना लक्षात घेऊन त्यावर विद्यार्थ्‍यांनी काम करावे. संबलपूरची स्थानिक उत्पादने, स्थानिक हस्तकला, वस्त्रोद्योग आणि आदिवासी कला यांना जागतिक बाजारपेठ निर्माण कशी करता येईल, याचा विचार करावा. तसेच इथल्या खनिज संपत्तीचे आणि या क्षेत्रातल्या इतर स्त्रोतांचे अधिकाधिक उत्तमतेने व्यवस्थापन कशा प्रकारे करता येईल, याचा विचार करावा. हे करतानाच आत्मनिर्भर भारत अभियानामध्ये योगदान देणे सर्वांना शक्य होणार आहे,  असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. आत्मनिर्भर मोहिमेमध्ये ‘लोकल’ गोष्टी ‘ग्लोबल’ करताना आयआयएमच्या विद्यार्थ्‍यांनी नवसंकल्पनाचा शोध घेण्याची आणि स्थानिक उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बनविण्यासाठी सेतू निर्माण करण्याचे कार्य करावे. आयआयएमच्या विद्यार्थ्‍यांनी व्यपस्थापनाची कौशल्ये विकसित करताना नवसंकल्पना, एकात्मता आणि सर्वसमावेशकता यांचा मंत्र म्हणून वापर करावा, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

आजच्या युगामध्ये व्यवस्थापन क्षेत्रातल्या नवीन आव्हानांविषयी आणि नवीन तंत्रज्ञानाविषयी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी थ्री डी तंत्रज्ञानाने वस्‍तू निर्मिती, बदलते उत्पादन तंत्रज्ञान, पुरवठा साखळी यांच्यावर प्रकाश टाकला. या नवीन तंत्रज्ञानामध्ये डिजिटल संपर्क यंत्रणा आणि कुठूनही काम करण्याची संकल्पना आता आली आहे, त्यामुळे संपूर्ण जग आता एका जागतिक खेड्यामध्ये रूपांतरीत झाले आहे. गेल्या काही महिन्यात भारतानेही या नव्या जगाप्रमाणे वेगाने सुधारणा घडवून आणल्या आहेत. असे बदल करण्याचे किंवा फक्त स्वीकारण्याचे काम भारताने केले नाही तर सर्वांना मागे टाकण्याच्या अपेक्षा ठेवून प्रयत्न केले आहेत, असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले.

काम करण्याची बदलती शैली लक्षात घेता त्यांचा व्यवस्थापन कौशल्यांवर आणि मागण्यांवरही परिणाम होत आहे. ‘टॉप -डाउन’ किंवा ‘टॉप- हेवी’ व्यवस्थापन कौशल्याची जागा आता सहयोग, नवसंकल्पना आणि परिवर्तनात्मक व्यवस्थापनाने घेतली आहे. सांगकामे आणि विशिष्ट-नियत कार्यपद्धतीची जागा आता तांत्रिक व्यवस्थापनाने घेतली आहे, त्याचबरोबर मानवी व्यवस्थापनालाही समान महत्व आले आहे, असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

भारतामध्ये ज्यापद्धतीने कोविडचे संकट हाताळण्यात आले, त्यावर विद्यार्थ्‍यांनी जरूर संशोधन करावे. या महामारीच्या काळामध्ये भारताने अतिशय मोठ्या प्रमाणावर नवसंकल्पना विकसित करून अनेक घटकांच्या सहकार्यांने त्या प्रत्यक्षात कशा आणल्या, याचा अभ्यास केला पाहिजे. इतक्या अल्पकाळामध्ये भारताने आपल्या क्षमता आणि कार्यकुशलता कशा विस्तारल्या, याचा सर्वांनी अभ्यास जरूर करावा, असे पंतप्रधानांनी आवाहन केले. देशातल्या लोकांनी आलेल्या प्रत्येक समस्येवर मात करण्यासाठी किती तातडीने उपाय योजना  केल्या, त्या आता दीर्घकालीन उपाय बनले आहेत, असे सांगून लोकांनी आपल्यातल्या अपार क्षमतांचा वापर केल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. हे सांगताना त्यांनी जनधन बँक खाते आणि एलपीजी जोडणीचे उदाहरण दिले. 2014 मध्ये अवघ्या 55 टक्के लोकांना या सुविधा मिळत होत्या. आज देशातल्या 98 टक्के लोकांना याचा लाभ मिळत आहे, असे त्यांनी नमूद केले. मोठ्या प्रमाणावर, जास्त संख्येने लोकांना कोणत्याही गोष्टीचा लाभ मिळावा यासाठी नवसंकल्पना, नियोजन आणि अंमलबजावणी महत्वाची असते असे सांगताना ते म्हणाले, व्यवस्थापन म्हणजे काही फक्त मोठ्या कंपन्या चालविणे असे नाही, तर व्यवस्थापन म्हणजे आयुष्याची, जीवनाची काळजी घेणे आहे.

चांगले व्यवस्थापक होण्यापूर्वी देशापुढे असलेली आव्हाने समजून घेण्याची आज आवश्यकता आहे. यासाठी उच्च शैक्षणिक संस्थांनी केवळ कौशल्यांवर लक्ष केंद्रित न करता कार्यव्याप्ती विस्तारली पाहिजे. याच गोष्टीवर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये भर देण्यात आला आहे. या नवीन धोरणामध्ये बहुशाखीय शिक्षणाचा व्यापक विचार करण्यात आला असून व्यावसायिक शिक्षणात सर्वांगीण दृष्टिकोणावर भर देण्यात आला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.

 

 

आयआयएम संबलपूरच्या स्थायी परिसराची उभारणी करण्यासाठीचा शिलान्यास आज झाल्याबद्दल केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी सर्वांचे अभिनंदन केले. देशाची वृद्धी आणि विकासात आयआयएमचे मोठे योगदान असेल असे निशंक यावेळी म्हणाले. विविध शिक्षणसंस्थांमध्ये तसेच, अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि व्यवस्थापकीय संस्थांमध्ये गेल्या सहा वर्षात जागांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे, अशी माहिती निशंक यांनी दिली.

जागतिक स्तरावर होत असलेल्या सुधारणा आणि बदलांबाबत विद्यार्थ्यांनी जागृत असावे असे त्यांनी म्हटले. जागतिक आव्हानांच्या गरजांनुसार आपली कौशल्ये वाढवत नेणे, ती अद्ययावत करणे सातत्याने सुरु ठेवले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भारताला विश्वगुरु बनवण्यासाठी, ‘नेशन फर्स्ट- कॅरेक्टर मस्ट’ म्हणजेच ‘राष्ट्र प्रथम-चरित्र्य उत्तम’ हा नारा घेऊन वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

हा ओडिशातील सर्वांसाठी ऐतिहासिक दिवस आहे, असे मत, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी व्यक्त केले. संबलपूर प्रदेश खनिज संपत्तीने समृध्द असलेला प्रदेश असून इथे अनेक आर्थिक घडामोडी घडत असतात. आयआयएम संबलपूर मुळे स्वयंउद्योगांसाठी पोषक असे वातावरण तयार होईल, ज्याचा लाभ आत्मनिर्भर भारताला मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


* * *

S.Thakur/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1685658) Visitor Counter : 220