संरक्षण मंत्रालय

‘एएनसी’वर नौदल दिन 2020

Posted On: 03 DEC 2020 10:37PM by PIB Mumbai

 

दरवर्षी 4 डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा केला जातो. भारतीय नौदलाच्या इतिहासामध्ये आणि आपल्या देशाच्या विजयामध्ये या ऐतिहासिक दिवसाचे अतिशय महत्व आहे. 1971च्या भारत-पाकिस्तान युद्ध काळामध्ये ऑपरेशन ट्रायडंटमोहिमेमध्ये भारतीय नौदलाच्या शूर जवानांनी पाकिस्तानच्या कराची किनारपट्टीवर तैनात करण्यात आलेल्या क्षेपणास्त्रवाहू नौका आणि तेलसाठे उद्ध्वस्त करून राष्ट्राला विजय मिळवून दिला होता. 1971 च्या या मोहिमेमध्ये भारतीय नौदलाच्या पराक्रमी जवानांनी शत्रू देशाची म्हणजेच पाकिस्तानच्या अनेक जहाजांना जलसमाधी दिली होती. सागरी युद्धामध्ये पाकिस्तानला पूर्णपणे नामोहरम करण्याचा पराक्रम भारतीय नौदलाने केला होता. आयएनएस विक्रांत या यद्धनौकेवरून लढाऊ विमानांचे उड्डाण केले जात होते आणि पाकिस्तानातल्या चिटगांव आणि खुलना या हवाई बंदरांवर  जोरदार हल्ला चढवला जात होता. या भागातल्या पाकिस्तानच्या जहाजांचेही आपल्या नौदल जवानांनी प्रचंड नुकसान केले त्यामुळे पाकिस्तानी सैनिकांना कोणतीही मदत मिळेनाशी झाली. विक्रांतवरून कराचीवर क्षेपणास्त्रांचा आणि त्याचबरोबर हवाई माराही केला जात होता. त्यामुळेच पाकिस्तानी सैन्याला पूर्व पाकिस्तान भागामध्ये हार पत्करावी लागली. पाकिस्तानला हरविण्यासाठी भारतीय नौदलाच्या विक्रांतने खूप उत्कृष्ट नेतृत्व केले.

गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय नौदलाची जहाजे आणि विमाने महासागरावर सातत्याने तैनात असून ती अविरत गस्त घालत आहेत. एएनसी म्हणजेच अंदमान आणि निकोबार कमांडच्या जहाजांनी अखंड पाळत ठेवली आहे. जगातला सर्वात व्यस्त सागरी मार्ग असलेली  मलाक्का समुद्रधुनी अंदमान आणि निकोबारपासून दक्षिणेकडे अवघ्या 80 किलोमीटर आहे. या रहदारीच्या मार्गावरही भारतीय नौदलाने सतर्कता कायम ठेवली आहे. कोविड-19 महामारी उद्रेकामध्येही आपल्या जहाजांन या प्रदेशांमध्ये चांगले सहकार्य केले आणि शेजारी देशांबरोबर मैत्रीपूर्ण व्यवहार ठेऊन क्षेत्रीय सहकार्य वृद्धिंगत केले. यासाठी एएनसीच्यावतीने मिशन सागरआणि समुद्र सेतूअसे उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यात आले. यामध्ये महामारीच्या अभूतपूर्व संकटामध्ये मानवतेच्या भावनेने सर्वांना मदत करून परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणले त्याचप्रमाणे देशांमध्ये त्यांना सुरक्षा प्रदान केली. एएनसीच्या आयएनएस केसरीने मिशन सागर मोहिमेमध्ये तज्ज्ञ वैद्यकीय व्यावसायिकांबरोबरच जवळपास 500 टनांपेक्षा जास्त वैद्यकीय मदत तसेच  हिंदमहासागरातल्या क्षेत्रीय देशांना पोहोचवली. नाविक दलाच्या वतीने या उपक्रमाला मदत करण्यात आली होती. अंदमान आणि निकोबार प्रशासनाला आणि इतर बेटांनाही नौदलाकडून विविध मार्गांनी मदत पुरविण्यात आली.

आज भारतीय नौदलाच्या वतीने नौदल दिन साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त आजच्या दिवशी आपल्या नौदलाने किती मोठा पराक्रम गाजवला आहे आणि इतर विविध क्षेत्रातही मानवतेच्या भावनेतून किती भरीव कामगिरी केली आहे, याची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता आहे. नौदलाच्या कामाविषयी जनमनामध्ये जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. हे लक्षात घेऊन नौदलाच्यावतीने आज विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. मात्र यंदा कोविड-19 महामारीच्या उद्रेकामुळे नौदलाच्या काही कार्यक्रमांवरही प्रतिबंध आले आहेत. यंदा अंदमान आणि निकोबार बेटांवर आयोजित कार्यक्रमामध्ये 1971च्या युद्धामध्ये हौतात्म्य पत्करलेल्या शूर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी युद्ध स्मारकस्थानी माल्यार्पण करण्यात आले. त्याचबरोबर समाजातल्या वंचित आणि गरजू मुलांना त्याचबरोबर भारतीय सशस्त्र दलामध्ये भरती होवू इच्छिणा-या शाळा आणि महाविद्यालयीन मुलांसाठी एका वेबिनारचे आयोजन केले. मरीना उद्यानाजवळ नौदलाच्या जहाजांवर रोषणाई करण्यात आली आहे. तसेच वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच प्रमुख स्थानांवर भित्तीफलके आणि फलके प्रदर्शित केली आहेत. विविध ठिकाणी नौदलाची माहिती सांगणा-या लघुपटाचे प्रदर्शन करण्यात येत आहे.

लढण्यासाठी सज्ज, विश्वासार्ह आणि एकजूटअसलेले भारतीय नौदल देशाच्या सुरक्षेसाठी आणि देशातल्या लोकांच्या सेवेसाठी समर्पित आहे, या वचनबद्धतेची पुन्हा एकदा ग्वाही आज 2020चा नौदल दिन साजरा करताना 'एएनसीने दिली आहे.

 

------

S.Tupe/S.Bedekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1678392) Visitor Counter : 208


Read this release in: English , Urdu , Hindi