उपराष्ट्रपती कार्यालय

उपराष्ट्रपतींनी सायकलिंग संस्कृतीला चालना देण्याचे आणि शहरांमध्ये विशेष सायकलिंग ट्रॅक तयार करण्याचे केले आवाहन


सायकलिंगला प्रोत्साहित करण्यासाठी जनआंदोलन उभारा: उपराष्ट्रपती

सायकलिंगमुळे कमी खर्च, शून्य प्रदूषण आणि आरोग्यात सुधारणा होते: उपराष्ट्रपती

शहरी वाहतूक व्यवस्थेत सायकलिंगचा समावेश करा : उपराष्ट्रपती

Posted On: 28 NOV 2020 9:56PM by PIB Mumbai

 

उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांनी आज सायकलिंग संस्कृतीला चालना देण्याचे आणि शहरांमध्ये विशेष सायकलिंग ट्रॅक तयार करण्याचे आवाहन केले. सायकल चालविणे हा एक आरोग्यवर्धक, कमी खर्चाचा व्यायाम असून यांचे शून्य प्रदूषणासह आणखी बरेच फायदे आहेत, असे त्यांनी नमूद केले.

कोविडनंतरच्या जगात सायकलिंगया विषयावरील आंतरराष्ट्रीय वेबिनारला आभासी पद्धतीने संबोधित करताना नायडू म्हणाले की काटेकोर जागरूकता मोहिमेद्वारे आणि नियमित प्रचारात्मक कार्यक्रमांच्या माध्यमातून सायकलिंगला प्रोत्साहित करण्यासाठी एक जनआंदोलन उभारण्याची आवश्यकता आहे. वेबिनारची संकल्पना काळानुरूप आणि महत्वाची असल्याचे सांगत त्यांनी पृथ्वीला हरित व सुरक्षित करण्यासाठी सामूहिक जागतिक प्रयत्नांची गरज व्यक्त केली.

साथीच्या रोगाने आपले जीवन जगण्याचे, खरेदी करण्याचे, आपला वेळ खर्ची करण्याचे आणि प्रवासाचे सर्व मार्ग बदलले आहेत याकडे लक्ष वेधत उपराष्ट्रपती म्हणाले की, जगातील अनेक शहरांमध्ये लावलेल्या निर्बंधांमुळे वाहतूक कोंडी कमी झाली आहे आणि लोकांनी अधिकाधिक सायकल चालविण्यास पसंती दिली आहे.

बैठ्या जीवनशैलीशी  संबंधित जोखीम कमी करण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे सायकल चालविणे होय, असे ते म्हणालेउर्जा स्त्रोतांवर शून्य अवलंबन, शून्य प्रदूषण आणि चांगले आरोग्य असे अनेक फायदे सायकल चालविण्यामुळे होतात.

साथीच्या रोगाने शहरी वाहतूक व्यवस्थेमध्ये सायकलिंगला प्रोत्साहन आणि अंतर्भूत करण्याची एक दुर्मिळ संधी उपलब्ध करुन दिली आहे, असे सांगत त्यांनी  शहरी नियोजक आणि धोरणकर्त्यांना त्यांच्या योजना व धोरणांवर पुन्हा विचार करून  विशेष सायकल ट्रॅक सुरु  करण्याचा सल्ला दिला.

युरोप, चीन आणि अमेरिकेतील  अनेक शहरांमध्ये सायकलिंगचे प्रमाण वाढल्याचे पाहून नायडू म्हणाले की, भारतात सायकलिंगला चालना देण्याची मोठी क्षमता आहे आणि त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली.

ते म्हणाले की सायकलिंगला प्रोत्साहन देण्यासाठी हीच योग्य वेळ आहे कारण यामुळे ध्वनी प्रदूषण कमी होते, रस्ते सुरक्षा सुधारते आणि वाढत्या  उर्जा आयात बिलाच्या समस्येचे निराकरण होते.

नुकत्याच झालेल्या अभ्यासाचा हवाला देताना ते म्हणाले की, छोट्या प्रवासाठी दुचाकी आणि चारचाकी वाहनाने प्रवास करण्याऐवजी सायकल ने प्रवास केल्यास भारताला वार्षिक 24.3 बिलियन डॉलर्सचा फायदा होऊ शकेल.

या कार्यक्रमाला रालुका फिझर, अध्यक्ष, जागतिक सायकलिंग युति, डी व्ही मनोहर, उपाध्यक्ष आणि कोषाध्यक्ष, जागतिक सायकलिंग युति, क्रिस्तोफ नाजडोव्हस्की, पॅरिसचे उपनगराध्यक्ष आणि अध्यक्ष, युरोपियन सायकलिस्ट फेडरेशन, धर्मेंद्र, अध्यक्ष, एनडीएमसी, कुणाल कुमार, मिशन संचालक, स्मार्ट सिटीज मिशन, कमल किशोर यादव, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आयुक्त, चंडीगड स्मार्ट सिटी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

 

Jaydevi PS/S.Mhatre/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1676878) Visitor Counter : 134