विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
एसटीआयपी-2020 आभासी कार्यक्रमात, भारतीय अनिवासी वैज्ञानिक समुदायांसोबत डॉ. हर्षवर्धन यांची धोरणात्मक चर्चा
विज्ञान-तंत्रज्ञान आणि नवोन्मेष धोरण, एसटीआयपी-2020 सुसूत्रीकरण प्रक्रियेत सक्रीय सहभाग घेण्याचे आवाहन
अनिवासी भारतीय वैज्ञानिक समुदायासोबत एकत्रितपणे काम करण्यास मोठा वाव-केवळ देशाच्या विकासासाठीच नव्हे; तर जागतिक कल्याणासाठीही हा उपक्रम लाभदायक: डॉ. हर्षवर्धन
Posted On:
08 NOV 2020 7:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 नोव्हेंबर 2020
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच भूविज्ञान मंत्री डॉ हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी संध्याकाळी नवी दिल्लीत उच्चशिक्षित अनिवासी भारतीय वैज्ञानिक समुदायाशी पहिलीच धोरणात्मक बैठक झाली. भारताच्या एसटीआयपी-2020 म्हणजेच, विज्ञान-तंत्रज्ञान आणि नवोन्मेष धोरणात सहभागी होण्याचे मार्ग उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने या बैठकीत चर्चा झाली. केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार, प्राध्यापक के. विजय राघवन, विज्ञान-तंत्रज्ञान विभागाचे सचिव, प्रो. आशुतोष शर्मा, आरोग्य-जैव तंत्रज्ञान सल्लागार डॉ विजय चौथाईवाले, परराष्ट्र विभागाच्या अतिरिक्त सचिव रेणू पॉल आणि इतर अनेक मान्यवर या बैठकीला उपस्थित होते.
सध्या भारत आणि जगही कोविड-19 च्या संकटातून पुन्हा नव्याने उभारी घेण्याच्या प्रयत्नात असून, याच उद्देशाने भारताने हा धोरणात्मक चर्चेचा उप्रकम सुरु केला आहे, असे हर्षवर्धन यांनी सांगितले. “या चर्चासत्राचा हेतू, एसटीआयपी 2020 साठी नवनव्या कल्पनांचा विचार करणे आणि त्यांना निश्चित स्वरूप देणे हा आहे, अनिवासी भारतीय समुदायाला या धोरणनिर्मिती प्रक्रियेत सहभागी करुन घेण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असे डॉ हर्षवर्धन यांनी सांगितले. अनिवासी भारतीय वैज्ञानिकांनी या धोरणासाठी आपल्या सूचना द्यावात, त्यांचा समावेश एसटीआयपी-2020 धोरणात केला जाईल, असे ते म्हणाले.
एसटीआयपी-2020 ची कल्पना चार परस्परांशी संलग्न असे ट्रॅक्स, 21 तज्ज्ञांचे संकल्पात्मक समूह, सार्वजनिक चर्चा आणि सल्लामसलती यानुसार प्रेरित आहे. या प्रक्रियेचा उद्देश, विज्ञान-तंत्रज्ञान आणि नवोन्मेष पूरक व्यवस्थेसाठीची प्राधान्यक्रमे निश्चित करणे, धोरणाच्या अंमलबजावणीविषयी शिफारशी करणे, धोरण प्रत्यक्षात राबवणे आणि अंमलबजावणी देखरेख ठेवणारी यंत्रणा विकसित करणे हा आहे.
S.Thakur/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1671288)
Visitor Counter : 215