संरक्षण मंत्रालय
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते पूर्व सिक्कीममधे बीआरओ रस्ता राष्ट्राला समर्पित; संरक्षण सज्जता आणि सामाजिक-आर्थिक विकासाला अधिक चालना मिळणार
Posted On:
26 OCT 2020 3:15PM by PIB Mumbai
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राष्ट्रीय महामार्ग 310 वर 19.85 किमीचा पर्यायी रस्ता राष्ट्राला समर्पित केला आहे. आधीचा रस्ता नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात खराब झाला होता. पूर्व सिक्कीम मध्ये विशेषकरून नथुला क्षेत्रात संरक्षण सज्जतेला चालना देण्याच्या दृष्टीकोनातून हा रस्ता महत्वाचा आहे. खराब हवामानामुळे सुखना इथल्या मुख्यालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे हे उद्घाटन करण्यात आले. या कामगिरीसाठी संरक्षण मंत्र्यांनी, बीआरओ अर्थात बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या कामगिरीची प्रशंसा केली.सिक्कीम मध्ये सीमा भागातले रस्ते दुपदरी करण्याचे काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
दुर्गम भागात पायाभूत सुविधांचा विकास करण्याच्या अभियानावर विशेष भर देत, केवळ संरक्षण सज्जतेच्या दृष्टीकोनातूनच नव्हे तर या प्रदेशाच्या सामाजिक-आर्थिक विकासाला चालना देण्यासाठीही हा विकास करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. ईशान्येकडच्या राज्यांच्या विकासाकडे विशेष लक्ष पुरवण्याच्या पंतप्रधानांच्या धोरणाला अनुसरत पायाभूत विकासाला गती देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्धाराचा त्यांनी पुनरुच्चार केला.
या मार्गामुळे पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच राज्याच्या सामाजिक- आर्थिक विकासाला गती मिळणार असल्याचे सिक्कीमच्या मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. पर्यटन हा आपल्या राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून रस्त्याचे काम वेगाने पूर्ण केल्या बद्दल त्यांनी केंद्र आणि बीआरओची प्रशंसा केली.
गेल्या काही वर्षात बीआरओने, सामग्री, साधने आणि बांधकाम यामध्ये तंत्रज्ञानाचा समावेश करत आपल्या क्षमतांचा अभूतपूर्व विस्तार केला आहे. अटल बोगदा, डीएस-डीबीओ रस्ता आणि, राष्ट्रीय मार्गाला पर्यायी रस्ता म्हणजे बीआरओचा उच्च दर्जा आणि वेगवान कामाचे द्योतक आहे. बीआरओच्या भविष्यातल्या प्रकल्पाबाबत माहिती देतानाच येत्या काळात आत्मनिर्भर भारत अभियान वेगाने प्रगती साधेल असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.
U.Ujgare/N.Chitale/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1667574)
Visitor Counter : 165