रेल्वे मंत्रालय

गरीब कल्याण रोजगार अभियानांतर्गत भारतीय रेल्वेकडून 10 लाखांपेक्षा जास्त मनुष्य दिवसांच्या कामाची निर्मिती


या मनुष्यदिवसांच्या कामाची मुख्यत्वे बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, ओदिशा, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या 6 राज्यांमध्ये निर्मिती

या प्रकल्पांसाठी काम करणाऱ्या कंत्राटदारांना 25 सप्टेंबर 2020 पर्यंत रु. 2190.7 कोटी रुपये चुकते करण्यात आले

6 राज्यांमधील 116 जिल्ह्यांमध्ये गरीब कल्याण रोजगार अभियानाची अंमलबजावणी केली जात आहे

या राज्यात रेल्वेच्या 164 पायाभूत सुविधा प्रकल्पांची उभारणी केली जात आहे

Posted On: 27 SEP 2020 6:08PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  27 सप्टेंबर  2020

भारतीय रेल्वेने गरीब कल्याण रोजगार अभियानांतर्गत बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, ओदिशा, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या 6 राज्यांमध्ये 10 लाखांपेक्षा जास्त मनुष्य दिवसांच्या कामाची निर्मिती केली आहे. या योजनेंतर्गत या राज्यांमध्ये स्थलांतरित मजुरांसाठी निर्माण केलेल्या रोजगार संधींवर रेल्वे आणि वाणीज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल या प्रकल्पांच्या प्रगतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. या राज्यात रेल्वेच्या 164 पायाभूत सुविधा प्रकल्पांची उभारणी केली जात आहे.

25 सप्टेंबर 2020 पर्यंत 12,276 कामगारांना या अभियानात सहभागी करण्यात आले असून या प्रकल्पांसाठी काम करणाऱ्या कंत्राटदारांना 25 सप्टेंबर 2020 पर्यंत रु. 2190.7 कोटी रुपये चुकते करण्यात आले. राज्य सरकारशी योग्य प्रकारचा समन्वय राखण्यासाठी रेल्वेने प्रत्येक जिल्ह्यात आणि राज्यांमध्ये नोडल अधिकारी नियुक्त केले आहेत.

या योजनेंतर्गत राबवली जाणारी रेल्वेची कामे रेल्वेने निर्धारित केली आहेत. 1) लेव्हल क्रॉसिंगला जोडणाऱ्या रस्त्यांचे बांधकाम आणि देखभाल 2)  रेल्वे रुळांच्या शेजारी पाणी वाहून जाण्यासाठी चर तयार करणे आणि त्यांची स्वच्छता करणे, रुळाच्या बाजूला असलेले सांडपाणी वाहक तयार करणे 3) रेल्वे स्थानकांना जोडणारे रस्ते तयार करणे आणि त्यांची देखभाल करणे 4) रेल्वेचे सध्या अस्तित्वात असलेले बंधारे/ चर दुरुस्त करणे  आणि त्यांचे रुंदीकरण करणे 5) रेल्वेच्या जमिनीच्या सर्वात बाहेरच्या सीमेवर वृक्षारोपण करणे 6) सध्या अस्तित्वात असलेले बंधारे/ चर/ पूल यांचे संरक्षक बांधकाम या कामांचा त्यात समावेश आहे.

यामध्ये हे लक्षात घेतले पाहिजे की कोविड-19 च्या उद्ध्वस्त करून टाकणाऱ्या परिणामांची झळ मोठ्या प्रमाणावर बसलेल्या आणि आपापल्या राज्यात परतलेल्या अनेक स्थलांतरित मजुरांना त्यांच्याच भागात/ गावात रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 जून 2020 रोजी  रोजगार आणि सार्वजनिक कामे असे स्वरुप असलेले विशाल गरीब कल्याण रोजगार अभियान सुरू केले. गरीब कल्याण रोजगार अभियानांतर्गत ग्रामीण भागात टिकाऊ पायाभूत सुविधा उभारण्यासाठी सुमारे 50,000 कोटी रुपये खर्च करण्यात येतील अशी घोषणा पंतप्रधानांनी केली होती.

125 दिवसांचे हे अभियान एखाद्या मोहिमेच्या स्वरुपात चालवण्यात येत असून त्याअंतर्गत 116 जिल्ह्यांमध्ये 25 प्रकारच्या कामांच्या अंमलबजावणीवर भर देण्यात आला आहे. बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड आणि ओदिशा या सहा राज्यांमध्ये मोठ्या संख्येने परतलेल्या स्थलांतरित मजुरांसाठी प्रत्येक प्रकारचे काम उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या मोहिमेंतर्गत हाती घेण्यात येणाऱ्या सार्वजनिक कामांसाठी सुमारे 50,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ग्रामीण विकास, पंचायती राज, रस्ते वाहतूक आणि महामार्ग, खाण, पेयजल आणि स्वच्छता, पर्यावरण, रेल्वे, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, नूतन आणि नवनिर्मितीकारक उर्जा, सीमा रस्ते, दूरसंचार आणि कृषी अशा विविध 12 मंत्रालये/ विभागांच्या सामाईक प्रयत्नातून पायाभूत सुविधांची 25 कामे आणि चरितार्थाच्या संधीं निर्माण करण्याशी संबधित कामांसाठी हे अभियान चालवले जात आहे.

 

B.Gokhale/S.Patil/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1659637) Visitor Counter : 132


Read this release in: Bengali , Punjabi , Malayalam