संरक्षण मंत्रालय

पिनाक अस्त्रप्रणालीचे DRDO कडून DGQA कडे AHSP हस्तांतरण

Posted On: 25 SEP 2020 8:56PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 सप्‍टेंबर 2020


25 सप्टेंबर 2020 रोजी, पिनाक अस्त्रप्रणालीची AHSP ऑथॉरिटी होल्डिंग सील्ड पर्टिक्युलर्स ही जबाबदारी DRDO अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेकडून DGQA कडे सोपविण्यात आल्यामुळे एक मैलाचा दगड पार झाला.

 AHSP हस्तांतरणामुळे पिनाक अग्निबाण, प्रक्षेपक बॅटरी कमांड पोस्ट, आणि अशा अन्य महत्त्वाच्या सुविधांच्या स्थापना आणि निर्मितीवर तसेच गुणवत्ता हमी प्रक्रिया यशस्वीपणे स्थापित झाल्यावरही शिक्कामोर्तब झाले. 

पुण्यात ARDE म्हणजे शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास आस्थापनेत हा हस्तांतरण कार्यक्रम पार पडला. विविध उत्पादन संस्थांना आवश्यक असणारे दस्तैवजही यावेळी सुपूर्द करण्यात आले.

पिनाक ही दारुगोळ्याने युक्त अशी फ्री फ्लाईट पद्धतीची अग्निबाण प्रणाली असून तिची कक्षा 37.5  किलोमीटर इतकी आहे. पिनाक अग्निबाण, 44 सेकंदात 12 अग्निबाण सोडण्याची क्षमता असलेल्या बहु बॅरलयुक्त अग्निबाण प्रक्षेपकातून सोडले जातात. 

पुण्यातील DRDO प्रयोगशाळा आणि ARDE यांनी संरक्षण क्षेत्रातील अन्य संस्थांच्या सहयोगातून या अस्त्रप्रणालीची रचना आणि विकास केला आहे. पिनाक अग्निबाण आणि त्याची भूमीलगतची प्रणाली यांचे सध्या, आयुध निर्मिती कारखाने, भारत इलेक्ट्रॉनिक, भारत अर्थमूव्हर, टाटा पॉवर आणि एल अँड टी डिफेन्स येथे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरु आहे.

DRDO चे अध्यक्ष डॉ.जी.सतीश रेड्डी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. AHSP हस्तांतरण हा पिनाक अग्निबाण प्रणालीच्या विकासापैकी महत्त्वाचा टप्पा असल्याचे मत त्यांनी यावेळी मांडले. संरक्षण सेवांच्या गरज भागविण्याच्या दृष्टीने ही प्रणाली मोठी कामगिरी बजावेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

DGQAचे महासंचालक ले.ज. संजय चौहान, यांच्यासह संरक्षण क्षेत्रातील अन्य महत्त्वपूर्ण संस्थांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते. तर ARDE चे संचालक डॉ.व्ही.वेंकटेश्वर राव यांच्यासह अन्य अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते.

 

* * *

B.Gokhale/J.Waishampayan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1659172) Visitor Counter : 216


Read this release in: English , Urdu , Hindi