उपराष्ट्रपती कार्यालय

लहान मुलांच्या कल्याणाच्या सुनिश्चिततेसाठी योजनाबद्धतेने विविध आघाड्यांवर सर्वंकष कृती करण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन

Posted On: 04 SEP 2020 8:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 सप्‍टेंबर 2020

 

नवीन पिढी, आजची लहान मुले म्हणजे लोकसांख्यिकी दृष्टीने लाभांश आहेत, भविष्यात त्यांचा फायदा मिळावा यासाठी आणि लहान मुलांच्या कल्याणाच्या सुनिश्चिततेसाठी  योजनाबद्धतेने विविध आघाड्यांवर सर्वंकष कृती करण्याचे आवाहन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आज केले. 

बालविकास म्हणजे आपल्या देशाच्या विकास वास्तूचा पाया असला पाहिजे, असे सांगून उपराष्ट्रपती म्हणाले, बाल कल्याण, विकासासंदर्भामध्ये असलेल्या आव्हानांचा सर्वसमावेशक अहवाल, ‘द स्टेट ऑफ यंग चाइल्ड इन इंडिया’ यामध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे. 

लहान मुलांसाठी फिरते संगोपन गृह म्हणजे फिरते पाळणाघर चालविणा-या संघटनेने भारतातल्या लहान मुलांच्या स्थितीविषयी हा अहवाल तयार केला आहे. ही संस्था संपूर्ण भारतामध्ये वंचितांच्या मुलांसाठी काम करते. या अहवालाची प्रशंसा करताना नायडू म्हणाले, अशा अहवालांमुळे मुलांना भासणा-या उणिवा तसेच त्यांच्या तातडीच्या गरजा नेमक्या काय आहेत, हे समजते आणि त्यानुसार धोरण निश्चित करण्यास मदत करतात. 

मुलांची मुक्त वातावरणात वाढ झाली पाहिजे तसेच त्यांच्या भावनिक, सामाजिक आणि शैक्षणिक तसेच इतर गरजा पूर्ण होण्याची आवश्यकता आहे. आयुष्याच्या प्रारंभीच्या काळामध्ये त्यांचा चांगला पाया असलेल्या सुशिक्षित आणि निरोगी लोकांनी  वंचितांच्या मुलांसाठी आर्थिक आणि सामाजिक कार्य म्हणून योगदान देण्याची गरज आहे, असेही नायडू यावेळी म्हणाले. 

या अहवालाच्या आधारे नायडू यावेळी म्हणाले, भारतामध्ये सहा वर्षांच्या आतल्या वयाची 159 दशलक्ष बालकांपैकी 21 टक्के मुले ही कुपोषित आहेत. तर 36 टक्के मुलांचे वजन त्यांच्या वयाच्या मानाने कमी आहे. त्यांचे लसीकरणही पूर्णपणे झालेले नाही. या आकडेवारीवरून लहान मुलांच्या आरोग्यासाठी किती मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे, याचे महत्व अधोरेखित करीत आहे. 

आयसीडीएस आणि संयुक्त राष्ट्राच्या बालहक्क समिती यासारख्या आंतरराष्ट्रीय वचनबद्धतेची पूर्तता करण्यासाठी भारत अतिशय जागरूकपणे प्रयत्न करीत आहे आणि त्यासाठी सर्वसमावेशक धोरण तसेच महत्वपूर्ण कार्यक्रम तयार करण्यात येत आहे, असे सांगून नायडू यांनी हे आव्हान प्रचंड मोठे असून त्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. 

महात्मा गांधी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी सांगितलेल्या अंत्योदय योजनेनुसार समाजातल्या अगदी शेवटच्या घटकाची, व्यक्तीची उन्नती होण्याची गरज असल्याचे उपराष्ट्रपती नायडू यांनी यावेळी सांगितले. 

 

* * *

B.Gokhale/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1651431) Visitor Counter : 211