जलशक्ती मंत्रालय

राष्ट्रीय जल जीवन अभियानामध्ये क्षेत्रीय भागीदारांबरोबर कार्य करणार

Posted On: 27 AUG 2020 9:56PM by PIB Mumbai

 

संपूर्ण देशभरामध्ये प्रत्येक घराघरांमध्ये सन 2024 पर्यंत नळाव्दारे पेयजलाचा पुरवठा करण्याचे ध्येय सरकारने निश्चित केले आहे. या ध्येयपूर्तीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले आहे की, राष्ट्रीय जल-जीवन अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाला यशस्वी बनविण्यासाठी देशातल्या सर्व राज्यांतल्या आणि केंद्रशासित प्रदेशातल्या भागीदारांबरोबर कार्य करण्यात येणार आहे. देशाच्या सर्व भागामध्ये नियमित आणि पुरेशा प्रमाणात पेयजल नळाव्दारे सर्वांना मिळावे, यासाठी संपूर्ण देशात मिशन मोडवर  कार्य करण्यात येणार आहे. यासाठी पाणी पुरवठ्याचे प्रमाण, कामाची निर्धारित गुणवत्ता यांचा सर्वंकष विचार करण्यात येणार आहे. पाण्याचे स्त्रोत कमी होत आहेत, तसेच पाण्याची गुणवत्ताही वाढविण्याची गरज आहे. ग्रामीण भागामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव आहे. तसेच काही ठिकाणी नळाव्दारे पाणी पुरवठा योजना सुरू झाल्या आहेत, परंतु त्या योजनेची देखभाल योग्य पद्धतीने केली जात नाही. साधने कार्यक्षम नाहीत, अशा अनेक समस्या नळाव्दारे पेयजल पुरवठा करताना भेडसावतात. या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी या संबंधित सर्व भागीदारांना राष्ट्रीय जल जीवन अभियानामध्ये सहभागी करून घेण्यात येणार आहे.

राष्ट्रीय जल जीवन अभियानाचे (जेजेएम) उद्दिष्ट प्रत्येक घरामध्ये नळाव्दारे पेयजल उपलब्ध करून देवून लोकांचे जीवनमान उंचावणे आहे. हे अभियान केवळ पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी नाही, तर या अभियानची सुलभतेने अंमलबजावणी करण्यासाठी विविध संस्थांबरोबर भागीदारी निर्माण करणे आहे. यासाटी जलशक्ती मंत्रालय, पेयजल आणि स्वच्छता विभाग, इतर संबंधित संस्था, स्वयंसेवी संस्था, अनेक स्थानिक पातळीवर कार्यरत असणारे समुदाय, स्वच्छेने कार्य करणारे जलदूत, अशा सर्वांना या अभियानामध्ये सहभागी करून घेण्यात येणार आहे. स्थानिक पातळीवरचा पेयजलाचा प्रश्न सोडविण्यासाठी ही मंडळी एक प्रकारे ‘क्षेत्रीय भागीदार’ असणार आहेत. पाणी, स्वच्छता, नैसर्गिक साधनांचे व्यवस्थापन, स्थानिक समुदायांचा सहभाग, संस्थांची क्षमतावृद्धी, पाण्याविषयी जागरूकता निर्माण करणे, योग्य ते शिक्षण देणे, आरोग्य , आदिवासी विकास, समानता अशा क्षेत्रात व्यापक कार्य करणा-या आणि प्रभावी संघटनांना जल जीवन अभियानामध्ये भागीदार होता येणार आहे. यासाठी संबंधित संस्थांना दि. 16 सप्टेंबर,2020 पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करावे लागणार आहेत. यासंबंधीचा तपशील  https://jalshakti-ddws.gov.in/  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

ज्या संस्थेची क्षेत्रीय भागीदार म्हणून निवड करण्यात येईल, त्यासंस्थेला राज्य जल आणि स्वच्छता अभियानामध्ये भागीदारी निर्माण करणे, शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संस्था, नागरी संस्था यांना एकत्रित आणण्यासाठी आणि अभियानाच्या विस्तृत क्षेत्रात कार्य करण्यासाठी समर्थन प्रदान करण्यात येईल. आगामी काळामध्ये पाण्याच्या गुणवत्तेवर अधिक भर देण्याची आवश्यकता आहे, त्यामुळे जल स्त्रोत दीर्घकाळा टिकले पाहिजेत, हे सुनिश्चित करण्यासाठी राज्यांनी जल जीवन अभियानामध्ये एक विशिष्ट यंत्रणा राबविणे गरजेचे आहे. या अभियानामध्ये सामाजिक समावेशनाची भावना अतिशय महत्वाची आहे. त्यामुळे सामाजिक परीक्षण-निरीक्षण करण्यात येणार आहे.

देशभरामध्ये अनेक सामाजिक संस्था जलसमस्या सोडविण्यासाठी कार्यरत आहेत. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर त्यांनी काम केले आहे. त्यांनीही या अभियानामध्ये सहभागी होण्याची इच्छा दर्शविली आहे. यामुळे जल जीवन अभियानाला गती मिळू शकणार आहे. अनेक संस्था पाणी प्रश्नांवर स्वेच्छेने कार्य करीत आहेत. तसेच स्वयंसेवी संस्था, समाजसेवा आणि धर्मादाय संस्था पेयजल क्षेत्रात कार्यरत आहेत.  त्यांना स्थानिक जनता, समुदायांचाही चांगला पाठिंबा मिळतो. त्यांच्यामध्ये सर्वांना सामावून घेवून कार्य करण्याची क्षमताही आहे. त्यामुळेच जल जीवन अभियानाच्या ध्येयपूर्तीसाठी अशा सर्वांची मदत घेण्यात येणार आहे. यामुळे या समुदायांची कार्यक्षमताही वाढू शकणार आहे.

जल जीवन अभियानामध्ये ग्रामपंचायत, उपसमिती म्हणजेच ग्राम पाणी आणि स्वच्छता समिती, पाण्ी समिती यांचे व्यवस्थापन, तांत्रिक आणि आर्थिक गोष्टी यांच्याविषयीची क्षमता वाढविण्याचे कार्य करण्यात येणार आहे. यामुळे कोणतीही पेयजल योजना चांगल्या पद्धतीने कार्यरत राहून त्याचा ग्रामस्थांना लाभ होवू शकेल. तसेच पाणी  योजनेची देखभाल अतिशय महत्वाची आहे, ती केली जावू शकेल. गावामध्ये पाणी पुरवठ्याची  पायाभत सुविधा तयार करणे, प्रत्येक गावामध्ये ‘फील्ड टेस्ट किट’ (एफटीके) च्या माध्यमातून पाण्याची गुणवत्ता तपासणे आणि कायम राखणे, यासाठी या भागीदार बनणा-या संस्था, संघटना महत्वाची भूमिका पार पाडू शकतात. यासाठी स्थानिक समाजाला एकत्रित आणण्याचे काम करू शकतात.

काळाच्या बदलत्या स्थितीनुसार सर्वांचा सहभाग जल जीवन अभियानात घेण्यासाठी कार्य करण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी स्थानिक पातळीवर व्यावसायिक तत्वाने कुशलतेने काम करून चांगले परिणाम साधण्यासाठी सहकार्य विकसित करणे आवश्यक आहे. सर्वांना चांगले पेयजल मिळावे, यासाठी भागीदारांना बरोबर घेवून हे अभियान चालविण्यात येणार आहे.

******

B.Gokhale/S.Bedekar/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1649077) Visitor Counter : 250


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil