आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

अन्न आणि पोषणासंबंधी सहकार्यात्मक संशोधन आणि माहितीच्या प्रसारासाठी डॉ. हर्ष वर्धन यांच्या अध्यक्षतेखाली सीएसआयआर आणि एफएसएसएआय यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षरी


एफएसएसएआयला मिळाला ‘ईट राईट इंडिया’ चळवळीसाठी फूड सिस्टम्स व्हिजन पुरस्कार

Posted On: 07 AUG 2020 8:09PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 7 ऑगस्‍ट 2020


केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या अध्यक्षतेखाली आज  आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण (एफएसएसएआय) आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) यांच्यात सामंजस्य करार झाला.  आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनी के. चौबे हे देखील यावेळी उपस्थित होते. अन्न आणि पोषण क्षेत्रात सहकार्यात्मक संशोधन आणि माहितीचा प्रसार हे या सामंजस्य कराराचे उद्दिष्ट आहे.

एफएसएसएआय आणि सीएसआयआर यांचे या अभिनव उपक्रमाबद्दल अभिनंदन करताना डॉ हर्ष वर्धन यांनी नमूद केले की या सामंजस्य करारामुळे अन्न सुरक्षा आणि पोषण संशोधनाच्या क्षेत्रात विकसित होणारे तंत्रज्ञान आणि कार्यक्रमांची ओळख  होईल तसेच भारतीय व्यवसायाद्वारे तैनात करण्यासाठी आणि / किंवा नियमांचे पालन करण्यासाठी सीएसआयआरकडे उपलब्ध असलेल्या अभिनव  तंत्रज्ञानाची ओळख होईल. अन्न सेवन, जैविक जोखमीच्या घटना आणि  प्रमाण, अन्नातील दूषित पदार्थ, उद्भवणारे धोके , ते रोखण्यासाठी रणनीती आणि वेगवान सतर्क यंत्रणेची सुरुवात आदी माहिती संकलित केली जाईल. अन्नपदार्थांच्या  उत्पादनांची गुणवत्ताआणि सुरक्षेबाबत विश्वसनीय अहवाल देण्याच्या पद्धतींचा विकास आणि प्रमाणीकरण करण्याच्या उद्देशाने देशभरातील प्रयोगशाळा  नेटवर्कच्या दर्जाची हमी बळकट करण्यासाठी दोन्ही संघटना सहकार्य करतील असे ते म्हणाले.

एफएसएसएआय आणि सीएसआयआर यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराबद्दल बोलताना डॉ. हर्ष वर्धन म्हणाले, "सामंजस्य करार एक अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल आहे जे अन्न आणि पोषण आणि अन्न आणि ग्राहकांच्या सुरक्षेच्या क्षेत्रात सहकार्यात्मक संशोधन आणि माहितीच्या प्रसारासाठी भारताचे भविष्य उज्ज्वल बनवेल.  भारताच्या या दोन प्रमुख संस्थांमधील सहकार्य न्यू फूड सिस्टम 2050 ची कल्पना साकारण्यात योगदान देईल. 

डॉ. हर्ष वर्धन यांनी रॉकफेलर फाउंडेशन, सेकंडम्यूज आणि ओपनआयडीईओ कडून दहा जागतिक संघटनांबरोबर ‘ईट राइट इंडिया’ चळवळीची पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल एफएसएसएएआयचे अभिनंदन केले. सन 2050 पर्यंत पुनरुत्पादक आणि पौष्टिक खाद्य प्रणालीची प्रेरणादायक दृष्टी विकसित करणार्‍या संस्थांना हा पुरस्कार दिला जातो. डॉ. हर्ष वर्धन म्हणाले की हा पुरस्कार अन्न सुरक्षा आणि पोषण विषयी एफएसएसएआयच्या समग्र आणि चाकोरीबाहेरील दृष्टिकोनाची दृढ ओळख आहे.  ते म्हणाले की, “आपल्या दैनंदिन जीवनात पौष्टिक आहार निवडणे आणि शारीरिक व्यायाम सुनिश्चित करणे या दोन उपायांद्वारे सर्वांसाठी आरोग्याचे स्वप्न साध्य केले जाऊ शकते. ‘ईट राईट इंडिया’ ही कल्पना सर्व हितधारकांना सुरक्षित, निरोगी आणि टिकाऊ खाद्य संस्कृती निर्माण करणे  आणि अन्न उत्पादन, प्रक्रिया, वितरण, गुणवत्ता आणि शोध क्षमतेत तंत्रज्ञानाचा वापर करणे आणि ग्राहकांना योग्य खाण्याच्या पद्धती अवलंबण्यास सक्षम बनविणे या विषयी आहे.

डॉ. हर्ष वर्धन यांनी अधोरेखित केले की, 2050 च्या नवीन अन्न प्रणालीच्या कल्पनेमुळे  निरोगी, पौष्टिक, वनस्पती-आधारित, स्थानिक, हंगामी आणि देशी खाद्यपदार्थांच्या  मागणीत  वाढ होत जाईल. ते म्हणाले, हवामान अनुकूल अन्न उत्पादन प्रणाली, जमीन आणि जल संसाधनाचे  संवर्धन, अन्न नासाडीत  घट आणि  स्थानिक अर्थव्यवस्थांच्या स्वावलंबनासाठी लघु उद्योग उत्पादन वाढ, पर्यावरणाला अनुकूल पॅकेजिंग पर्याय, कचर्‍याचा पुनर्वापर यावरही अधिक लक्ष केंद्रित केले जाईल.

अश्विनीकुमार चौबे यांनी अत्यंत प्रतिष्ठेच्या रॉकफेलर पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, “भारताने सुरु केलेल्या या चळवळीमुळे प्राचीन खाद्यपद्धतींमध्ये पारंपारिक आयुर्वेदिक ज्ञानाचे  पुनरुज्जीवन होईल, या पद्धती प्रत्यक्षात आणण्यासाठी आणि स्थानिक आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला पाठिंबा देण्यासाठी विविध प्रकारच्या रोजगाराच्या संधी निर्माण होतील, विशेषत: महिलांसाठी आर्थिक वाढ आणि लिंग समानता सुनिश्चित होईल. सीएसआयआर बरोबर करण्यात आलेला हा  सामंजस्य करार एफएसएसएआयला  विद्यमान आणि नवीन तंत्रज्ञान आणि कार्यक्रम निवडण्यास तसेच अन्न सेवन, उद्भवणारे धोके आणि वेगवान सतर्क यंत्रणेचा विकास याबाबत माहिती संकलित करण्यात मदत करेल आणि यासाठी गुणवत्ता हमी देणाऱ्या प्रयोगशाळेचे नेटवर्क मजबूत करेल, ”असे ते म्हणाले.

या बैठकीत सीएसआयआरचे महासंचालक, एफएसएसएआय चे मुख्य कार्यकारी अधिकारी, अन्य वरिष्ठ अधिकारी तसेच विविध तंत्रज्ञान आणि संशोधन संस्थांचे संचालक आणि वैज्ञानिक डिजिटली सहभागी झाले होते.

 

* * *

M.Chopade/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1644201) Visitor Counter : 359