कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय

सार्वजनिक सेवा अंमलबजावणी-सरकारची भूमिका’ या विषयावरील प्रादेशिक परिषदेचे नागपुरात उद्घाटन


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि डॉ जितेंद्र प्रसाद उद्या समारोप सोहळ्याला उपस्थित राहणार

सार्वजनिक सेवांचे उद्दिष्ट नागरिकांचे जीवन सुकर करणे : राष्ट्रपती कार्यालयाचे सचिव संजय कोठारी

Posted On: 21 DEC 2019 1:47PM by PIB Mumbai

सार्वजनिक सेवांचे उद्दिष्ट नागरिकांचे जीवन सुकर करणे हेच असते, असे मत राष्ट्रपती कार्यालयाचे सचिव संजय कोठारी यांनी व्यक्त केले. नागपूर येथे आजपासून सुरु झालेल्या “सार्वजनिक सेवा अंमलबजावणी सुधारणा-सरकारची भूमिका” या विषयावरील प्रादेशिक परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. केंद्रीय कर्मचारी आणि प्रशासकीय सुधारणा व महराष्ट्र राज्य आयोगाच्या सार्वजनिक सेवांचा अधिकार या विभागाने संयुक्तरीत्या ही दोन दिवसीय परिषद आयोजित केली आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि डॉ जितेंद्र सिंग यांच्या उपस्थितीत उद्या या परिषदेचा समारोप होणार आहे.

आजच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना कोठारी म्हणाले की, की देशाची खरी शक्ती त्या देशातील नागरिकांमध्येच असते आणि म्हणूनच या सर्वसामान्य जनतेचे आयुष्य अधिक सुकर व्हावे, यासाठी  प्रयत्न करणे हे प्रत्येक सरकारचे प्राथमिक कर्तव्य आहे. त्यासाठी सरकारी व्यवस्था आणि यंत्रणा अधिक पारदर्शक असायला हव्यात. नियमांमध्ये कोणताही बदल किंवा सुधारणा करायच्या असल्यास त्या आधी सार्वजनिक करायला हव्यात आणि जनतेकडून त्याविषयी सूचना तसेच मते मागवायला हवी, असे कोठारी म्हणाले. आणि जनतेच्या सूचना विचारात घेऊनच त्या नियमात बदल केला जावा, असे मत त्यांनी व्यक्त केले. विशेषतः युवा अधिकाऱ्यांनी जनतेच्या सेवेसाठी तत्पर असावे, असे आवाहन त्यांनी केले. व्यवस्थेसाठी नागरिक नसून नागरिकांसाठी व्यवस्था आहे, हे लक्षात घेऊन आपला  भर नेहमी नागरिकांवर असायला हवा असे कोठारी म्हणाले. जनतेचे आयुष्य सुकर, सुलभ करण्यासाठी व्यवस्थांवर सरकारचे असलेले नियंत्रण कमी व्हायला हवे आणि केवळ एक पारदर्शी, कालबद्ध, प्रभावी व्यवस्था देण्यापुरती ही भूमिका मर्यादित असावी, असे त्यांनी सांगितले.

सर्वसामान्य नागरिकांचे आयुष्य सुलभ, सुकर करण्यासाठी सरकारने हाती घेतलेल्या विविध योजना आणि उपक्रमांची कोठारी यांनी सविस्तर माहिती दिली. अधिकाऱ्यांनी वेळोवेळी जनतेशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात अशी सूचनाही त्यांनी केली.

या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य सेवांचा अधिकार विभागाचे मुख्य आयुक्त एस एस क्षत्रिय यांनीही मार्गदर्शन केले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डीएआरपीजी च्या उपसचिव रेणू अरोरा यांनी केले. 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील अधिकारी या परिषदेला उपस्थित आहेत.

***

B.Gokhale/ R.Aghor/ 



(Release ID: 1597169) Visitor Counter : 89


Read this release in: Urdu , English , Hindi