उपराष्ट्रपती कार्यालय
मुंबईत एनसीपीए येथे झालेल्या दक्षिण आशियाई सिंफनी ऑर्केस्ट्राच्या ‘चिराग’ या कार्यक्रमात उपराष्ट्रपतींनी उपस्थितांना केलेले मार्गदर्शन
Posted On:
26 APR 2019 8:20PM by PIB Mumbai
बंधु आणि भगिनींनो, नमस्कार,
तुम्हा सर्वांना माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा!
आज आपण सगळे येथे एका महत्त्वाच्या प्रसंगाचे साक्षीदार बनण्यास जमलो आहोत. असा एक कार्यक्रम, जो भारतात होत असून, एक देश आणि लोक मिळून सर्व देशांच्या सहकार्य आणि सहअस्तित्वाला तो कार्यक्रम अर्पण करणार आहोत. माजी सनदी अधिकारी श्री. सुधाकर राव आणि श्रीमती निरुपमा राव यांनी स्थापन केलेल्या दक्षिण आशियाई सिंफनी फाऊंडेशनच्या वतीने हा सिंफनी ऑर्केस्ट्रा सादर केला जात आहे. दक्षिण आशियातल्या जनतेला संगीतासारख्या पवित्र माध्यमाने जोडण्याचा हा उत्तम प्रयत्न आहे.
संगीताची भाषा वैश्विक असते. भौगोलिक सीमा ओलांडून संगीत माणसांना जोडत असते. येथे भारतात संगीताच्या कार्यक्रमातून योग आणि अध्यात्मिक प्रगती साधली जाईल याचा आम्ही कायमच प्रयत्न करत असतो. आज येथे आलेला ऑर्केस्ट्रा आणि जमलेले सर्व संगीत कलावंत तेच साध्य करणार आहेत. प्रत्येक कलावंताला त्याच्या किंवा तिच्या वाद्यावर लक्ष केंद्रीत करावं लागणार आहे मात्र, त्याचवेळी त्यांना इतर वाद्यांशी मेळ जुळवून घ्यावा लागणार आहे. स्वत:ची ओळख कायम ठेवत एका सामूहिक प्रयत्नांचा, अभियानाचा भाग होण्याचे हे सर्वोत्तम उदाहरण असेल. देश असो किंवा व्यक्ती आपली एकत्र राहण्याची आणि एकत्र काम करण्याची क्षमताच आपल्यातला एकात्म भाव सिद्ध करत असते.
प्रसिद्ध महान संगीततज्ञ रॉबर्ट शुमान यांनी म्हटल्याप्रमाणे- अंधारलेले हृदय उजळवून टाकणे हे एखाद्या कलावंताचे कर्तव्य असते.
संगीतामध्ये अशी शक्ती आहे ज्यामुळे आपल्या जीवनाचा दर्जा उंचावला जाऊ शकतो. आज येथे सादर होणाऱ्या ‘चिराग’ या दक्षिण आशियाई सिंफनी ऑर्केस्ट्रातून दक्षिण आशियाई देशांमधले सांस्कृतिक बंध आणि संवाद अधिक मजबूत होईल, असा मला विश्वास वाटतो.
दक्षिण आशियाई प्रदेशाने आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक एकात्मक होण्याची गरज आहे. आपल्यामधील लोकांचे परस्परांशी असलेले संबंध आणि सहकार्याची भावना वाढवण्यासाठी आपल्याला भूतकाळातील अशा आठवणी दूर ठेवाव्या लागतील, ज्यामुळे आपल्यात दूरावा आणि भेद निर्माण झाला होता.
दक्षिण आशियाई सिंफनी ऑर्केस्ट्रामध्ये अनेक दक्षिण आशियाई देशांमधले कलावंत आहेत याचा मला विशेष आनंद होतो आहे. हा ऑर्केस्ट्रा म्हणजे वेगवेगळे नागरिकत्व असलेल्या बंधु-भगिनींचा एक असा समुदाय आहे जो संगीताच्या माध्यमातून सृजनाची निर्मिती करतो आहे. हा समुदाय शांततेची भाषा बोलतो. मनांना जोडतो आणि आपल्याला एकात्म अनुभवाकडे घेऊन जातो.
मात्र, आपण केवळ या कार्यक्रमानंतर थांबायला नको. दक्षिण आशियाई सिंफनी फाऊंडेशनने भारतीय संगीतावर आधारित नव्या सांगितिक रचना बनवायला हव्यात, ज्यात या प्रदेशाच्या संगीताचा अंतर्भाव असेल आणि त्या जगभर ऐकल्या जातील. आपण आशियाई प्रदेशातील रहिवाशी पाच हजार वर्ष जुन्या नागरी संस्कृतीचे वंशज आहोत. प्राचीन, गांधार आणि हिंदुकुश पर्वत रांगा, सिंधु आणि गंगा नदीचे पाणी सर्व शक्तीमान हिमालय पर्वत रांगांपासून ते बंगालच्या उपसागरापर्यंत आणि अरबी समुद्रापासून ते श्रीलंकेचा किनारा तसेच मालदीव आणि हिंदी महासागरापर्यंत पसरलेला हा विस्तीर्ण प्रदेश आहे. आपल्या या सांस्कृतिक परंपरेची श्रीमंती आणि सांगितिक वैभवाचा उत्सव आपण साजरा करायलाच हवा.
त्याचवेळी इतर प्रदेशातल्या महत्वाच्या शहरांमध्ये आणि त्या पलिकडेही हे कार्यक्रम व्हायला हवेत. आगामी काळात तुम्ही जगातल्या सर्वोत्कृष्ट ऑर्केस्ट्रामध्ये मानाचे स्थान मिळवाल आणि शांतता व सहअस्तित्वाचा संदेश जगात पोहोचवाल, असा मला विश्वास वाटतो.
या प्रदेशातील लहान मुले आणि युवकांसाठीही संगीताचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. या ऑर्केस्ट्रामध्ये अफगाणिस्तानच्या काबुलमधली काही मुले आहेत. त्या सर्वांनी संगीताला वाहून घेतले असून बाहेरच्या जगाशी ते संगीताच्या माध्यमातून संवाद साधत आहेत. त्यांच्या देशाला प्रसिद्धी आणि आदर मिळवून देत आपले प्राचीन वैभव पुन्हा मिळवण्यासाठी ही मुले काम करत आहेत. अफगाणिस्तानमध्ये गेली अनेक वर्षे युद्घ आणि दहशतवादामुळे विस्कळीत झालेल्या आयुष्याला पुन्हा उभारी देण्याचा हा प्रयत्न म्हणजे मानवाच्या इच्छाशक्तीचे उदाहरण आहे. या मुलांना आणि त्यांचे धाडसी शिक्षक डॉ. अहमद सरमस्त यांना मी सलाम करतो.
दक्षिण आशियाई सिंफनी ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून आपण हीच भावना आणि इच्छाशक्ती जगात पोहचवायला हवी, यातून शांतता आणि अहिंसेचा संदेश प्रभावीपणे मांडत भरकटलेल्या व्यक्तींच्या मनावर दाटलेले मळभ स्वच्छ करायला हवे.
या ऑर्केस्ट्राचे सदस्य दक्षिण आशियातल्या या नव्या पर्वाचे दूत म्हणून काम करू शकतात. शांतता, करूणा आणि सहअस्तित्वाच्या तत्त्वांवर आज उभारण्यात आलेल्या एका महान संस्कृतीचे आपण पाईक आहोत. आपल्या या संस्कृतीचा गाभा आपण पुन्हा एकदा मिळवायला हवा, या सामायिक संस्कृतीतून आपण पुन्हा एकदा संघटीत व्हायला हवे.
या ऑर्केस्ट्राच्या सर्व कलावंतांना माझ्या खूप शुभेच्छा! ऑर्केस्ट्राचे संचालक विश्व सुब्बारामन आणि संस्थापक निरुपमा आणि सुधाकर राव यांनी दक्षिण आशियाई प्रदेशात शांतता, मानवता आणि सहकार्य वृद्धींगत व्हावे यासाठी सुरू केलेल्या या प्रयत्नांना मी खूप शुभेच्छा देतो.
जय हिंद!
***
B.Gokhale/R.Aghor/P.Kor
(Release ID: 1571231)
Visitor Counter : 166