शिक्षण मंत्रालय
भारताची बौद्धिक क्षमता, नवोन्मेष आणि धोरणातील सातत्य नवीन ऊर्जा भविष्य घडवण्यात सहाय्यकारी ठरेल :केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान
" येत्या काही वर्षात भारताला उच्च शिक्षणात आत्मनिर्भर बनवण्याचे ध्येय आपण ठेवले आहे": केंद्रीय शिक्षण मंत्री
Posted On:
27 MAR 2022 9:26PM by PIB Mumbai
भारताची बौद्धिक क्षमता, नवोन्मेष आणि धोरणातील सातत्य हे जागतिक ऊर्जा संक्रमणाला चालना देईल आणि नवीन ऊर्जा भविष्य घडवण्यात योगदान देईल, असे केंद्रीय मंत्री श्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले. भारत सध्या ऊर्जा आयात करणारा देश असला तरी येत्या काही वर्षांत ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशात सौर ऊर्जा, जैव-ऊर्जा आणि हायड्रोजन ऊर्जा यांसारख्या शाश्वत हरित ऊर्जा स्रोतांचा शोध घेतला जात आहे, असे ते म्हणाले. आज मुंबईत आयोजित लोकसत्ता तरुण तेजांकित पुरस्कार 2021 च्या वितरण समारंभात मंत्र्यांनी यासंदर्भात माहिती दिली.
भारताच्या ज्ञानाचा जगाला कसा फायदा झाला आणि ज्ञानाची देवाणघेवाण हा दुहेरी मार्ग म्हणून कसा तयार झाला यावर मंत्र्यांनी भर दिला.ब्रेन ड्रेन संदर्भातील प्रश्नाचे उत्तर देताना,केंद्रीय मंत्री म्हणाले की, आपल्याला ब्रेन ड्रेन परिस्थितीचे ब्रेन बँक परिस्थितीत रूपांतर करून देशाला ज्ञानाचे भांडार बनवायचे आहे.“21 वे शतक भारतासाठी मोठी संधी आहे. देशाची क्रयशक्ती वाढली आहे आणि परिणामी आपल्याला देशातच मोठ्या बाजारपेठा उपलब्ध होणार आहेत” हे नवोन्मेषींना देशातच राहण्यासाठी आणि भारतीय बाजारपेठा शोधण्यासाठी प्रोत्साहित करेल, असे ते म्हणाले.
भारतात उच्च शिक्षणासाठी अधिक संधी निर्माण करणे, शिक्षणातील सुधारणा, शिक्षणाला रोजगाराशी संलग्न करणे आणि शिक्षण परवडणारे, सर्वसमावेशक आणि न्याय्य बनविण्याची दीर्घकालीन उद्दिष्टे साध्य करण्याच्या प्रयत्नांची शिक्षणमंत्र्यांनी माहिती दिली.
उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत प्रश्न विचारला असता, शिक्षणमंत्र्यांनी सांगितले की, देशात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या चार कोटी आहे. आगामी दहा वर्षांत ही संख्या 10 कोटींवर पोहोचणार आहे.या क्षेत्रातही आत्मनिर्भर होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.नजीकच्या भविष्यात, आपल्या भारतीय विद्यार्थ्यांना देशातच शिक्षण देण्यासाठी आपल्याला पुरेशा सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागतील.”
नवीन शैक्षणिक धोरण कौशल्य विकास आणि उद्यमशीलता यावर लक्ष केंद्रित करते, असे केंद्रीय मंत्री म्हणाले. आपली शिक्षण व्यवस्था केवळ पदवी-आधारित किंवा नोकरी -आधारित राहू नये, असे त्यांनी सांगितले.
***
ST/SC/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1810368)
Visitor Counter : 185