लोकसभा सचिवालय
azadi ka amrit mahotsav

आर्थिक पारदर्शकता, उत्तरदायित्त्व आणि जनतेचा विश्वास वृद्धिंगत होण्यामध्ये सनदी लेखापाल अविभाज्य भागीदार आहेतः लोकसभा सभापती

Posted On: 29 NOV 2026 6:27PM by PIB Mumbai

 

लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आर्थिक पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि जनतेचा विश्वास यांचा पाया बळकट करण्यात सनदी लेखापालांच्या महत्त्वाच्या भूमिकेवर भर दिला आणि भारताच्या आर्थिक प्रगतीतील त्यांचे व्यावसायिक कौशल्य आणि नैतिक बांधिलकी अविभाज्य असल्याचे म्हटले आहे. लेखापाल वर्गाला आपल्या व्यावसायिक क्षमता सातत्याने बळकट करण्याचे, उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या परिवर्तन क्षमतेचे आणि विशेषतः वेगाने बदलणाऱ्या जागतिक परिस्थितीत उद्योगांना योग्य आर्थिक मार्गदर्शन करण्याचे आवाहन केले. आज नवी दिल्लीत, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटस् ऑफ इंडिया (आयसीएआय) च्या उत्तर भारत प्रादेशिक परिषदने आयोजित केलेल्या प्रादेशिक परिषदेला संबोधित करताना त्यांनी ही निरीक्षणे नोंदवली.

देशाच्या आर्थिक आणि संस्थात्मक विकासासाठी सनदी लेखापालांनी दिलेल्या व्यापक योगदानावर भर देताना, बिर्ला यांनी त्यांची भूमिका ही केवळ लेखापालन, लेखापरीक्षण आणि आर्थिक व्यवस्थापन यांसारख्या पारंपरिक क्षेत्रांपुरती मर्यादित नसल्याचे नमूद केले. त्यांच्या विश्लेषणात्मक दृष्टी, व्यावसायिक सचोटी, धोरणात्मक सल्ला आणि नेतृत्वाच्या माध्यमातून संस्थात्मक कार्यक्षमता वाढवणे, गुंतवणूकदारांचा विश्वास दृढ करण्यात आणि व्यावसायिक तसेच आर्थिक प्रणालींची विश्वासार्हता बळकट करण्यात मोलाचे योगदान देतात. त्यांनी नमूद केले की भारतीय सनदी लेखापालांनी जागतिक पातळीवरील विविध संस्थांमध्ये अगदी सर्वोच्च पदांपर्यंत मानाची पदे मिळवली आहेत, त्यामधून भारतातील व्यावसायिक विशेष कौशल्यांना, सक्षमता आणि व्यवस्थापकीय उत्कृष्टतेला जागतिक मान्यता मिळाल्याचे दिसून येते.

बिर्ला यांनी गेल्या अनेक दशकांपासून व्यावसायिक उत्कृष्टता, शिस्त, सचोटी आणि विश्वासार्हता यांचा समृद्ध वारसा जपल्याबद्दल आयसीएआयची प्रशंसा केली. 1949 मध्ये संसदेच्या कायद्याद्वारे या संस्थेची स्थापना झाल्याचे स्मरण करून देतानाच, संस्थेच्या कठोर परीक्षा आराखड्याचे आणि सक्षमता, नैतिक आचरण आणि व्यावसायिक निकषांवर विशेष भर दिल्याबद्दल त्यांनी संस्थेचे कौतुक केले. त्याची मुलगी देखील सनदी लेखापाल असल्याचे नमूद करतानाच त्यांनी या पात्रतेसाठी आवश्यक चिकाटी, शिस्त, बौद्धिक काटेकोरपणा आणि सातत्यपूर्ण वचनबद्धता यांचा उल्लेख केला शिवाय हा व्यवसाय समर्पण आणि आयुष्यभर शिकत राहाण्याच्या वृत्तीचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन केले.

जागतिक आर्थिक व्यवस्थेला, वेगाने होणारी तांत्रिक प्रगती आणि उदयोन्मुख व्यावसायिक आराखड्यांमुळे नवीन आकार मिळत असल्याचे निरीक्षण नोंदवून बिर्ला यांनी सनदी लेखापालांनी समकालीन घडामोडींची अद्ययावत माहिती ठेवण्याची आणि आपले ज्ञान व व्यावसायिक कौशल्ये सातत्याने समृद्ध करण्याची गरज असल्याचे अधोरेखित केले. त्यांनी नमूद केले की कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल व्यासपीठ आणि तांत्रिक नवोन्मेष यांच्यामुळे आर्थिक सेवा, व्यावसायिक कार्यचालन आणि व्यावसायिक पद्धती यांचे स्वरूप बदलत आहे. त्यांनी या लेखापाल वर्गाला आवाहन केले की, त्यांनी या प्रगतीचा सक्रिय स्वीकार करावा आणि आर्थिक व्यवस्थापना, प्रक्रिया सुविहित करू शकतील, कार्यक्षमता वृद्धिंगत करू शकतील आणि उद्योग व समाजाला अधिक परिणामकारकता प्रदान करू शकतील असा नाविन्यपूर्ण उपयोजनांचा शोध घ्यावा.

भारताच्या पुरोगामी आर्थिक धोरणांमुळे, स्थिर सरकार आणि विकासावर सातत्यपूर्ण लक्ष केंद्रित केल्यामुळे देशाची प्रतिष्ठा लक्षणीयरित्या वाढली आहे आणि जागतिक गुंतवणूकदार आणि व्यावसायिक समुदायांमध्ये दृढविश्वास निर्माण होऊ शकला आहे याकडे बिर्ला यांनी लक्ष वेधले. सनदी लेखापालांनी आर्थिक प्रणाली, व्यावसायिक व्यवस्थापन, संस्थात्मक प्रशासन आणि धोरण सल्ला यांमदील कौशल्याद्वारे वाढत्या विश्वासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे, असे ते म्हणाले.  संसदीय समित्यांसमवेतच्या त्यांच्या रचनात्मक सहभागाचे कौतुक करताना, त्यांनी नमूद केले की त्यांचा व्यावसायिक दृष्टीकोन आणि सूचना यांच्यामुळे कायदेविषयक आणि वित्तीय बाबींवरील चर्चा समृद्ध झाली आहे, त्यामुळे अधिक सोपे, अधिक पारदर्शक आणि सुलभ कायदे आणि कर तरतुदी तयार करण्यात मदत झाली आहे.

***

शैलेश पाटील/विजयालक्ष्मी साळवी/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2343582) अभ्यागत कक्ष : 3