युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

फिट इंडिया संडेज ऑन सायकल उपक्रमाच्या ऐतिहासिक 100 व्या पर्वाच्या आयोजनात केंद्रीय क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या हस्ते देशातल्या पहिल्या ऑलिंपिक चित्रपटाचे प्रकाशन


पंतप्रधान मोदी यांची फिट इंडिया संकल्पनेने आता मूर्त स्वरुप धारण केले आहे: डॉ. मनसुख मांडविया

देशाचे ऑलिंपिक आयोजनाचे स्वप्न साकार करण्यासाठी पुण्यात 50,000 सायकलपटूंनी चालवली सायकल

माय भारतच्या सहकार्याने देशभरातील प्रत्येक जिल्ह्यात संडेज ऑन सायकल उपक्रम साजरा

देशात ऑलिंपिक मूल्यांचा प्रसार करण्यासाठी 100 प्रसिद्ध ठिकाणी 100 ऑलिम्पियन खेळाडूंनीही चालवली सायकल

Posted On: 29 NOV 2026 12:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 नोव्‍हेंबर 2026

 

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी आज पुण्यात आयोजित फिट इंडिया संडेज ऑन सायकल उपक्रमाच्या ऐतिहासिक 100 व्या पर्वात देशातील पहिल्या ऑलिंपिक  चित्रपटाचे प्रकाशन केले. या चित्रपटात अभिनेता आयुष्मान खुराना तसंच मीराबाई चानू, शीतल देवी आणि स्मृती मंधाना यांसारख्या दिग्गज क्रीडापटूंचा सहभाग आहे.

या चित्रपटाच्या माध्यमातून भारताच्या ऑलिंपिक  मोहिमेचाही प्रारंभ झाला. इंडिया रेडी फॉर ऑलिंपिक्स अर्थात भारत ऑलिंपिक साठी सज्ज ही या मोहिमेची संकल्पना आहे. या चित्रपटातून देशभरातील क्रीडा क्षेत्रातले परिवर्तन आणि 2036 च्या ऑलिंपिक  स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याबद्दलच्या देशाच्या महत्त्वाकांक्षेची मांडणी करण्यात आली आहे.

यावेळी डॉ. मनसुख मांडविया यांनी उपस्थितांना संबोधितही केले. इंडिया संडेज ऑन सायकल या उपक्रमाच्या 100 व्या पर्वात पुण्यातून 50,000 पेक्षा जास्त सायकलपटू सहभागी झाले असल्याचे त्यांनी सांगितले. देशभरातील 40,000 ठिकाणी या उपक्रमाचे आयोजन केले गेले असल्याची माहिती त्यांनी दिली. 2047 पर्यंत विकसित भारत घडवण्यासाठी सुदृढ आणि आरोग्य संपन्न राष्ट्राची जडणघडण गरजेची आहे, आणि त्यासाठीच देशाच्या युवावर्गाने शारिरीक सुदृढतेचा मार्ग अंगिकारला असल्याचेही त्यांनी सांगितले. या उपक्रमासाठी विक्रमी 56,000 इतकी नोंदणी झाली, या नोंदणीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेली फिट इंडिया अर्थात सुदृढ भारताच्या संकल्पनेला मूर्त रुप मिळाले असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.

भारत 2036 च्या ऑलिंपिक स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याच्या शर्यतीत आहे. भारताच्या या दाव्याला पाठबळ मिळावे, यासाठी, 100 व्या संडेज ऑन सायकल उपक्रमाचे आयोजन केल्याची माहिती डॉ. मांडविया यांनी दिली. यानिमित्ताने आज आपण केवळ सायकल चालवत नसून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र भूमीतून संपूर्ण देशाला शारीरिक सुदृढतेचा एक दृढ संदेश देत आहोत, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. सायकलच्या पॅडलवरचे प्रत्येक पाऊल आपल्याला विकसित भारताच्या संकल्पपूर्तीच्या अधिक जवळ नेत असल्याचे ते म्हणाले. पुण्याला फिट इंडिया अर्थात सुदृढ भारत चळवळीशी जोडल्याबद्दल डॉ. मांडविया यांनी महाराष्ट्राचे विधानसभा सदस्य महेश लांडगे यांचे मनःपूर्वक आभारही मानले.

या उपक्रमाच्या निमित्ताने 50,000 सायकलपटूंच्या उपस्थितीत चित्रपटाचा प्रकाशन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी भारतीय ऑलिंपिक  संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुराम अय्यर यांच्यासह प्रियांका गोस्वामी, जास्मिन लॅम्बोरिया, प्रीती पवार, संदीप कुमार, आशिष कुमार चौधरी आणि श्राबणी नंदा हे देशाचे ऑलिंपिक पटूही उपस्थित होते. युवा ऑलिंपिक  सुवर्णपदक विजेता आंबेकर मैतेई, आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेती सुचिका तरियाल, तायक्वांदो खेळाडू कशिश मलिक, ट्रॅक सायकलपटू डेव्हिड बेकहॅम एल्काटोचोंगो आणि गिर्यारोहक बलजित कौर हे देखील या सोहळ्यात सहभागी झाले होते.

पुण्यात झालेल्या या या उपक्रमाअंतर्गत रिव्हर सायक्लोथॉन 2026 : वॉटर कन्झर्व्हेशन अँढ रिव्हर क्लिनलीनेस अर्थात जलसंवर्धन आणि नदी स्वच्छतेसाठी सायक्लोथऑन संकल्पनेअंतर्गत 25 किमी आणि 5 किमी सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या फेरीत सहभागी झालेल्यांनी जलसंवर्धन, नदी स्वच्छता आणि नशामुक्त भारताची शपथ घेतली. देशभरातील 100 प्रतिष्ठित ठिकाणी आणि प्रत्येक जिल्ह्यातही हा उपक्रम साजरा केला गेला. देशभरातील 600 पेक्षा जास्त जिल्ह्यांमधील 1.5 लाखांपेक्षा जास्त माय भारत (MY Bharat - Mera Yuva Bharat) स्वयंसेवक या सायकल रॅलींमध्ये सहभागी झाले होते.

100 व्या संडेज ऑन सायकल उपक्रमाच्या निमित्ताने दुर्गम ठिकाणी आयोजन केल्या गेलेल्या उपक्रमांचीही विशेष दखल घेतली गेली. या कार्यक्रमाअंतर्गत फिट चॅम्प्स आणि सायकलिंग क्लबचा सत्कार करण्यात आला, यासोबतच माय भारत विजेत्यांची घोषणाही करण्यात आली. या सोहळ्याच्या निमित्ताने शारिरीक सुदृढतेशी संबंधित तसेच आणि सामुदायिक सहभागाशी संबंधित इतर उपक्रमांचा प्रारंभ तसेच डॉ. मांडविया यांच्या हस्ते एका पुस्तकाचे प्रकाशनही झाले.

भारतीय ऑलिंपिक  संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुराम अय्यर यांनीही यावेळी आपले विचार मांडले. ऑलिंपिक साठी सज्ज होण्याकरता देशाला समर्पण, सातत्यासोबतच, आधीच्या आठवड्यात काहीही निकाल लागला असला तरी दर आठवड्याला पुन्हा मैदानात उतरण्याची मानसिकता अशा गुणांची गरज त्यांनी मांडली. संडेज ऑन सायकल हा उपक्रम याच गुणांचे नेमके प्रतिबिंब असल्याच्या शब्दांत त्यांनी या उपक्रमाचा गौरव केला.  उत्कृष्टता, आदर आणि मैत्री ही ऑलिंपिक च्या मूलभूत मूल्ये आहेत. संडेज ऑन सायकल हा उपक्रम याच मूल्यांना समर्पित आहे आणि तो साजरा करण्याच्या निमित्ताने देशात ऑलिंपिक चे आयोजन करण्याचे आपले स्वप्न साकार करण्याच्या दिशेने आपण एक पाऊल पुढे टाकले आहे असं म्हणत याबद्दलचा आनंद त्यांनी व्यक्त केला.

या आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या ऑलिंपिक  संघटनेनं आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या भावी यजमान आयोगाच्या (IOC Future Host Commission) सदस्यांशी संवाद साधला होता, अशी माहिती अय्यर यांनी दिली. भारत आणि अहमदाबाद हे केवळ 2030 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचेच नव्हे, तर 2036 च्या ऑलिंपिक चेही यजमानपद भूषवण्यासाठी कशा तऱ्हेने सज्ज आहेत, याचं सादरीकरण केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया आणि ऑलिंपिक  संघटनेनं आयोगासमोर केल्याचं त्यांनी सांगितलं. भारत आधीपासून मोठ्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करत आला आहे आणि आगामी काळात अशा आणखी अनेक स्पर्धांचे आयोजन करणार असल्याचंही आयोगासमोर अधोरेखित केल्याची माहितीही त्यांनी दिली.

17 डिसेंबर 2024 रोजी पोल्युशन का सोल्यूशन अर्थात प्रदूषणावरील उपाययोजना या संदेशासह संडेज ऑन सायकल हा उपक्रमाला प्रारंभ झाला होता. आता संडेज ऑन सायकल ही एक देशव्यापी तंदुरुस्ती चळवळ बनली आहे. या उपक्रमाच्या आजवरच्या 100 पर्वांच्या आयोजनात 40 लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवला आहे. या उपक्रमाअंतर्गत आता 7,500 पेक्षा जास्त फिट इंडिया नमो सायकलिंग क्लब कार्यरत असून, सुमारे 10,000 ठिकाणी दर आठवड्याला विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे.

 

* * *

राधिका अघोर/तुषार पवार/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2343434) अभ्यागत कक्ष : 3