संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

खडकवासला येथील एनडीएमध्ये 151 व्या तुकडीच्या शरद ऋतु सत्र 2026 च्या दीक्षांत संचलनाचे संरक्षण मंत्र्यांकडून अवलोकन


भावी लष्करी नेतृत्वाने नवोपक्रमाची संस्कृती जोपासण्याची गरज, राष्ट्रीय सुरक्षेच्या आव्हानांसाठी स्वदेशी उपाययोजना अनिवार्य: राजनाथ सिंह

Posted On: 29 NOV 2026 11:24AM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 नोव्‍हेंबर 2026

 

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 29 नोव्हेंबर 2026 रोजी महाराष्ट्रातील खडकवासला इथल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एनडीए) 151 व्या तुकडीच्या शरद ऋतू सत्र 2026 च्या दीक्षांत संचलनाचे अवलोकन केले. आपल्या भाषणात संरक्षण मंत्र्यांनी कठोर प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल उत्तीर्ण  प्रशिक्षणार्थी सैनिकांचे अभिनंदन केले. ज्यांच्या त्याग आणि शौर्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि जे देशाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करत आहेत, त्या भारताच्या स्वातंत्र्यसैनिकांचा आणि संरक्षण दलातील जवानांचा समृद्ध वारसा पुढे नेण्याचे आवाहन त्यांनी  प्रशिक्षणार्थी सैनिकांना केले.

वेगाने बदलणाऱ्या जागतिक सुरक्षा वातावरणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आव्हानांवर स्वदेशी उपाय शोधण्याच्या गरजेवर भर देत, राजनाथ सिंह यांनी भावी लष्करी नेत्यांना नवोन्मेष आणि संशोधक संस्कृती जोपासण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, जग महत्त्वपूर्ण भू-राजकीय बदल आणि तांत्रिक प्रगती अनुभवत आहे, ज्यामुळे युद्धाचे स्वरूपच बदलून गेले आहे. संघर्ष आता केवळ जमीन, समुद्र आणि आकाशापुरते मर्यादित राहिलेले नाहीत, तर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या भूमिकेसह संगणकीय अवकाश आणि अंतराळ यांसारख्या नवीन क्षेत्रांपर्यंत विस्तारत आहेत. प्रशिक्षण पद्धती काळानुसार विकसित होत असली तरी, आजचे तंत्रज्ञान उद्या कालबाह्य होऊ शकते हे लक्षात घेऊन  प्रशिक्षणार्थी सैनिकांनी सतत शिकण्याची वृत्ती जोपासली पाहिजे.

भारताच्या लोकसंख्याशास्त्रीय बदलांवर बोलताना संरक्षण मंत्र्यांनी असे प्रतिपादन केले की, देशाने अशा भविष्यासाठी तयार राहिले पाहिजे जिथे तांत्रिक क्षमता आणि यंत्रशक्ती मनुष्यबळाला अधिकाधिक पूरक ठरतील. देशाची क्षमता बळकट करण्यासाठी आणि भारताला जागतिक स्तरावर आघाडीवर नेण्यासाठी तरुणांनी बुद्धिमत्ता आणि मनुष्यबळ यांचा समन्वय साधण्याचे आवाहन त्यांनी केले.

राजनाथ सिंह यांनी लष्करी नेतृत्वात विश्वास आणि सांघिक कार्य याच्या महत्त्वावर भर दिला. सैनिक आपल्या नेत्यांचे अनुसरण केवळ त्यांच्या पदामुळे किंवा अधिकारामुळे करत नाहीत, तर ते निर्माण करत असलेल्या विश्वास आणि आदरामुळे करतात, असे त्यांनी सांगितले.  प्रशिक्षणार्थी सैनिकांनी आपल्या सहकारी सैनिकांना कुटुंबाप्रमाणे वागवावे, कठीण काळात त्यांच्या पाठीशी उभे राहावे आणि आव्हानात्मक परिस्थितीत धैर्य व संयमाने आपल्या तुकडीचे नेतृत्व करावे, असे आवाहन त्यांनी केले. लष्करी जीवनात शारीरिक तंदुरुस्ती आणि धैर्य आवश्यक असले तरी मानसिक सामर्थ्य, संयम आणि आत्मविश्वासही तितकेच महत्त्वाचे आहेत, असे त्यांनी अधोरेखित केले.

भावी लष्करी नेते घडवण्यातील योगदानाबद्दल संरक्षण मंत्र्यांनी प्रशिक्षणार्थी सैनिकांचे कुटुंबीय आणि प्रशिक्षकांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, जेव्हा मुले देशाची सेवा करण्यासाठी लहान वयात घर सोडतात, तेव्हा कुटुंबांनाही अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते.  प्रशिक्षणार्थी सैनिकां नी आपल्या कुटुंबांनी त्यांच्यावर दाखवलेल्या विश्वासाचा सन्मान केला पाहिजे आणि आपले पालक, मार्गदर्शक व देशाचा गौरव वाढवला पाहिजे.

मित्र राष्ट्रांतील उत्तीर्ण  प्रशिक्षणार्थी सैनिकांना उद्देशून राजनाथ सिंह यांनी भारतीय  प्रशिक्षणार्थी सैनिकांसोबतच्या त्यांच्या सहभागाचे वर्णन दोन्ही देशांमधील मजबूत संरक्षण संबंध आणि मैत्रीच्या बंधांचे प्रतिबिंब असे केले. एनडीएमध्ये रुजवलेली मूल्ये, सौहार्द आणि परस्पर आदराची भावना ते पुढे नेतील आणि सद्भावना व शांततेचे दूत म्हणून काम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या संचलनात एकूण 1,250 प्रशिक्षणार्थी सैनिक सहभागी झाले होते, ज्यात उत्तीर्ण होणाऱ्या तुकडीतील 369 प्रशिक्षणार्थी सैनिकांचा समावेश होता. त्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने अंतिम पग अर्थात टप्पा ओलांडला, जे त्यांच्या प्रशिक्षणाच्या पुढील टप्प्यात पाऊल ठेवण्याचे प्रतीक आहे.  अॅड्युटंट लेफ्टनंट कर्नल अविनाश पांडे यांनी त्यांच्या रिलायंट रॉबिन या अश्वावर स्वार होऊन या संचलनाचे आयोजन केले. किलो स्क्वाड्रनचे अकादमी प्रशिक्षणार्थी सैनिक कॅप्टन (एसीसी) सार्थकराज सागर पाटील यांनी या संचलनाचे नेतृत्व केले.

एनडीएमधील प्रशिक्षणार्थी सैनिकांनी लष्करी प्रशिक्षणाचा सर्वोच्च दर्जा दर्शवणारे सादरीकरण केले. निरीक्षण अधिकाऱ्यांनी सर्वसाधारण गुणवत्ता यादीत प्रथम आल्याबद्दल बटालियन प्रशिक्षणार्थी सैनिक कॅप्टन अंकित कुमार सिंह यांना राष्ट्रपतींचे सुवर्णपदक, द्वितीय आल्याबद्दल अकादमी प्रशिक्षणार्थी सैनिक  कॅप्टन सार्थकराज सागर पाटील यांना राष्ट्रपतींचे रौप्यपदक आणि तृतीय आल्याबद्दल अकादमी  प्रशिक्षणार्थी सैनिक  अॅड्युटंट ऋषी यांना राष्ट्रपतींचे कांस्यपदक प्रदान केले.

सुखोई-30  लढाऊ विमानांच्या दिमाखदार फ्लायपास्टने या समारंभाची सांगता झाली. हा सोहळा पाहण्यासाठी पालक, मान्यवर, शालेय मुले, नागरिक आणि सेवेत असलेले तसेच निवृत्त अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी एनडीएचे कमांडंट व्हाइस अॅडमिरल अनिल जग्गी आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पदवी संपादन केल्यानंतर हे प्रशिक्षणार्थी सैनिक एनडीएचे अभिमानी माजी विद्यार्थी म्हणून आपापल्या प्री-कमिशनिंग प्रशिक्षण अकादमी किंवा सेवांमध्ये सामील होतील आणि उत्कृष्टता, सर्वसमावेशकता व देशसेवेचा समृद्ध वारसा पुढे नेतील.

यानिमित्ताने संरक्षण मंत्र्यांनी हट ऑफ रिमेम्बरन्स येथे आदरांजली वाहिली. हट ऑफ रिमेम्बरन्स हे एनडीएचे पवित्र स्थान आहे. 10 व्या ते 17 व्या तुकडीच्या प्रशिक्षणार्थी सैनिकांनी श्रमदानातून बांधलेले हे स्मारक दुसरे महायुद्ध आणि स्वातंत्र्यानंतर जम्मू-काश्मीरमधील मोहिमांदरम्यान भारतीय सैनिकांच्या सर्वोच्च बलिदानाचे स्मरण करते. नंतर ते सर्वोच्च बलिदान देणाऱ्या एनडीएच्या माजी अधिकाऱ्यांचे जिवंत स्मारक बनले आणि एनडीएतील प्रशिक्षणादरम्यान दुर्दैवाने निधन झालेल्या  प्रशिक्षणार्थी सैनिकांच्या स्मृतीही यात जपल्या गेल्या आहेत.

   

 

* * *

राधिका अघोर/नितीन गायकवाड/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2343410) अभ्यागत कक्ष : 7