Posted On:
28 NOV 2026 5:34PM by PIB Mumbai
नवी दिल्ली: 28 नोव्हेंबर 2026
भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या अखत्यारीतील, 'डॉ. आंबेडकर फाउंडेशन' (डीएएफ) या स्वायत्त संस्थेद्वारे सुधारित 'डॉ. आंबेडकर वैद्यकीय मदत योजना' राबवण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून, अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातील, गंभीर आणि दुर्धर आजारांनी ग्रस्त असलेल्या पात्र रुग्णांना 3.50 लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाते.
डीएएफ चे संचालक विनेश पचनंदा यांनी दिलेल्या माहितीनुसार, विशेष आरोग्य सेवांची उपलब्धता वाढविणे आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांवरील वैद्यकीय उपचारांचा आर्थिक भार कमी करणे हा 2 जून 2026 रोजी अधिसूचित केलेल्या सुधारित योजनेचा उद्देश आहे. आर्थिक अडचणींमुळे आवश्यक वैद्यकीय उपचार मिळण्यात किंवा शस्त्रक्रियेत कोणताही अडथळा येऊ नये, हे या योजनेच्या माध्यमातून सुनिश्चित करण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.
योजनेतील सुधारित तरतुदींनुसार, ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपयांच्या आत आहे, अशा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींमधील व्यक्ती, या आर्थिक मदतीसाठी अर्ज करण्यास पात्र असल्याचे पचनंदा यांनी सांगितले .
या योजनेमध्ये अवयव प्रत्यारोपण, मणक्याची शस्त्रक्रिया आणि वैद्यकीय किंवा शस्त्रक्रियेद्वारे उपचार आवश्यक असलेल्या इतर दुर्धर आजारांशिवाय मूत्रपिंड, हृदय, यकृत, मेंदूशी संबंधित गंभीर आजार तसेच कर्करोगावरील उपचारांसाठीच्या मदतीचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
या योजनेअंतर्गत, शस्त्रक्रिया किंवा संबंधित उपचारांसाठी येणारा अंदाजे खर्च विहित आर्थिक मर्यादेपर्यंत असल्यास त्याची 100% रक्कम संबंधित रुग्णालयाला दिली जाते, असेही पचनंदा यांनी सांगितले.
या योजनेंतर्गत हृदय शस्त्रक्रियेसाठी 1.50 लाख रुपये, मूत्रपिंड (किडनी) शस्त्रक्रिया किंवा डायलिसिससाठी 3.50 लाख रुपये, कर्करोग शस्त्रक्रिया, केमोथेरपी किंवा रेडिओथेरपीसाठी 2.50 लाख रुपये, मेंदूच्या शस्त्रक्रियेसाठी 2 लाख रुपये, मूत्रपिंड किंवा अवयव प्रत्यारोपणासाठी 3.50 लाख रुपये, मणक्याच्या शस्त्रक्रियेसाठी 1.50 लाख रुपये आणि इतर जीवघेण्या आजारांसाठी 2 लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत मिळू शकते, असे संचालकांनी स्पष्ट केले.

या योजनेमध्ये अवयव प्रत्यारोपण आणि मणक्याच्या शस्त्रक्रियेसह गंभीर व जीवघेण्या आजारांवरील उपचारांच्या सुविधा उपलब्ध असलेली जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणच्या तसेच प्रमुख शहरांमधील सरकारी रुग्णालयांचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
पात्र लाभार्थींना वैद्यकीय मदतीसाठी डॉ. आंबेडकर फाउंडेशनच्या अधिकृत वेबसाइटवर-https://www.dosje.gov.in/schemes-and-services/dr-ambedkar-medical-aid-scheme/ उपलब्ध असलेल्या विहित अर्जाद्वारे अर्ज करता येऊ शकेल.
किंवा विहित नमुन्यात नमूद केल्याप्रमाणे आवश्यक तपशील असलेला अर्ज साध्या कागदावरही सादर करता येईल असेही डीएएफच्या संचालकांनी कळवले आहे.
सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे, पात्रता निकष, मान्यताप्राप्त रुग्णालये आणि विहित अर्ज नमुन्यांसाठी, इच्छुक अर्जदार डॉ. आंबेडकर फाउंडेशनच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.
https://www.dosje.gov.in/schemes-and-services/dr-ambedkar-medical-aid-scheme/
***
राधिका अघोर/मंजिरी गानू/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com