Posted On:
28 NOV 2026 3:23PM by PIB Mumbai
महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI - Directorate of Revenue Intelligence) अलिकडच्या काळात वन्यजीवांच्या अवैध व्यापाराला आळा घालण्यासाठी आणि नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी अनेक कारवाया केल्या आहेत. संचालनालयाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे या कारवाया करण्यात आल्या. या कारवायांमध्ये महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातील पश्चिम घाट परिसरात सक्रिय असलेल्या दोन स्वतंत्र अवैध वन्यजीव तस्करीचे जाळे उघडकीला आणले. या कारवाईत सहा जणांना अटक करण्यात आली असून, संशयित नागराज सापाचे विष, मार्जार वंशीय प्राण्यांची कातडी आणि शिकारीसाठी वापरलेले शस्त्र जप्त करण्यात आले आहे.
ऑपरेशन व्हेनम शील्ड : पुण्यालगतच्या भागातून 2 लिटर नागराज सापाचे विष जप्त
शेअर बाजार व्यापाऱ्यातून समाजमाध्यमावरील एक प्रभावी व्यक्तिमत्व अशी ओळख निर्माण केलेली एक व्यक्ती, विषाचा अवैध व्यापार करत असल्याची गोपनीय माहिती महसूल गुप्तचर संचालनालयाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी 25 नोव्हेंबर 2026 रोजी कार्तिक पौर्णिमेच्या धार्मिक सोहळ्यादरम्यान पुण्यालगतच्या भागात सातत्यपूर्ण पाळत ठेवली. संशयित व्यक्ती तिथे एका मध्यस्थाला आणि संभाव्य खरेदीदाराला भेटणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती.

इंद्रायणी नदीजवळील मोठी गर्दी आणि अत्यंत कठीण भागातून मार्ग काढत अधिकाऱ्यांनी संशयितांचा बराच वेळ पायी पाठलाग केला आणि तिन्ही व्यक्तींना ताब्यात घेतले. यावेळी घेतलेल्या झडतीदरम्यान नागराज सापाचे सुमारे 2 लिटर विष असलेल्या दोन बाटल्या जप्त करण्यात आल्या. या पाठलागादरम्यान विष सांडल्याने महसूल गुप्तचर संचालनालयाच्या एका अधिकाऱ्याला इजाही झाली. जप्त केलेले विष आणि अटक केलेल्या तिन्ही व्यक्तींना संबंधित कायद्यांअंतर्गत पुढील तपास आणि खटल्यासाठी महाराष्ट्र वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ऑपरेशन फेलाइन व्हिजिल: नवी मुंबईत शिकारीसाठीच्या शस्त्रासह तीन वेगवेगळ्या मार्जार वंशीय प्राण्यांची कातडी जप्त
यासंदर्भात 26 नोव्हेंबर 2026 रोजी महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी करण्यात एक स्वतंत्र कारवाई केली. नवी मुंबईत वन्यजीव अवशेष विकण्याचे प्रयत्न होत असल्याबाबत अधिकाऱ्यांना समाजमाध्यमांवरून माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे, अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. अधिकाऱ्यांनी पनवेल परिसरात एका संशयिताला अडवले असता, त्याच्याकडे वाघ आणि साधारण बिबट्याचे दोन कातडे असलेली बॅग आढळली. अधिकाऱ्यांनी हे साहित्य जप्त केले. या संदर्भात अधिक चौकशी केल्यानंतर नवी मुंबईतील एका निवासी संकुलाची झडती घेतली गेली. या झडतीत दोन महिला रहिवाशांकडे संशयित चित्त्याचे एक कातडे आणि .177 कॅलिबरची ब्रेक बॅरल एअर रायफल सापडली. या रायफलने झाडलेल्या गोळीमुळे झालेली जखम, बिबट्याच्या कातड्यावर असल्याची शक्यता प्राथमिक तपासात आढळून आली आहे. या कारवाई अंतर्गत एकंदरीत वाघ, बिबट्या आणि चित्त्याचे प्रत्येकी एक अशी तीन कातडी, एअर रायफल आणि इतर अवशेष जप्त करण्यात आले आहेत. अटक केलेल्या तिन्ही व्यक्ती आणि जप्त केलेला मुद्देमाल पुढील तपासासाठी महाराष्ट्र वन विभागाच्या ताब्यात देण्यात आला आहे.



नागराज, वाघ, बिबट्या आणि चित्ता हे सर्व प्राणी वन्यजीव संरक्षण अधिनियम, 1972 च्या अनुसूची 1 अंतर्गत सूचीबद्ध आहेत आणि त्यांना सर्वोच्च कायदेशीर संरक्षण देण्यात आले आहे. या कायद्यान्वये या प्रजातींची शिकार करणे, त्यांना पकडणे आणि अनधिकृतपणे बाळगणे, तसेच या प्राण्यांचा, त्यांच्या अवयवांचा किंवा अवशेषांचा कोणताही व्यापार अथवा व्यवहार करण्यास मनाई आहे.
संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी, एकामागोमाग केलेल्या या कारवायांमधून संघटित वन्यजीव गुन्हेगारी टोळ्यांचे जाळे उद्ध्वस्त करण्याबद्दलची तसेच देशातील जैवविविधतेचे रक्षण करण्याबद्दलची महसूल गुप्तचर संचालनालयाची दृढ वचनबद्धता दिसून येते.
***
राधिका अघोर/तुषार पवार/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com