मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय सचिव डॉ.अभिलक्ष लिखी यांची नागपूरच्या मत्स्यविज्ञान महाविद्यालयाला भेट, मत्स्यव्यवसाय विभागाच्या विद्यार्थ्यांसोबत साधला संवाद


मत्स्यव्यवसाय, मत्स्यपालन, उद्योजकता आणि नील अर्थव्यवस्थेतील उदयोन्मुख संधीं केल्या अधोरेखित

मत्स्यव्यवसाय क्षेत्रासाठी समूह आधारित विकास तसेच तंत्रज्ञानाच्या वापरावर दिला भर

Posted On: 27 NOV 2026 5:42PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर 2026

केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव डॉ. अभिलक्ष लिखी यांनी महाराष्ट्रातील नागपूर इथल्या मत्स्यविज्ञान महाविद्यालयाला भेट दिली. या भेटीत त्यांनी मत्स्यव्यवसाय आणि मत्स्यपालन क्षेत्रातील भारताचे उपक्रम या विषयावर सादरीकरणही केले. या सादरीकरणातून लेखी यांनी या क्षेत्रातील महत्त्वाचे टप्पे आणि उदयोन्मुख संधी अधोरेखित केल्या. यासोबतच देशाच्या मत्स्यव्यवसाय क्षेत्राची वाढ, उदयोन्मुख संधी आणि भविष्यातील शक्यतांबाबत विद्यार्थ्यांशी संवादही साधला.

 

मत्स्यविज्ञान महाविद्यालय प्रत्यक्ष कामकाजाच्या स्वरुपातील प्रशिक्षणाद्वारे अनुभवाधारित शिक्षणाला प्रोत्साहन देत आले आहे. या महाविद्यालायत मत्स्य प्रजनन, उबवणी केंद्र आणि मत्स्यशेती व्यवस्थापन, तसेच मूल्यवर्धित प्रक्रिया यांसारख्या क्षेत्रांसंबंधीच्या शिक्षणाला स्मार्ट क्लासरूम अध्यापनाची जोड दिली गेली आहे.

मत्स्यव्यवसाय मूल्यसाखळी अधिक बळकट करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याची बाब लेखी यांनी आपल्या सादरीकरणातून अधोरेखित केली. मोठ्या प्रमाणावरील उत्पादनाचे आर्थिक फायदे मिळवून देण्यासाठी, उत्पादकता वाढवण्यासाठी तसेच उत्पादन, प्रक्रिया, विपणन आणि निर्यात या सर्व टप्प्यांवर एकात्मिक स्वरुपाच्या संधी निर्माण करण्यासाठी समूह आधारित विकासाच्या दृष्टिकोन कसा महत्त्वाचा आहे ही बाबही त्यांनी अधोरेखित केली.

संपूर्ण मूल्यसाखळीला बळकटी देण्याकरता, आधुनिक मत्स्यव्यवसाय विषयक पायाभूत सुविधांची गरज असल्याची मांडणी त्यांनी केली. याअंतर्गत स्मार्ट आणि एकात्मिक मत्स्यव्यवसाय बंदरे, मासळी उतरवण्याची आधुनिक केंद्रे, घाऊक आणि किरकोळ मासळी बाजार, शीतसाखळी सुविधा, वाहतूक आणि पुरवठा साखळीचे जाळे, प्रक्रिया केंद्रे आणि मूल्यवर्धित उत्पादन विकासाचा अंतर्भाव होतो असे त्यांनी सांगितले. शैवालाची लागवड, शोभिवंत जातीचे मत्स्यपालन आणि मोती उत्पादन या आणि अशाप्रकारच्या मत्स्यव्यवसाय क्षेत्रांतील विविध उदयोन्मुख संधींबाबतही त्यांनी सांगितले.

  

देशभरातील विविध मत्स्यविज्ञान महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील मत्स्यव्यवसाय विभागाचे विद्यार्थी, कृषी विज्ञान केंद्रे, भारतीय कृषी संशोधन परिषदेशी संलग्न संस्था आणि विविध राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या मत्स्यव्यवसाय विभागांचे प्रतिनिधी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

डॉ.लिखी यांनी महाराष्ट्रातील नागपूर येथील मत्स्यविज्ञान महाविद्यालयातील विविध सुविधांनाही भेट दिली. त्यांनी महाविद्यालयातील मत्स्यबीज केंद्र, उबवणी केंद्रे, प्रदर्शन आणि संग्रहालयाला भेट देऊन पाहणी केली. मत्स्यव्यवसाय तंत्रज्ञान संकुलालाही त्यांनी भेट दिली. देशांतर्गत मत्स्यव्यवसाय क्षेत्रासाठी संशोधन, प्रशिक्षण, रोगनिदान आणि प्रात्यक्षिक विषयक सेवांचे एकात्मिकरण घडवून आणणारी एक सर्वसमावेशक, एक खिडकी सुविधा म्हणून उपयुक्त ठरेल अशा स्वरुपात या महाविद्यालयाचे संकुल उभारले जात आहे. यासाठी केंद्रीय मत्स्यव्यवसाय आणि मत्स्यपालन पायाभूत सुविधा विकास निधी योजनेअंतर्गत 19.69 कोटी रुपये इतका खर्च केला जात आहे.

 

सुवर्णा बेडेकर/तुषार पवार/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2342694) अभ्यागत कक्ष : 3