संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

अबू धाबी येथे झालेल्या 14 व्या जेडीसीसी बैठकीत भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यात,आधुनिक संरक्षण उपकरणांच्या संयुक्त विकास आणि उत्पादनाला गती देण्यावर सहमती

Posted On: 26 NOV 2026 9:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर 2026

भारत आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) यांच्या संयुक्त संरक्षण सहकार्य समितीची (जेडीसीसी ) 14 वी बैठक 26 नोव्हेंबर 2026 रोजी अबू धाबी येथे पार पडली. या बैठकीचे सह-अध्यक्षपद संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह आणि संयुक्त अरब अमिरातीच्या संरक्षण मंत्रालयाचे अवर सचिव लेफ्टनंट जनरल इब्राहिम नासेर एम. अल अलावी यांनी भूषवले.

मे 2026 मध्ये पंतप्रधानांच्या संयुक्त अरब अमिराती दौऱ्यादरम्यान स्वाक्षरी करण्यात आलेल्या ‘भारत-यूएई धोरणात्मक संरक्षण भागीदारी आराखड्या’त निश्चित केलेल्या उपक्रमांना या बैठकीमुळे धोरणात्मक दिशा मिळाली. दोन्ही देशांनी संरक्षण उद्योग, संरक्षण क्षेत्रातील नवोन्मेष आणि प्रगत तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा, लष्करी प्रशिक्षण आणि सागरी सुरक्षा अशा विविध क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय संरक्षण सहकार्य अधिक दृढ करण्याचे मान्य केले. तसेच, पुढील पिढीतील संरक्षण उपकरणांचा संयुक्त विकास आणि संयुक्त उत्पादन यांना गती देण्यावरही सहमती दर्शवली.

पुढील जेडीसीसी  बैठक होईपर्यंतच्या काळात संरक्षण क्षेत्रातील सहकार्याच्या प्रगतीचा नियमितपणे आढावा घेण्याचे सह-अध्यक्षांनी ठरवले. भारतीय प्रतिनधीमंडळात संरक्षण विभाग, भारतीय सशस्त्र दले, राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रतिनिधींचा समावेश होता.

दोन्ही देशांतील उद्योगांमध्ये व्यवसायविषयक भागीदारी (B2B – बिझनेस-टू-बिझनेस) वाढवण्यासाठी भारतीय संरक्षण उद्योगाचे एक प्रतिनिधीमंडळही जेडीसीसी  प्रतिनिधीमंडळासोबत गेले होते. या बैठकीच्या निमित्ताने दोन्ही देशांच्या संरक्षण उद्योगांमध्ये व्यावसायिक संवादही आयोजित करण्यात आला होता. भारतीय संरक्षण उद्योगाच्या प्रतिनिधीमंडळाने तवाझुन इंडस्ट्रियल पार्कला  भेट दिली. तसेच, ‘तवाझुन इकॉनॉमिक कौन्सिल’च्या  प्रतिनिधींची भेट घेऊन संयुक्त अरब अमिरातीतील संरक्षण उद्योगांसोबत सहकार्याच्या संभाव्य संधींबाबत चर्चा केली.

संरक्षण सचिवांच्या नेतृत्वाखालील भारतीय प्रतिनिधीमंडळाने संयुक्त अरब अमिरातीचे संरक्षण व्यवहार राज्यमंत्री मोहम्मद बिन मुबारक फादेल अल मझरुई यांचीही सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही मान्यवरांनी आखाती आणि पश्चिम आशिया क्षेत्रातील बदलत्या भू-राजकीय परिस्थितीवर विचारांची देवाणघेवाण केली. तसेच, दोन्ही देशांमधील धोरणात्मक संरक्षण भागीदारी अधिक बळकट करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. संरक्षण सचिवांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा दिल्या.

यापूर्वी, संरक्षण सचिवांनी अबू धाबी येथील ‘वाहात अल करामा’ येथे जाऊन संयुक्त अरब अमिरातीच्या सेवेत देशासाठी प्राणांचे बलिदान दिलेल्या शूर सैनिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यात व्यापार आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीचा शतकानुशतकांचा इतिहास आहे. दोन्ही देशांतील जनतेमधील दृढ परस्परसंबंधांमुळे या मैत्रीला आणखी बळ मिळाले आहे. दोन्ही देशांमधील संबंध आता अधिक व्यापक झाले असून, त्यांना ‘धोरणात्मक भागीदारी’चा दर्जा मिळाला आहे. या भागीदारीत आता ‘धोरणात्मक संरक्षण भागीदारी’चाही समावेश झाला आहे.

 
 निलीमा चितळे/आशुतोष सावे/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2342308) अभ्यागत कक्ष : 4