57th International Film Festival of India 2026
20 – 28 Nov 2026

'टागो' हा चित्रपट घरासाठीचा शोध, मानवी दुर्बलता तसेच बळाचा वापर करण्याचे परिणाम यांचा मागोवा घेतो; 57 व्या इफ्फीमध्ये सादर झाला चित्रपटाचा जागतिक प्रीमियर

Posted On: 25 NOV 2026 7:43PMby PIB MumbaiRelease ID: 2341639Views: 4

गोवा, 25 नोव्‍हेंबर 2026

 

गोव्यात सुरु असलेल्या 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) पत्रसूचना कार्यालयाने (पीआयबी) आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत, दिग्दर्शक अलेक्झांडर अनिसीमोव्ह आणि सह-पटकथाकार, लेखक वेरोनिका ओझ्नोबिशिना यांनी टागो चित्रपटाविषयी अधिक माहिती दिली. इफ्फीमधील जागतिक चित्रपट विभागात या चित्रपटाचा जागतिक प्रीमियर सादर झाला. स्थानिक समुदायांतील बिगर-व्यावसायिक अभिनेत्यांना घेऊन तयार केलेला आणि जॉर्जियाच्या नैसर्गिक परिदृश्यांच्या पार्श्वभूमीवर घडणारा हा चित्रपट घर आणि आपलेपणा यांचा शोध, मानवी दुर्बलता, लिंगाधारित वैशिष्ट्ये तसेच संघर्षाला बळजबरी करून प्रतिसाद देण्याचे परिणाम यांचा मागोवा घेतो.

जॉर्जियामधील धुक्याने वेढलेल्या दुर्गम खेड्यात घडणारी ही कथा सुरु होते तेव्हा एका स्थानिक माणसाला नदीच्या किनाऱ्यावर तरुण अनोळखी माणूस सापडतो आणि तो त्याला घरी असलेली त्याची पत्नी आणि लहान मुलाकडे घेऊन येतो. त्या अनोळखी माणसाच्या अनपेक्षितपणे येण्याने, कुटुंबाचे आधीच दुर्बल असलेले अस्तित्व आणखी विस्कळीत होते आणि त्यातून घटनांची एक अशी मालिका सुरु होते जी त्या कुटुंबातील सदस्यांना अवघड आणि टोकाचे पर्याय निवडण्यासाठी भाग पाडते.

या चित्रपटातील लिंगाधारित वैशिष्ट्यांच्या चित्रणाबद्दल तसेच या कथेतील मुख्य स्त्री पात्राची होणारी भावनिक कोंडी याबद्दल बोलताना ओझ्नोबिशिना म्हणाल्या, “सर्वात पहिली गोष्ट जी आम्हाला या चित्रपटाद्वारे दाखवायची होती ती म्हणजे कोणत्याही स्त्रीला तिच्या दैनंदिन जीवनात ज्या कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो ती समजून घेण्यात जेव्हा पुरुष अयशस्वी होतो तेव्हा ती स्त्री स्वतःच्याच घरात कैदेत राहते.”

हा चित्रपट मुख्य पुरुष पात्रासमोर उभ्या राहणाऱ्या चढ-उतारांचा आणि त्याला प्रतिसाद देताना त्याच्यामध्ये उर्जेचा प्रचंड ओघ निर्माण झाल्यामुळे त्याला योग्य पर्यायाची निवड करणे कठीण होते, त्याचा देखील मागोवा घेतो असे ओझ्नोबिशिना यांनी स्पष्ट केले. त्यांनी आंतरिक लवचिकता आणि प्रतिकूल परिस्थितीचा सामना करताना आवश्यक असलेले सामर्थ्य यांचे महत्त्व सांगण्यावर अधिक भर दिला.

मुख्य पात्र संघर्षाला कसे सामोरे जाते, याविषयी बोलताना अनिसिमोव्ह यांनी सांगितले की, तो जुन्याच पद्धतीने म्हणजे बळाचा वापर करून आपल्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. विविध समाजांतील मानवी वर्तनाशी या गोष्टीची तुलना करताना त्यांनी नमूद केले की, कठीण परिस्थितीचा सामना करताना लोक अनेकदा बळाचा आधार घेतात. अशा मार्गाचा अवलंब केल्याचे काय परिणाम होतात, याचा चित्रपट वेध घेतो. तसेच, बळाचा वापर करून जीवनातील गुंतागुंतीच्या समस्या खरोखरच सुटू शकतात का, असा प्रश्नही उपस्थित करतो.

अनिसिमोव्ह यांच्या जॉर्जियातील प्रवासादरम्यान या चित्रपटाची कल्पना आकाराला आली. या प्रवासात त्यांनी सामान्य लोकांचे जीवन, त्यांच्या प्रेरणा आणि त्यांचे अनुभव घडवणाऱ्या परिस्थितींचे जवळून निरीक्षण केले. अशाच एका प्रवासात त्यांची भेट जॉर्जियातील एका रंगभूमीवरील अभिनेत्याशी झाली. त्यानंतर दोघांनी एकत्र येऊन ही कथा चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा निर्णय घेतला. चित्रपटासाठी स्थानिक समुदायांमधील हौशी कलाकारांची निवड करण्याचे त्यांनी ठरवले. त्यामुळे स्थानिक रहिवाशांचा सहभाग हा या चित्रपटाच्या निर्मितीतील महत्त्वाचा भाग ठरला.

चित्रपटातील मुख्य अभिनेत्री मॅग्डालेना बोल्क्वाद्झे यांची अनिसिमोव्ह यांच्याशी एका बस थांब्यावर भेट झाली. तिच्या व्यक्तिमत्त्वातील एका वेगळ्याच पैलूने त्यांचे लक्ष वेधून घेतले. तिच्या चेहऱ्यावर आणि भावमुद्रांमध्ये त्यांना एका शोकांतिकेची झलक जाणवली. कोणताही कृत्रिम आव न आणता कॅमेऱ्यातून तिच्या या भावना टिपता येतील, असे त्यांना वाटले. या अनपेक्षित भेटीतूनच अखेर तिची चित्रपटातील भूमिकेसाठी निवड झाली.

कलाकारांची निवड निश्चित करण्यापूर्वी चित्रपटाच्या चमुने स्थानिक रहिवाशांच्या शेकडो चित्रफितीही तयार केल्या होत्या. मर्यादित खर्चात चित्रपटाची निर्मिती करताना, आजूबाजूच्या समुदायांतील अधिकाधिक लोकांना हळूहळू या प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात आले. जॉर्जियातील नागरिकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल अनिसिमोव्ह यांनी विशेष कृतज्ञता व्यक्त केली. त्यांचे औदार्य आणि पाठिंब्यामुळे चित्रपट पथकाला वेशभूषेची व्यवस्था करता आली. तसेच, तांत्रिक आणि व्यवस्थापकीय नियोजनातही त्यांची मोठी मदत झाली.

हौशी कलाकार म्हणून काम करण्याचा अनुभव असलेल्या अभिनेता एगोर स्कोरोखोदोव्ह याने सांगितले की, योगायोगाने त्याची दिग्दर्शकाशी भेट झाली आणि त्यातूनच तो या चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेत सहभागी झाला.

इफ्फी या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आपला चित्रपट सादर करताना चमुने आनंद व्यक्त केला. जगभरातील विविध चित्रपट पाहण्याची आणि वेगवेगळ्या चित्रपटसृष्टींमधील विचारप्रवाह जाणून घेण्याची संधी मिळाल्याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले.

या पत्रकार परिषदेचे सूत्रसंचालन संदीप सुनील यांनी केले.

Read IFFILOID here: https://www.pib.gov.in/iffi/57/iffiLoid.aspx?yr=2026&lang=1&reg=48

 

* * *

पीआयबी मुंबई | गोपाळ चिप्‍पलकट्टी/संजना चिटणीस/आशुतोष सावे/दर्शना राणे


Great films resonate through passionate voices. Share your love for cinema with #IFFI2026 and #StoriesWithoutBorders. Tag us @pibindia on Instagram and @PIB_India on X, and we will help amplify your festival moments!

For accredited journalists, critics, bloggers, and vloggers seeking 1-on-1 interviews with filmmakers and festival juries, write to us at:
iffi.mediadesk@pib.gov.in with the subject line: Take One with PIB.


Official Release ID: 2341639
•
Media Centre: Goa
•
Festival Dates: Nov 20 – 28, 2026