उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

उपराष्ट्रपतींच्या हस्ते यवतमाळ येथे जवाहरलाल दर्डा यांच्या पूर्णाकृती कांस्य पुतळ्याचे अनावरण


जवाहरलाल दर्डा यांनी महाराष्ट्राचा औद्योगिक विकास आणि सार्वजनिक कल्याणामध्ये दीर्घकालीन योगदान दिले: उपराष्ट्रपती

Posted On: 25 NOV 2026 6:24PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर 2026

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज प्रियदर्शनी सहकारी सूत गिरणी, यवतमाळ, महाराष्ट्र येथे स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी, पत्रकार आणि लोकमत मीडिया ग्रुपचे संस्थापक जवाहरलाल दर्डा, यांच्या पूर्णाकृती कांस्य पुतळ्याचे अनावरण केले. तत्पूर्वी, उपराष्ट्रपतींनी यवतमाळ येथील प्रेरणा स्थळाला भेट दिली आणि दिवंगत जवाहरलाल दर्डा यांना आदरांजली वाहिली.

दर्डा यांचे जीवन देशभक्ती, सार्वजनिक सेवा आणि समाजाप्रति बांधिलकीचा एक उल्लेखनीय प्रवास असल्याचे सांगून उपराष्ट्रपतींनी त्यांना आदरांजली वाहिली. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील, विशेषतः 1942 च्या 'भारत छोडो' आंदोलनातील त्यांच्या योगदानाचे स्मरण करून, ते म्हणाले की, बाबूजी यांनी स्वातंत्र्यानंतरही मुत्सद्दी, लोकप्रतिनिधी, मंत्री आणि पत्रकार म्हणून राष्ट्रसेवा सुरूच ठेवली. महाराष्ट्राचा विकास, राष्ट्रीय एकता आणि जातीय सलोख्यासाठी दर्डा यांनी  दिलेले योगदान उपराष्ट्रपतींनी अधोरेखित केले.

ग्रामीण विकासाबाबत दर्डा यांच्या दृष्टिकोनावर प्रकाश टाकताना, उपराष्ट्रपती म्हणाले की, 'प्रियदर्शनी सहकारी सूत गिरणी' ही कापूस लागवड, वस्त्रनिर्मिती, रोजगार निर्मिती आणि ग्रामीण समृद्धी यांच्यातील महत्त्वाचा संबंध, याचे उत्तम उदाहरण आहे.

वस्त्रोद्योगाशी असलेल्या स्वतःच्या संबंधांचा संदर्भ देत, उपराष्ट्रपतींनी या क्षेत्रातील रोजगार निर्मिती आणि आर्थिक वाढीच्या प्रचंड क्षमतेवर प्रकाश टाकला.

छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बी.आर. आंबेडकर आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्त्वांच्या माध्यमातून भारताच्या राष्ट्रीय जीवनात महाराष्ट्राने दिलेल्या उल्लेखनीय योगदानाचेही उपराष्ट्रपतींनी स्मरण केले. त्यांनी सांगितले की, राष्ट्रीय स्वाभिमान, घटनात्मक मूल्ये आणि देशभक्तीची भावना यांमधील त्यांचे योगदान देशाला आजही प्रेरणा देत आहे.

दर्डा यांच्या आदर्शांप्रति पुन्हा एकदा कटिबद्ध राहण्याचे आवाहन करत, उपराष्ट्रपतींनी सर्व संबंधित घटकांना सहकारी चळवळ बळकट करण्याचे, शेतकऱ्यांना सक्षम करण्याचे आणि ग्रामीण भारतात रोजगाराच्या अर्थपूर्ण संधी निर्माण करण्याचे आवाहन केले. जवाहरलाल दर्डा यांचा वारसा समावेशक विकासासाठीच्या सामूहिक प्रयत्नांना प्रेरणा देत राहील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा, महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग, उच्च आणि  तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महाराष्ट्राचे मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड, लोकमत मीडिया ग्रुपचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे माजी खासदार डॉ. विजय दर्डा, माजी कॅबिनेट मंत्री आणि लोकमत मीडिया ग्रुपचे मुख्य संपादक राजेंद्र दर्डा, प्रियदर्शनी को-ऑपरेटिव्ह स्पिनिंग मिल लिमिटेडचे उपाध्यक् कीर्ती गांधी, दर्डा कुटुंबातील सदस्य, सहकारी क्षेत्रातील प्रतिनिधी, शेतकरी, कामगार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.


नितीन फुल्लुके /राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2341458) अभ्यागत कक्ष : 5