पंचायती राज मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सोळाव्या वित्त आयोगाच्या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुदानविषयक शिफारशींच्या अंमलबजावणी संदर्भात पहिल्या प्रादेशिक कार्यशाळेचे उद्या गोव्यात आयोजन

Posted On: 25 NOV 2026 5:51PM by PIB Mumbai

पणजी, 25 नोव्हेंबर 2026

सोळाव्या वित्त आयोगाच्या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुदानविषयक शिफारशींच्या अंमलबजावणी संदर्भात पहिली प्रादेशिक कार्यशाळा उद्या, 26 नोव्हेंबर 2026 रोजी गोव्यात होणार आहे. भारत सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाकडून या कार्यशाळेचे आयोजन केले जात आहे. या कार्यशाळेत पंचायत राज मंत्रालयाच्या सहसचिव मुक्ता शेखर यांच्यासमवेत गोवा, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान या सहभागी राज्यांमधील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. पश्चिम विभागातील राज्यांमध्ये 16व्या वित्त आयोगाच्या शिफारसी, कार्यान्वयन मार्गदर्शक तत्त्वे आणि अनुपालन अटींबद्दल एक सामायिक समज निर्माण करणे आहे, हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश आहे. यामुळे 16व्या वित्त आयोगाची अनुदाने पंचायतींपर्यंत वेळेवर पोहोचतील आणि ग्रामीण नागरिकांच्या जीवनात प्रत्यक्ष सुधारणा घडवून आणणे शक्य होईल.

सोळाव्या वित्त आयोगाने 2026-27 ते 2030-31 या कालावधीसाठी सर्व 28 राज्यांमधील पंचायती राज संस्था / ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थाना 4,35,236 कोटी रुपये अनुदान देण्याची शिफारस केली आहे. या शिफारसींच्या अंमलबजावणीसाठी केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या व्यय विभागाने 21 मे 2026 रोजी कार्यान्वयन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. पंचायती राज मंत्रालयाने 3 जुलै 2026 रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम् येथे राज्याच्या पंचायती राज्यमंत्र्यांची राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेत पंचायती राज संस्था आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांसाठीच्या सोळाव्या वित्त आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीबाबत चर्चा करण्यात आली होती. त्याच कार्यशाळेच्या पुढील टप्प्याच्या स्वरूपात ही प्रादेशिक कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे. राष्ट्रीय कार्यशाळेत धोरणात्मक दिशा निश्चित करण्यात आली होती, तर प्रादेशिक कार्यशाळांच्या माध्यमातून प्रत्यक्ष स्तरावर अंमलबजावणीची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांपर्यंत ही चर्चा पोहोचवली जात आहे.  

महसुलाचे स्वस्रोत (OSR) वाढवण्यावर मंत्रालयाचे सातत्यपूर्ण प्रयत्न आणि लक्ष केंद्रित असल्याचे प्रतिबिंबित करत, ही कार्यशाळा पंचायतींच्या आर्थिक आत्मनिर्भरता वाढवणाऱ्या अनुभवांवर आणि सर्वोत्तम पद्धतींवर विचारमंथन करण्याचाही प्रयत्न करणार आहे. यजमान राज्य गोव्यातील लोकप्रतिनिधी आणि अधिकारीही या कार्यशाळेत सहभागी होतील अशी अपेक्षा आहे.

आर्थिकदृष्ट्या सक्षम, पात्र आणि उत्तरदायी पंचायती या ‘आत्मनिर्भर पंचायत’ आणि ‘विकसित पंचायत’च्या संकल्पनेच्या केंद्रस्थानी आहेत. या संकल्पनांमधूनच ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘विकसित भारत’ या उद्दिष्टांचा मार्ग प्रशस्त होतो. वित्त आयोगाच्या अनुदानाचे वेळेवर वितरण होणे आणि स्वमहसुलाच्या स्वस्रोतात सातत्याने वाढ होण्यामुळे पंचायतींना अधिक आत्मविश्वासाने नियोजन करणे, विकासकामांची अंमलबजावणी करणे आणि स्थानिक समुदायांना अधिक प्रभावी सेवा देणे शक्य होईल. ही कार्यशाळा गोवा सरकारच्या पंचायती राज विभागाच्या सहकार्याने आयोजित केली जात आहे. या कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या सर्व राज्यांमध्ये फलदायी आणि सहकार्यपूर्ण विचारांची देवाणघेवाण होईल अशी अपेक्षा पंचायती राज मंत्रालयाने व्यक्त केली आहे.  


पीआयबी मुंबई | अंबादास यादव/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai
 

 


(Release ID: 2341436) अभ्यागत कक्ष : 15
Read this releasein: English , Urdu