गोवा, 24 नोव्हेंबर 2026
अंकित भूपतभाई सखिया दिग्दर्शित 2025 मध्ये प्रदर्शित झालेला ‘लालो, कृष्ण सदा सहायते’ हा गुजराती आध्यात्मिक चित्रपट आज गोव्यातल्या 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या म्हणजेच इफ्फी 2026 च्या भारतीय पॅनोरमा विभागात प्रदर्शित करण्यात आला. भूतकाळातला कटू अनुभव आणि गरीबीने ग्रासलेल्या एका रिक्षाचालकाची कथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे. एका दुर्गम भागातल्या फार्महाऊसमध्ये अडकलेला हा रिक्षाचालक मनातून अपराधी भावनेचा सामना करतो आणि भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनांतून आत्मशुद्धीचा मार्ग शोधतो. आज इफ्फीमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिग्दर्शक सखिया यांनी चित्रपटाची निर्मितीप्रक्रिया, त्याचा आध्यात्मिक आशय आणि बॉक्स ऑफिसवर मिळालेले अनपेक्षित यश यांविषयी माहिती दिली.
या चित्रपटाच्या केंद्रस्थानी श्रद्धा आणि संकटांवर मात करण्याची जिद्द आहे. भगवान श्रीकृष्ण हे चित्रपटाच्या नायकाचे मूक सोबती म्हणून त्याच्या आत्मपरीक्षणाच्या आणि मानसिक जखमांवर मात करण्याच्या प्रवासात त्याला मार्गदर्शन करतात. प्रेम, श्रद्धा आणि अंतर्मनाचे परिवर्तन या वैश्विक विषयांच्या माध्यमातून प्रेक्षकांशी भावनिक नाते निर्माण करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे दिग्दर्शकाने सांगितले.

चित्रपटाच्या शीर्षकाचा अर्थ स्पष्ट करताना सखिया म्हणाले की, ‘लालो’ हे भगवान श्रीकृष्णांसाठी वापरले जाणारे प्रेमाचे संबोधन आहे. लहान मुलांनाही या नावाने हाक मारली जाते. कथापट दिग्दर्शक म्हणून सखिया यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. मर्यादित निर्मितीखर्चात तयार झालेल्या या चित्रपटासाठी त्यांच्या मित्रांनी आर्थिक मदत केली. या मित्रांनी चित्रपटात अभिनयही केला.
चित्रपटाला हळूहळू तोंडी प्रसिद्धीतून लोकप्रियता मिळत गेली आणि त्याने बॉक्स ऑफिसवर सुमारे 130 कोटी रुपयांची कमाई केल्याचे सांगितले जाते, असे सखिया यांनी नमूद केले. प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया टिपणाऱ्या व्हिडिओंच्या माध्यमातून चित्रपटाचा प्रसार वाढवण्यात समाजमाध्यमांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे त्यांनी सांगितले. स्वतःच्या गावात चित्रपटाचे प्रदर्शन आयोजित करण्याचा अनुभवही त्यांनी सांगितला. गावातल्या लोकांकडून मिळालेले प्रेम आणि आशीर्वाद हा आपल्यासाठी विशेष अनुभव असल्याचे त्यांनी नमूद केले.
चित्रपटाच्या सर्जनशील मांडणीविषयी बोलताना, त्यातील संगीतावर गरब्याचा प्रभाव असल्याचे सखिया यांनी सांगितले. भावना प्रभावीपणे व्यक्त करण्यासाठी क्लोज-अप दृश्यांचा वापर करण्यात आला आहे. या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक ऑस्ट्रेलियातून दूरस्थ पद्धतीने या कामात सहभागी झाले होते. दृश्यांची भव्यता दाखवण्यापेक्षा सहजसुंदर अभिनय, संवाद आणि भावनिक आशय यांना या चित्रपटात अधिक महत्त्व देण्यात आले आहे. चित्रपटाची मांडणी साधी असून, कथानक सहज पुढे जाते. मात्र, ही साधी मांडणी असूनही चित्रपटाने प्रेक्षकांना खिळवून ठेवावे, अशी सखिया यांची अपेक्षा होती. चित्रपटाचे कथानकही नैसर्गिकरित्या विकसित होत गेले, असे त्यांनी सांगितले.

गुजराती चित्रपटसृष्टी बद्दल बोलताना, राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारशात अनेक कथा दडलेल्या असून त्या चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येण्याची गरज असल्याचे सखिया यांनी सांगितले. प्रादेशिक चित्रपटांची वाढती लोकप्रियता आणि उपलब्धता याबद्दल त्यांनी आशावाद व्यक्त केला. व्यावसायिक यशाबरोबरच आशयपूर्ण कथाकथनालाही प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या सत्राचे सूत्रसंचालन कुलदीप मीना यांनी केले.
Read IFFILOID here: https://www.pib.gov.in/iffi/57/iffiLoid.aspx?yr=2026&lang=1®=48
* * *
पीआयबी मुंबई | सुवर्णा बेडेकर/शैलेश पाटील/निखिलेश चित्रे/राज दळेकर/दर्शना राणे