Posted On:
24 NOV 2026 8:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर 2026
केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार आणि राज्यमंत्री बी. एल. वर्मा उद्या नवी दिल्लीतील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात (डीएआयसी) ‘समावेश’ (SAMAVESH – सिंगल ॲक्सेस मेकॅनिझम फॉर ऑल व्हर्टिकल्स ऑफ एम्पॉवरमेंट अँड सोशल हार्मनी) या सक्षमीकरण आणि सामाजिक सलोख्याच्या विविध क्षेत्रांतील योजनांसाठी एकच सामायिक प्रवेश व्यवस्था आणि नवीन ‘ई-अनुदान’ पोर्टलचा शुभारंभ करणार आहेत.

समावेश (SAMAVESH) : योजना आणि सेवांसाठी एकात्मिक डिजिटल व्यासपीठ
सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागाने विकसित केलेले ‘समावेश’ (SAMAVESH) हे एकात्मिक डिजिटल व्यासपीठ म्हणून काम करेल. या व्यासपीठावर विभागाच्या विविध योजना, सेवा आणि संस्थांची पोर्टल्स एकाच ठिकाणी उपलब्ध असतील. त्यामुळे नागरिक, लाभार्थी आणि इतर संबंधितांना एकाच डिजिटल माध्यमातून आवश्यक माहिती आणि सेवांचा लाभ सहजपणे घेता येईल.
‘समावेश’ (SAMAVESH) मध्ये विभागाची 20 हून अधिक पोर्टल्स एकत्र आणण्यात आली आहेत. त्यापैकी नऊ पोर्टल्सवर विविध योजना आणि कार्यक्रमांसाठी सुरुवातीपासून शेवटपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल पद्धतीने पूर्ण करता येते. अनेक डिजिटल व्यासपीठे एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे माहिती आणि सेवा मिळवणे सोपे होणार आहे. तसेच, उपलब्धतेतील अडचणी कमी होऊन कल्याणकारक योजनांचा लाभ अधिक कार्यक्षमतेने देणे शक्य होणार आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), बहुभाषिक सुविधा आणि विविध डिजिटल प्रणालींमध्ये परस्पर समन्वय साधणाऱ्या पायाभूत सुविधांच्या मदतीने ‘समावेश’ (SAMAVESH) हे व्यासपीठ अधिक सुलभ, तत्पर आणि नागरिकांच्या गरजांवर केंद्रित डिजिटल सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करते.
नवीन ई-अनुदान (e-Anudaan) पोर्टल : अनुदान व्यवस्थापन प्रक्रिया अधिक सुलभ
नवीन ई-अनुदान (e-Anudaan) पोर्टलद्वारे विभागाच्या चार प्रमुख योजनांअंतर्गत दिल्या जाणाऱ्या सहायक अनुदानाची प्रक्रिया एकाच डिजिटल व्यासपीठावर आणली जाणार आहे. या योजनांमध्ये अंमली पदार्थाचे सेवन रोखण्यासाठीचा राष्ट्रीय कृती आराखडा (NAPDDR), स्माईल (SMILE), अटल वयो अभ्युदय योजना (AVYAY) आणि श्रेष्ठा (SHRESHTA) यांचा समावेश आहे.
व्हिडिओच्या माध्यमातून तपासणी आणि ठिकाणाची भौगोलिक नोंद असलेल्या (जिओ-टॅग केलेल्या) पुराव्यांसह तंत्रज्ञानावर आधारित ई-निरीक्षण सुविधेमुळे या व्यासपीठावरील देखरेख आणि उत्तरदायित्व अधिक प्रभावी होईल. या सुविधांमुळे विविध योजनांतर्गत आर्थिक मदत मिळणाऱ्या संस्था आणि प्रकल्पांवर अधिक चांगल्या प्रकारे लक्ष ठेवता येईल.
‘समावेश’ (SAMAVESH) या व्यासपीठावर बहुभाषिक सुविधा आणि भाषा तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभाग आणि ‘भाषिणी’ (BHASHINI) यांच्यात प्रथमच सामंजस्य करार करण्यात येणार आहे. या सहकार्यामुळे 22 हून अधिक प्रादेशिक भाषांमध्ये माहिती आणि सेवा उपलब्ध होण्यास मदत होईल. तसेच, दस्तऐवजांचा संक्षिप्त सारांश तयार करण्यासारख्या तंत्रज्ञानाधारित सुविधाही उपलब्ध करून दिल्या जातील. यामुळे हे व्यासपीठ अधिक सर्वसमावेशक आणि नागरिकांच्या गरजांवर केंद्रित होण्यास मदत होईल.
या उपक्रमांमुळे विभागाची सेवा वितरण व्यवस्था अधिक सक्षम होईल. नागरिक आणि योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांना सेवांचा लाभ घेणे अधिक सोपे होईल. तसेच, सर्वसमावेशक, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित सुशासनाचे उद्दिष्ट साध्य करण्यास मदत होईल.
शैलेश पाटील/आशुतोष सावे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai