Posted On:
24 NOV 2026 8:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर 2026
भारताची अवकाश अर्थव्यवस्था सध्या जवळपास 9 अब्ज अमेरिकी डॉलरची असून, येत्या दशकापेक्षा कमी कालावधीत ती 40 ते 45 अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. देशाच्या अवकाश क्षेत्रातल्या परिसंस्थेत खासगी क्षेत्राच्या सहभागामुळे मोठे परिवर्तन घडत आहे, असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच पृथ्वीविज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), तसेच पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्तिवेतन, अणुऊर्जा आणि अवकाश विभागांचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज सांगितले.
गेल्या काही वर्षांत भारताच्या अवकाश क्षेत्रातल्या परिसंस्थेचा विस्तार झाला असून, एकेकाळी एक अंकी संख्येत असलेल्या नवउद्यमांची संख्या आता जवळपास 400 ते 500 पर्यंत पोहोचली आहे, असे सिंह यांनी नवी दिल्ली इथे आयोजित पाचव्या इंडिया इंटरनॅशनल स्पेस कॉन्क्लेव्ह 2026 मध्ये आपल्या भाषणात सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या सुधारणांमुळे देशातल्या प्रचंड उद्योजकीय आणि तांत्रिक क्षमता खुल्या झाल्याचे यातून दिसून येते, असे ते यावेळी म्हणाले.
भारतीय अवकाश संघटनेने 23 आणि 24 नोव्हेंबर 2026 रोजी नवी दिल्ली इथे आयोजित केलेल्या या दोन दिवसीय परिषदेत ‘नवोन्मेष, प्रशासन, मानवी क्षमता आणि जागतिक सहकार्याच्या माध्यमातून अवकाश क्षेत्राचे भविष्य घडवणे’ ही संकल्पना केंद्रस्थानी होती. भारताची जागतिक अवकाश अर्थव्यवस्थेतली वाढती भूमिका यावर विचारविनिमय करण्यासाठी या परिषदेत उद्योगक्षेत्रातले अग्रणी, अवकाश क्षेत्रातले नवउद्यम, संशोधक आणि आंतरराष्ट्रीय भागधारक एकत्र आले होते. या कार्यक्रमात ‘अवकाश अर्थव्यवस्था 2036 : भारताचा आराखडा’ या अहवालाचेही प्रकाशन करण्यात आले.
या कार्यक्रमाला भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोचे अध्यक्ष आणि अवकाश विभागाचे सचिव डॉ. व्ही. नारायणन, भारतीय राष्ट्रीय अवकाश प्रोत्साहन आणि प्राधिकरण केंद्राचे अर्थात इन-स्पेसचे अध्यक्ष डॉ. पवन कुमार गोयंका, भारतीय अवकाश संघटनेचे महासंचालक निवृत्त लेफ्टनंट जनरल अनिल कुमार भट्ट आणि अरुण टी. रामचंदानी यांच्यासह अवकाश उद्योग आणि तंत्रज्ञान क्षेत्रातले अन्य प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते.
अवकाश तंत्रज्ञानाचे आर्थिक योगदान मोजताना केवळ रॉकेट प्रक्षेपण, उपग्रह निर्मिती आणि व्यावसायिक महसूल यांचाच विचार करून चालणार नाही, असे डॉ. सिंह म्हणाले. जमिनीवर विविध क्षेत्रांमध्ये या तंत्रज्ञानामुळे होणारी बचत, कार्यक्षमता आणि कामकाजाच्या परिणामांमध्ये होणारी सुधारणा यांचाही विचार करणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ.जितेंद्र सिंह यांनी देशातल्या खासगी कंपन्यांना अवकाश क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्याचे आवाहन केले. तसेच भारताच्या वेगाने विकसित होणाऱ्या अवकाश क्षेत्रात परदेशी गुंतवणूक अधिक प्रमाणात आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी उद्योगक्षेत्रातल्या अग्रणींना केले. संशोधन आणि नवोन्मेषाला बळकटी देण्यासाठी, तसेच खासगी क्षेत्राचा सहभाग वाढवण्यासाठी सरकारने अनुसंधान राष्ट्रीय संशोधन प्रतिष्ठान आणि संशोधन, विकास आणि नवोन्मेष निधी यांसारख्या सक्षम यंत्रणा सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.
उद्योगक्षेत्रातल्या धुरिणांनी संशोधन आणि वैज्ञानिक विकासासाठी कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व अर्थात सीएसआरअंतर्गत अधिक निधी उपलब्ध करून द्यावा, असे आवाहनही मंत्र्यांनी केले. सीएसआरचा लाभ व्यापक समाजाला मिळाला पाहिजे. त्याचा वापर केवळ यंत्रसामग्री आणि पायाभूत सुविधांवरच्या खर्चापुरता मर्यादित राहू नये, असे ते म्हणाले. वैज्ञानिक कार्यांसाठी उदार देणग्या देण्याची संस्कृती अधिक बळकट करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. संशोधनातल्या गुंतवणुकीकडे समाज आणि मानवतेसाठी केलेले अर्थपूर्ण योगदान म्हणून पाहिले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.
धोरणात्मक सुधारणा, स्वदेशी तंत्रज्ञान क्षमता आणि खासगी क्षेत्रातली उद्योजकता यांच्या बळावर भारताच्या अवकाश क्षेत्रात परिवर्तन घडत आहे. या परिवर्तनामुळे जागतिक स्तरावर स्पर्धात्मक अवकाश अर्थव्यवस्था म्हणून भारताचा उदय होण्यासाठी भक्कम पाया तयार होत आहे, असे डॉ.सिंह म्हणाले.




नितीन फुल्लुके/निखिलेश चित्रे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai