57th International Film Festival of India 2026
20 – 28 Nov 2026

चित्रपट दिग्दर्शक अवतार कौल यांचे जीवन आणि चित्रपट वारसा यांचे स्मरण करून देणाऱ्या 'अवतार कौल : द (इन)कम्प्लीट स्टोरी’ या पुस्तकाचे प्रकाशन


57 व्या इफ्फीमध्ये लेखक विनोद कौल यांनी अवतार कौल यांचे जीवन, त्यांचा ‘27 डाऊन' हा चित्रपट आणि त्यांचा अपूर्ण राहिलेला सर्जनशील प्रवास, यांविषयी साधला संवाद

Posted On: 24 NOV 2026 4:09PMby PIB MumbaiRelease ID: 2340848Views: 7

गोवा, 24 नोव्‍हेंबर 2026

 

भारतीय चित्रपटसृष्टीत असे काही चित्रपटकर्ते झाले ज्यांचा सर्जनशील प्रवास खूपच लवकर थांबला पण त्यांचे कार्य मात्र कायमस्वरूपी महत्त्वाचे राहिले आहे. अवतार कौल हे त्यापैकीच एक.  ‘27 डाऊन', हा त्यांचा एकमेव चित्रपट. पण हा चित्रपट भारतीय चित्रपटांमध्ये अत्यंत महत्त्वाचा चित्रपट मानला जातो.

प्रकाशन विभागाने, अवतार कौल यांचे जीवन आणि चित्रपट वारसा यांचा शोध घेणारे, अवतार कौल: द (इन) कम्प्लीट स्टोरी' -Awtar Kaul: The (In)Complete Story, हे पुस्तक  प्रकाशित केले आहे. विनोद कौल लिखित या पुस्तकात पत्रे, छायाचित्रे, वैयक्तिक आठवणी आणि संवाद यांच्या माध्यमातून अवतार कौल यांचे जीवन आणि सर्जनशील प्रवास उलगडण्यात आला आहे. या पुस्तकाचे प्रकाशन गोव्यात 57 व्या इफ्फीमध्ये 21 नोव्हेंबर 2026 रोजी झाले.

महोत्सवात 23 नोव्हेंबर रोजी आयोजित संवादात लेखक विनोद कौल यांनी या पुस्तकामागील प्रेरणा आणि अवतार कौल यांच्याविषयी अधिकाधिक लोकांना कळावे, यासाठीच्या प्रयत्नांबद्दल सांगितले. एका चित्रपट दिग्दर्शकाविषयी लिहायचे, या नियोजनातून हा प्रवास सुरू झाला नाही तर आपण दुसऱ्या इयत्तेत असताना निधन झालेल्या आपल्या काकांविषयी अधिक जाणून घेण्याच्या वैयक्तिक प्रयत्नांतून हा प्रवास सुरू झाला, असे विनोद कौल यांनी यावेळी सांगितले. 

आपल्या काकांची छायाचित्रे, पत्रे आणि इतर दस्तऐवज संकलित करण्यास आपण कशी सुरुवात केली, यांविषयीच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. कालांतराने हा वैयक्तिक शोध अवतार कौल यांचे जीवन आणि भारतीय सिनेमासाठीचे त्यांचे योगदान समजून घेण्याच्या सखोल प्रयत्नांमध्ये रूपांतरित झाला. 

जसजसे आपण वयाने मोठे होत गेलो, तसतसे आपल्याला ‘27 डाऊन' चे महत्त्व समजू लागले, असे विनोद कौल यांनी सांगितले. एवढा प्रतिभासंपन्न दिग्दर्शक, ज्याने अशा प्रकारचा उल्लेखनीय चित्रपट दिग्दर्शित केला, त्याच्याविषयी कोणाला फारसे का अवगत नाही, याविषयी आपल्याला कायम आश्चर्य वाटायचे.  यातूनच नव्या पिढीपर्यंत आणि भावी चित्रपटकर्त्यांपर्यंत, अवतार कौल यांचे जीवन आणि त्यांची कथा पोहोचवण्याची  प्रेरणा मिळाली, असे त्यांनी सांगितले. 

‘द (इन)कम्प्लीट स्टोरी’ या शीर्षकाविषयी स्पष्टीकरण देताना विनोद कौल म्हणाले की, अवतार कौल आणि त्यांच्या कामाविषयी फारच थोडे लिखाण झाले आहे. हे पुस्तक त्यांच्या आयुष्याची आणि कार्याची माहिती एकत्र आणण्याचा प्रयत्न करते. एका अर्थाने त्यामुळे त्यांची कथा पूर्णत्वास जाते. मात्र, त्यांचे आयुष्य आणि सर्जनशील प्रवास अपूर्णच राहिला. त्यांचे वैवाहिक आयुष्य अल्पकाळ टिकले आणि त्यांनी केवळ एकच चित्रपट बनवला. अवतार कौल आणखी काही काळ जगले असते, तर त्यांनी अनेक चित्रपट दिग्दर्शित केले असते, असे लेखकाने नमूद केले.

संशोधनादरम्यान आलेला एक भावनिक अनुभव सांगताना विनोद कौल यांनी आपल्या अमेरिकेत राहणाऱ्या काकी ॲन कौल यांचाही मृत्यू झाल्याचे आपल्याला संशोधनातून समजल्याचे सांगितले. त्यांच्या मृत्यूची माहिती कुटुंबीयांना नव्हती. हा शोध आपल्यासाठी मोठा धक्का होता, असे त्यांनी सांगितले. या संशोधनातून अनेक अनपेक्षित आणि भावनिक अनुभव समोर आल्याचेही त्यांनी नमूद केले.

चित्रपट आणि साहित्य यांच्यातील नात्याविषयी बोलताना विनोद कौल म्हणाले की, या दोन्ही कलांचा संबंध नेहमीच जवळचा राहिला आहे. अनेक चित्रपटांना कादंबऱ्या, कथा आणि इतर साहित्यकृतींमधून प्रेरणा मिळाली आहे. हा परस्परसंबंध अधोरेखित करण्यासाठी आणि चित्रपटकर्ते, तसेच चित्रपटांशी संबंधित कलाकृतींच्या कथा वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रकाशन विभाग करत असलेल्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली. अवतार कौल यांची कथा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी प्रकाशन विभागाचे आभारही मानले.

अवतार कौल यांच्याकडून तरुण चित्रपटकर्त्यांनी काय शिकावे, या प्रश्नावर विनोद कौल म्हणाले की, तरुण चित्रपटकर्त्यांनी आपल्या सर्जनशील निवडींशी प्रामाणिक राहिले पाहिजे. ‘जंजीर’, ‘बॉबी’ आणि ‘यादों की बारात’ यांसारखे मुख्य प्रवाहातील चित्रपट लोकप्रिय असण्याच्या काळात अवतार कौल यांनी स्वतःच्या अभिरुचीला प्राधान्य देत कलात्मक चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला. तरुण चित्रपटकर्त्यांनी ‘27 डाउन’ या चित्रपटातले कथन, चित्रपटनिर्मितीचे कौशल्य, आशय आणि दिग्दर्शनशैली यांचा अभ्यास करावा, असे आवाहन विनोद कौल यांनी केले.

चित्रपटाच्या वारशाचे जतन

‘अवतार कौल : द (इन)कम्प्लीट स्टोरी’ हे पुस्तक फक्त एका चित्रपटकर्त्याच्या आयुष्याची नोंद नाही, तर भारतीय चित्रपटसृष्टीच्या एका महत्त्वाच्या पर्वाशी वैयक्तिक आठवणींचा पुन्हा संबंध जोडण्याचा प्रयत्नही आहे. आपल्या काकांना समजून घेण्यासाठी पुतण्याने सुरू केलेला शोध आता अवतार कौल यांचे आयुष्य आणि त्यांचे चित्रपटसृष्टीतले योगदान पुन्हा लोकांच्या स्मरणात आणण्याच्या प्रयत्नात रूपांतरित झाला आहे.

या प्रकाशनाच्या माध्यमातून प्रकाशन विभाग अवतार कौल यांच्यासारख्या चित्रपटकर्त्यांच्या योगदानाचे दस्तऐवजीकरण करण्याचा आणि त्यांचा सर्जनशील वारसा वाचक, विद्यार्थी तसेच चित्रपटप्रेमींच्या नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे.

Read IFFILOID here: https://www.pib.gov.in/iffi/57/iffiLoid.aspx?yr=2026&lang=1&reg=48

 

* * *

पीआयबी मुंबई | गोपाळ चिप्‍पलकट्टी/सोनाली काकडे/निखिलेश चित्रे/दर्शना राणे


Great films resonate through passionate voices. Share your love for cinema with #IFFI2026 and #StoriesWithoutBorders. Tag us @pibindia on Instagram and @PIB_India on X, and we will help amplify your festival moments!

For accredited journalists, critics, bloggers, and vloggers seeking 1-on-1 interviews with filmmakers and festival juries, write to us at:
iffi.mediadesk@pib.gov.in with the subject line: Take One with PIB.


Official Release ID: 2340848
•
Media Centre: Goa
•
Festival Dates: Nov 20 – 28, 2026