गोवा, 24 नोव्हेंबर 2026
चित्रपट निर्माते महेश लिमये यांनी 'आदि अनंत' या त्यांच्या मराठी चित्रपटाच्या निर्मितीमागील सर्जनात्मक प्रवास सामायिक केला. गोव्यात सुरु असलेल्या 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी), भारतीय पॅनोरमा विभागात प्रदर्शित करण्यात आलेल्या या चित्रपटासंदर्भात पत्रसूचना कार्यालयाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सुमारे 137 मिनिटे कालावधीचा हा चित्रपट, स्वतःला सिध्द करण्यासाठी धडपडणारा आदित्य हा तरुण अभिनेता आणि अनंत राव हे त्याचे उत्साही आजोबा यांच्यातील नात्याचा मागोवा घेतो. यामध्ये आदित्यची भूमिका संकर्षण कऱ्हाडे या अभिनेत्याने केली असून अनंत राव यांची भूमिका सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी केली आहे. अशोक सराफ यांना नुकतेच पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

प्रसारमाध्यम प्रतिनिधींना संबोधित करताना, चित्रपटातील दोन पात्रे आर्थिक आणि वैयक्तिक आव्हानांना तोंड देत असतानाच ही कथा प्रेम, हलकेफुलके विनोद आणि एकमेकांना दिलेल्या पाठींब्याच्या माध्यमातून कशी फुलत जाते हे लिमये यांनी सांगितले. एका अपघातामुळे अनंत राव यांना अंथरुणावर खिळावे लागल्यामुळे आदित्यला आजोबांची सेवासुश्रुषा करण्याची जबाबदारी आणि त्याच्या स्वतःच्या अभिनयाच्या आकांक्षा यामध्ये समतोल साधायची कसरत करावी लागते आणि त्यातून त्यांच्या या नात्यात एक अवघड वळण येते. दबाव आणि वैफल्य यामुळे त्यांचे नाते ताणले जात असतानाच, हा चित्रपट कौटुंबिक जबाबदाऱ्या, बहुतेकदा दुर्लक्षित ठरणारे सुश्रुषाविषयक वास्तव आणि सध्याच्या जीवनात यशाचा खरा अर्थ यांचा शोध घेतो.
अभिनेता-लेखक संकर्षण कऱ्हाडे यांनी पहिल्यांदा या चित्रपटाची कथा ऐकवल्यानंतर आपण खूप भावूक झालो होतो अशी आठवण सांगत लिमये म्हणाले की याचे कारण असे आहे की या कथेने माझ्या स्वतःच्या वडिलांच्या अखेरच्या दिवसांमध्ये त्यांची काळजी घेतानाच्या आठवणी मनात पुन्हा जागवल्या. या चित्रपटाची मुळे जरी मराठी कथाकथनात रुजलेली असली तरीही, कथेचा भावनिक गाभा भाषिक सीमांच्या पलीकडे पोहोचून भारतभरातील आणि परदेशांतील कुटुंबांच्या अनुभवांचे दर्शन घडवतो.
चित्रपटाचे संगीत आणि सहयोगात्मक भावनेबद्दल बोलताना लिमये यांनी सांगितले की आदि अनंत चित्रपटात प्रख्यात शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांनी गायलेले एक भक्तीपर भजन आहे, ज्यामध्ये अशोक सराफ तबला वाजवताना पडद्यावर दिसतात. अनुभवी कलाकार असूनही अशोक सराफ यांनी या गुंतागुंतीच्या आणि अपरिचित पात्राकडे एखाद्या नवख्या कलाकारासारखे मोकळ्या मनाने पाहिले. ते पुढे म्हणाले की, अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडे यांच्यात परस्परांसाठी असलेल्या आदराच्या भावनेमुळे, त्यांच्या पडद्यावरील नात्याला एक सहज लय लाभली.

या चित्रपटाचे आदि अनंत हे शीर्षक, ‘आदि’ म्हणजे सुरुवात आणि ‘अनंत’ म्हणजे कालातीतता यामधील विरोधाभासाचे दर्शन घडवत, या चित्रपटात दिसणारा वेगवेगळ्या पिढ्यांमधील नात्यांच्या शोध दर्शवतो.
मुंबईच्या जे.जे. कला महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असलेले महेश लिमये हे छायाचित्रणकार आणि दिग्दर्शक आहेत. त्यांचा दिग्दर्शकीय पदार्पणातील ‘यलो’ या चित्रपटाने तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळवले तर त्यांचा ‘जग्गू आणि ज्युलियेट’ हा चित्रपट महाराष्ट्र शासनाच्या चित्रपट पुरस्काराचा मानकरी ठरला. आदि अनंत हा दिग्दर्शक म्हणून त्यांचा तिसरा चित्रपट आहे.
शिवराज गंगवाल यांनी या पत्रकार परिषदेचे सूत्रसंचालन केले
Read IFFILOID here: https://www.pib.gov.in/iffi/57/iffiLoid.aspx?yr=2026&lang=1®=48
* * *
पीआयबी मुंबई | गोपाळ चिप्पलकट्टी/संजना चिटणीस/दर्शना राणे