भूविज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भूस्खलन व्यवस्थापनामध्ये भारताचा दृष्टिकोन आता आपत्ती- पश्चात मदतकार्यापुरता नसून आपत्ती रोखण्याकडे : 7 व्या जागतिक भूस्खलन मंचावर डॉ.जितेंद्र सिंह यांचे प्रतिपादन


भूस्खलन प्रतिबंधक सज्जता वाढवण्यासाठी एआय -आधारित पूर्वानुमान, भू-स्थानिक तंत्रज्ञान, उपग्रह देखरेख आणि शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणारी पूर्वसूचना प्रणाली आवश्यक : डॉ.जितेंद्र सिंह

Posted On: 23 NOV 2026 8:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर 2026

विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय तसेच पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि पंतप्रधान कार्यालय राज्यमंत्री, डॉ.जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे की, भूस्खलन व्यवस्थापनाबाबत भारत आपला दृष्टिकोन बदलत आहे. आता 'आपत्ती-पश्चात मदतकार्याकडून प्रतिबंध, पूर्वतयारी आणि जोखीम कमी करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे;  ही गोष्‍ट म्हणजे देशाच्या आपत्ती व्यवस्थापन धोरणातील एक मोठे परिवर्तन आहे.

फरीदाबाद येथील अमृता विश्व विद्यापीठममध्ये आयोजित 7 व्या जागतिक भूस्खलन मंचा'च्या (डब्ल्यूएलएफ-7) उद्घाटन सत्राला संबोधित करताना जितेंद्र  सिंह म्हणाले की, भारत आता आपत्ती घडल्यानंतर मदत यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या  दृष्टिकोनाऐवजी, आपत्तीची जोखीम कमी करण्यावर, पूर्वसूचना प्रणाली अधिक बळकट करण्यावर आणि जीवितहानी तसेच पायाभूत सुविधांचे टाळण्याजोगे नुकसान रोखण्यावर भर दिला जात आहे.

जागतिक  भूस्खलन मंचाची 7 वी परिषद 22 ते 27  नोव्हेंबर 2026 या कालावधीत   होत आहे. भारतामध्‍ये प्रथमच या मंचाच्‍या परिषदेचे आयोजन केले आहे. फरीदाबादच्या  अमृता विश्व विद्यापीठम ने  'इंटरनॅशनल कन्सोर्टियम ऑन लँडस्लाइड्स' (आयसीएल) आणि 'इंटरनॅशनल प्रोग्राम ऑन लँडस्लाइड्स' (आयपीएल) यांच्या सहकार्याने या परिषदेचे आयोजन केले आहे. या उद्घाटन सत्रात 75 हून अधिक देशांमधील आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ, वैज्ञानिक आणि धोरणकर्ते एकत्र आले आहेत .

डॉ.जितेंद्र सिंह म्हणाले  की, हिमालयापासून ते पश्चिम घाट, ईशान्येकडील प्रदेश आणि इतर संवेदनशील पर्वतीय क्षेत्रांपर्यंत पसरलेली भारताची वैविध्यपूर्ण भूगर्भीय आणि भूभौतिकीय रचना लक्षात घेता , भूस्खलनाचा धोका कमी करणे ही एक अत्यंत महत्त्वाची राष्ट्रीय प्राथमिकता बनली आहे.  केरळमधील वायनाड, उत्तराखंडमधील चमोली, तसेच सिक्कीम, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये घडलेल्या मोठ्या भूस्खलन दुर्घटनांचा उल्लेख करत, त्यांनी अशा आपत्तींचा परिणाम कमी करण्यासाठी आंतरविद्याशाखीय संशोधन, सातत्यपूर्ण  देखरेख आणि समन्वित वैज्ञानिक प्रयत्नांच्या आवश्यकतेवर भर दिला.

डॉ.जितेंद्र सिंह म्हणाले की, सुमारे 4.3 लाख चौरस किलोमीटर क्षेत्रावर राष्ट्रीय भूस्खलन प्रवणता नकाशा तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे, तर भूस्खलन सूची डेटाबेसमध्ये 2025 अखेरपर्यंत जवळपास 91000 ऐतिहासिक भूस्खलनांची माहिती संकलित करण्यात आली आहे.

केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील एका उच्चस्तरीय समितीने अलीकडेच आपत्ती निवारण आणि क्षमता-बांधणीच्या कामांसाठी 1115.67 कोटी रुपयांना मंजुरी दिली आहे. तसेच , 10  हिमालयीन राज्ये आणि भूस्खलनाचा संभाव्य धोका असलेल्या इतर पाच राज्यांसह एकूण 15 राज्यांचा समावेश असलेल्या राष्ट्रीय भूस्खलन तीव्रता कमी करण्याच्या  प्रकल्पासाठी 1000 कोटी रुपये निधीला मंजुरी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

अधिक अचूक, व्यावहारिक  आणि स्थान-विशिष्ट भूस्खलन पूर्वसूचना प्रणाली विकसित करण्यासाठी हवामान अंदाजांना भूशास्त्रीय, भूतांत्रिक, जलशास्त्रीय आणि वास्तविक वेळेतील  निरीक्षणांशी अधिक सखोलतेने जोडण्याचे आवाहन त्यांनी केले.

सातवा जागतिक भूस्खलन मंच जागतिक वैज्ञानिक सहकार्य, तंत्रज्ञान हस्तांतरण, संस्थात्मक क्षमता-बांधणी आणि परिणाम-आधारित पूर्वसूचना प्रणालींना चालना देईल, तसेच वैज्ञानिक विचारमंथनाचे रूपांतर अधिक सुरक्षित उतार,लवचिक पायाभूत सुविधा आणि आपत्ती-प्रतिरोधक समुदायांसाठी व्यावहारिक उपाययोजनांमध्ये करेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

 
सुवर्णा बेडेकर/सुषमा काणे/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2340578) अभ्यागत कक्ष : 4