सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

स्थूल देशांतर्गत उत्पादन, ग्राहक किंमत निर्देशांक आणि औद्योगिक उत्पादन निर्देशांक यांच्या नवीन मालिकेतील आकडेवारीसंदर्भात वापरकर्ता परिषद मुंबईत झाली संपन्न

Posted On: 23 NOV 2026 7:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर 2026

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने, भारतीय रिझर्व्ह बँकेला ज्ञान भागीदार म्हणून सहभागी करून घेत, 23 नोव्हेंबर 2026 रोजी मुंबई येथे ‘स्थूल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी), ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) आणि औद्योगिक उत्पादन निर्देशांक (आयआयपी) यांच्या नवीन मालिकेवरील ‘डेटा वापरकर्ता परिषद’ आयोजित केली होती. 2026 मध्ये विविध टप्प्यांवर जीडीपी, सीपीआय आणि आयआयपी यांच्या सुधारित मालिका प्रसिद्ध करण्यात आल्या. या पार्श्वभूमीवर, प्रत्येक सुधारित मालिकेत समाविष्ट केलेले  कार्यपद्धतीतील बदल, माहितीचे स्रोत आणि महत्त्वाच्या सुधारणा यांची डेटा वापरकर्त्यांना ओळख करून देणे, हा या परिषदेचा मुख्य उद्देश होता. तसेच या बदलांचे स्वरूप आणि त्यानुसार उपलब्ध होणाऱ्या अंदाजांचे परिणाम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करणे, हाही या परिषदेच्या आयोजनामागील हेतू होता.

या परिषदेत भारतीय रिझर्व्ह बँक, सेबी (भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ) यांचे प्रतिनिधी, अर्थतज्ज्ञ, अंदाज वर्तवणारे तज्ज्ञ, पतमानांकन संस्था (क्रेडिट रेटिंग एजन्सीज), वित्तीय संस्था आणि बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, संशोधन संस्था, उद्योग आणि गुंतवणूकदार संघटना, अधिकृत सांख्यिकीचे वापरकर्ते तसेच केंद्र आणि राज्य सरकारांचे वरिष्ठ अधिकारी एकत्र आले होते.

केंद्रीय सांख्यिकीचे महासंचालक डॉ. दलीप सिंह यांनी स्वागतपर भाषणात सांगितले की, समग्र आर्थिक सांख्यिकी (मॅक्रोइकॉनॉमिक स्टॅटिस्टिक्स) हा आर्थिक विश्लेषण, धोरणनिर्मिती आणि माहितीपूर्ण निर्णयप्रक्रियेचा पाया आहे. स्थूल देशांतर्गत उत्पादन, ग्राहक किंमत निर्देशांक  आणि औद्योगिक उत्पादन निर्देशांक  हे तीनही निर्देशांक एकत्रितपणे देशातील आर्थिक घडामोडी आणि आर्थिक विकासाचे सर्वंकष चित्र मांडतात. अर्थव्यवस्थेची रचना, उत्पादन प्रक्रिया, उपभोगाच्या पद्धती आणि तंत्रज्ञानात सातत्याने बदल होत असतात. त्यामुळे सध्याच्या आर्थिक वास्तवाचे अचूक प्रतिबिंब उमटवण्यासाठी सांख्यिकी प्रणालीमध्येही काळानुरूप बदल होणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने (मॉस्पी)या तीनही निर्देशांकांच्या आधारभूत वर्षांमध्ये सुधारणा करण्याची प्रक्रिया पूर्ण केली असून, 2026 मध्ये त्यांच्या नवीन मालिका प्रसिद्ध केल्या आहेत. या नवीन मालिकांमध्ये प्रशासकीय आणि सर्वेक्षणांमधून मिळणाऱ्या माहितीचा अधिक वापर, व्यापक व्याप्ती आणि कार्यपद्धतीतील महत्त्वाच्या सुधारणांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रक्रियेत योगदान देणाऱ्या तज्ज्ञ समित्या, केंद्रीय मंत्रालये, राज्य सरकारे, भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) आणि अन्य संस्थांचेही त्यांनी आभार मानले.

परिषदेची पार्श्वभूमी स्पष्ट करताना सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे सचिव डॉ. सौरभ गर्ग यांनी सांगितले की, सुमारे वर्षभरानंतर मुंबईत ही परिषद आयोजित करण्यात आली असून, यावेळी आधारभूत वर्ष सुधारणेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ती होत आहे. नवीन मालिकेअंतर्गत पहिल्या तिमाहीचे स्थूल देशांतर्गत उत्पादनाचे  अंदाज यापूर्वीच प्रसिद्ध करण्यात आले आहेत, तर दुसऱ्या तिमाहीचे अंदाज लवकरच प्रसिद्ध होणार आहेत. भविष्यातील प्राधान्यक्रमांविषयी माहिती देताना त्यांनी स्थूल राज्य देशांतर्गत उत्पादनाचे (जीएसडीपी ) आधारभूत वर्ष 2022-23 पर्यंत अद्ययावत करणे आणि अधिक सूक्ष्म स्तरावर निर्णय घेण्यास मदत व्हावी यासाठी जिल्हा देशांतर्गत उत्पादनाचे (डीडीपी) अंदाज विकसित करणे, या मंत्रालयाच्या महत्त्वाच्या उद्दिष्टांचा उल्लेख केला.

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नर डॉ. पूनम गुप्ता यांनी नमूद केले की, आधारभूत वर्षात सुधारणा करणे ही केवळ नियमित तांत्रिक अद्ययावत प्रक्रिया नाही. तर अर्थव्यवस्थेची बदलती रचना, उपभोगाच्या बदलत्या पद्धती आणि आर्थिक विकासाची नवी साधने यांचे प्रतिबिंब त्यातून उमटते. या बदलांचे अधिक अचूक मापन करणे प्रभावी धोरणनिर्मितीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

यानंतर त्यांनी सुधारित मालिकेची प्रमुख वैशिष्ट्ये अधोरेखित केली.

त्यांनी नमूद केले की, मौद्रिक धोरणासंदर्भात, या सुधारणांमुळे कमी बदलांसह  सलग  आर्थिक वर्षांमध्ये अधिक स्थिर अंदाज मिळण्याची अपेक्षा आहे आणि डेटाचा एक वचनबद्ध वापरकर्ता म्हणून, सुधारणांसाठी स्पष्ट आणि अनुमान लावण्याजोगा   दृष्टिकोन आणि सांख्यिकी मंत्रालयासोबत सातत्यपूर्ण संवाद साधण्यात रिझर्व्ह बँकेला रस  आहे, याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

एचडीएफसीचे माजी अध्यक्ष  दीपक पारेख यांनी आपल्या बीजभाषणात,आपल्या  पाच दशकांहून अधिक अनुभवाच्या आधारे व्यापक आर्थिक आकडेवारी बाजाराला कशी प्रभावित करते, गुंतवणुकदारांच्या भावनांना आकार देते आणि बँका, कंपन्या आणि  धोरणकर्त्यांच्या निर्णयांना मार्गदर्शन करते, हे अधोरेखित केले. त्यांनी 2026 हे वर्ष भारताच्या सांख्यिकीय रचनेच्या आधुनिकीकरणाचे वर्ष असल्याचे ते म्हणाले.  त्यांनी नमूद केले की, या सुधारणांमुळे राष्ट्रीय खात्यांबाबत  पूर्वी उपस्थित केलेल्या चिंता दूर होऊ शकतात. . तसेच, त्यांनी उच्च-वारंवारता निर्देशक आणि ‘’नाईट लाईट्स व ऑनलाइन सर्च ट्रेंड’’ यांसारख्या नवीन डेटा स्रोतांच्या वाढत्या वापराचे स्वागत केले. त्याच वेळी, त्यांनी  इशाराही दिला की तंत्रज्ञान आणि एआयला योग्य सुरक्षा उपायांचे पाठबळ असायला हवे  आणि ते मानवीय निर्णय क्षमतेची जागा घेऊ शकत नाहीत. त्यांनी गृहनिर्माण क्षेत्राचे संबंधित उद्योगांशी असलेले संबंध  लक्षात घेत, गृहनिर्माण आकडेवारीवरील अधिकृत डेटाच्या गरजेवरही भर दिला.

उद्घाटन सत्रांनंतर जीडीपी (जीडीपी), सीपीआय (सीपीआय) आणि आयआयपी (आयआयपी) च्या नवीन मालिकेवर तीन तांत्रिक सत्रे आयोजित करण्यात आली होती. या सत्रांमध्ये सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय  आणि भारतीय रिझर्व्ह बँकेच्या  अधिकाऱ्यांनी कार्यप्रणालीतील  बदल, डेटाचे स्रोत आणि महत्त्वाच्या सुधारणांविषयी माहिती दिली.

पहिल्या तांत्रिक सत्राचे संचालन आयजीआयडीआर (आयजीआयडीआर) चे संचालक (कुलगुरु ) प्रा. बसंत कुमार प्रधान यांनी केले. या सत्रात 2022-23 हे आधारभूत वर्ष मानून तयार केलेल्या नवीन जीडीपी मालिकेवर चर्चा करण्यात आली.

दुसऱ्या तांत्रिक सत्रात, ज्याचे संचालन 'केअरएज ग्रुप'च्या  मुख्य अर्थतज्ज्ञ  रजनी सिन्हा यांनी केले, त्यात  2024-100 हे आधारभूत वर्ष  असलेल्या ग्राहक मूल्य निर्देशांकाच्या  नवीन मालिकेवर चर्चा करण्यात आली.

तिसऱ्या तांत्रिक सत्रात, ज्याचे संचालन भारतीय रिझर्व्ह बँकेचे  कार्यकारी संचालक रवी शंकर यांनी केले, त्यात 2022-23  हे आधारभूत वर्ष असलेल्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकाच्या (आयआयपी) नवीन मालिकेवर लक्ष केंद्रित करण्यात आले. ही मालिका सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या  आर्थिक सांख्यिकी विभागाने  सादर केली.

भारतीय रिझर्व्ह बँकेने  औद्योगिक आणि  कॉर्पोरेट क्षेत्राचे विश्लेषण आणि डेटा प्रसार या विषयावरही एक सादरीकरण केले.

प्रत्येक तांत्रिक सत्रानंतर एक खुली चर्चा आयोजित करण्यात आली होती, त्‍यामध्ये सहभागींनी नवीन डेटा स्रोत, कार्यप्रणाली आणि धोरण आणि  पूर्वानुमानावर होणाऱ्या त्यांच्या परिणामांवर आपली मते मांडली आणि सांख्यिकी मंत्रालय तसेच आरबीआयच्या अधिकाऱ्यांनी विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली.

या परिषदेने डेटा वापरकर्त्यांना आणि अधिकृत डेटा संकलकांना कार्यपद्धतीमधील बदल, त्यांचे अर्थ आणि परिणाम यांवर थेट चर्चा करण्याची एक उत्तम संधी उपलब्ध करून दिली, तसेच ‘विकासासाठी डेटा’ आणि 'विकसित भारत 2047' या संकल्पनांना अनुरूप अधिकृत सांख्यिकीचे अधिक चांगले आकलन आणि प्रभावी वापरास प्रोत्साहन देण्याच्या सांख्यिकी मंत्रालयाच्या वचनबद्धतेला दुजोरा दिला. 

 


सुवर्णा बेडेकर/सुषमा काणे/आशुतोष  सावे/प्रिती मालंडकर 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2340510) अभ्यागत कक्ष : 7
Read this releasein: English , Urdu