गोवा, 23 नोव्हेंबर 2026
57 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) 'सिनेमातील गोवा' या विषयावर आयोजित एका रंजक परिसंवादात, गोव्याने चित्रपट नगरी चित्रपट प्रशिक्षण संस्था आणि इतर पूरक पायाभूत सुविधा विकसित करून एक प्रमुख चित्रपट निर्मिती केंद्र म्हणून उदयास यावे, की नैसर्गिक सौंदर्याने नटलेली -समुद्रकिनारे, डोंगररांगा, ऐतिहासिक वास्तू आणि नद्या अशी आपली ओळख एक वैशिष्ट्यपूर्ण चित्रीकरण स्थळ म्हणून जपावी, हा प्रश्न चर्चेच्या केंद्रस्थानी होता.
कोंकणी, हिंदी आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट विषयक दृष्टिकोन एकत्र आणणाऱ्या या सत्रात, प्रसिद्ध कोंकणी चित्रपट निर्माते राजेंद्र तलक, हिंदी चित्रपट दिग्दर्शक व पटकथा लेखक विजय कृष्ण आचार्य आणि फ्रेंच अभिनेत्री मारियान बोर्गो सहभागी झाले होते. चित्रपट समीक्षक सचिन चट्टे यांनी या चर्चेचे सूत्रसंचालन केले.

गोव्यात चित्रपट निर्मितीसाठी पायाभूत सुविधा उभारण्याचे समर्थन करत, विजय कृष्ण आचार्य यांनी या राज्याच्या वैशिष्ट्यपूर्ण सौंदर्य आणि अनेक वर्षे चित्रपट निर्मात्यांना आकर्षित करणाऱ्या सांस्कृतिक आकर्षणावर भर दिला. त्यांनी नमूद केले की, गोव्याची एक प्रतीकात्मक आणि अनोखी अशी ओळख आहे, जी त्याला इतर सामान्य चित्रीकरण स्थळांपेक्षा वेगळे ठरवते. 'कभी हाँ कभी ना' या चित्रपटाचे उदाहरण देत त्यांनी सांगितले की, त्यातील पात्रे आणि तिथले वातावरण एकमेकांशी नैसर्गिकरित्या इतके जोडलेले होते की, ती कथा केवळ गोव्यातच बहरू शकली असती.
चित्रपट निर्मिती आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य बनवण्याच्या गरजेवर भर देत, आचार्य यांनी एक फिल्म सिटी स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला , ज्यामुळे चित्रपट निर्मात्यांना गोव्यात वेगवगळ्या बजेटमध्ये चित्रीकरण करणे शक्य होईल. “चित्रपट निर्मितीमध्ये खर्च हा एक महत्त्वाचा घटक असतो. जर गोव्याने स्पर्धात्मक दरात योग्य पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या, तर मोठ्या संख्येने निर्मिती संस्था तिथे आकर्षित होतील,” असे त्यांनी नमूद केले. स्थानिक लोकांना चित्रपट उद्योगात व्यावसायिक प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी फिल्म स्कूल आणि चित्रपट साक्षरता केंद्रे स्थापन करण्याचे देखील त्यांनी समर्थन केले. अशा उपक्रमांमुळे पुढील पिढ्यांवर खोल प्रभाव पडू शकतो आणि गोव्याला एक अद्वितीय कला केंद्र म्हणून उदयास येण्यास मदत होऊ शकते, असे ते म्हणाले.
या विषयावर एक वेगळा दृष्टिकोन मांडताना, राजेंद्र तलक यांनी चित्रपट पायाभूत सुविधांच्या नावाखाली गोव्याचे रूपांतर दुसऱ्या 'मुंबई'मध्ये केले जाऊ नये असा सावधगिरीचा इशारा दिला. राज्यात 'फिल्म सिटी' उभारण्याच्या व्यवहार्यतेवर शंका उपस्थित करत ते म्हणाले की, जर स्थानिक लोकांमध्ये चित्रपट निर्मितीबाबत खरोखरच स्वारस्य असेल, तरच सरकारने अशा उपक्रमांचा विचार करावा. मात्र, त्यांच्या मते, अनेक लोक चित्रपट निर्मितीच्या प्रत्यक्ष प्रक्रियेपेक्षा त्यातील ग्लॅमर आणि प्रसिद्धीकडे अधिक आकर्षित होतात. गोव्याचे नैसर्गिक सौंदर्य, पारंपरिक घरे आणि सांस्कृतिक ओळख जतन करणे हीच प्राथमिकता असायला हवी, यावर त्यांनी भर दिला.
तलक यांनी असेही निरीक्षण नोंदवले की, चित्रीकरणाचे ठिकाण म्हणून गोव्याचा मोठा भाग अजूनही अलिप्त आहे. "गोव्याचा जेमतेम दहा टक्के भागच आतापर्यंत चित्रीकरणासाठी वापरला गेला आहे," असे सांगत त्यांनी नमूद केले की, चित्रपट निर्मात्याला हव्या असलेल्या जवळपास सर्व गोष्टी गोव्यात आधीच उपलब्ध आहेत. चित्रपट निर्मितीसाठी गोव्याचे मूळ स्वरूप बदलण्याऐवजी, निर्मात्यांनी येथील विहंगम निसर्गदृश्ये आणि परिसराचा शोध घ्यावा आणि तिथे नैसर्गिकरीत्या चोख बसतील अशा कथांचा शोध घ्यावा.

मारियान बोर्गो यांनी अशा व्यक्तीचा दृष्टिकोन मांडला, जिने गोव्याला आपले घर मानले आहे. पायाभूत सुविधांचे महत्त्व मान्य करतानाच, त्यांनी आवर्जून सांगितले की जमीन, पारंपरिक घरे आणि निसर्ग यादेखील तितक्याच मौल्यवान संपत्ती आहेत, ज्यांचे संरक्षण करणे आवश्यक आहे. आधुनिक जीवनशैलीमुळे गोव्याचे सौंदर्य हळूहळू नष्ट होत असल्याबाबत चिंता व्यक्त करत, त्यांनी चित्रपट निर्मात्यांना चित्रीकरणाचे काम संवेदनशीलतेने आणि जबाबदारीने करण्याचे आवाहन केले. त्यांनी इफ्फीमध्ये पाहिलेल्या 'ओ मरिया' या चित्रपटात कोकणी सिनेमातील उल्लेखनीय प्रतिभा अनुभवायला मिळाल्याची आठवणही सांगितली.
चित्रपटांमध्ये गोवा आणि तेथील लोकांचे वारंवार होणारे साचेबद्ध चित्रण यावरही पॅनलने चर्चा केली, ज्यात या राज्याला समुद्रकिनारे, दारू, अमली पदार्थ आणि टोळी संस्कृतीशी जोडण्याची किंवा गोव्यातील पात्रांना परिचित विडंबनातून चित्रित करण्याची प्रवृत्ती समाविष्ट आहे.
Read IFFILOID here: https://www.pib.gov.in/iffi/57/iffiLoid.aspx?yr=2026&lang=1®=48
* * *
पीआयबी मुंबई | गोपाळ चिप्पलकट्टी/सुषमा काणे/दर्शना राणे