57th International Film Festival of India 2026
20 – 28 Nov 2026

भारत-जपानमधील सर्जनशील सहकार्याला बळकटी देण्यासाठी 57 व्या इफ्फीमध्ये आयआयसीटी आणि वॅकॉम इंडिया यांच्यात सामंजस्य करार

Posted On: 23 NOV 2026 3:06PMby PIB MumbaiRelease ID: 2340366Views: 5

गोवा, 23 नोव्‍हेंबर 2026

 

सर्जनशील तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास क्षेत्रातील भारत-जपान सहकार्य अधिक वृद्धिंगत करण्यासाठी ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीज’-आय आय सी टी, ही भारतीय सर्जनशील तंत्रज्ञान संस्था आणि वॅकॉम इंडिया यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. 57 व्या इफ्फी या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 मध्ये या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. आय आय सी टी ही ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्स्टेंडेड रिॲलिटी (AVGC-XR) या क्षेत्रांतील भारताची राष्ट्रीय उत्कृष्टता संस्था आहे.

या भागीदारीचा उद्देश भारतीय विद्यार्थ्यांना व्यावसायिक साधने आणि उद्योगाच्या गरजांनुसार प्रशिक्षण उपलब्ध करून देणे हा आहे. या करारानुसार, आयआयसीटीच्या  ॲनिमेशन फिल्म डिझाइन, इंटरॲक्टिव्ह व्हिडिओ गेम डिझाइन अँड डेव्हलपमेंट आणि पोस्ट प्रॉडक्शन अँड व्हीएफएक्स (VFX – व्हिज्युअल इफेक्ट्स) या 3, दोन वर्षांच्या पदविका अभ्यासक्रमांतील 18 विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कात 50 टक्के शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. तसेच, पात्र विद्यार्थ्यांना निवासासाठीही आर्थिक मदत दिली जाणार आहे.

डिसेंबर 2027 पर्यंत या सहकार्यांतर्गत जपानी आणि भारतीय कलाकार तसेच तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली मंगा (चित्रकथा), ॲनिमे (ॲनिमेशन चित्रपट किंवा मालिका) हे जपानी कलाप्रकार आणि इतर सर्जनशील विषयांवर 10 सर्जनशील स्पर्धा आयोजित केल्या जातील. तसेच, वॅकॉमच्या सहकार्याने दर तीन महिन्यांनी मास्टरक्लासेस आयोजित करण्यात येतील. 

या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळण्याबरोबरच जागतिक स्तरावर संधीही उपलब्ध होतील. दोन्ही संस्था संयुक्तपणे डिजिटल चित्रांकन, संकल्पना कला, व्यक्तिरेखा रचना, ॲनिमेशन आणि गेम आर्ट यांचा समावेश असलेले जागतिक विद्यार्थी पोर्टफोलिओ प्रदर्शन विकसित करतील. यामुळे विद्यार्थ्यांना उद्योगाच्या गरजांनुसार दर्जेदार पोर्टफोलिओ तयार करता येतील. परस्पर सहमतीने निश्चित केलेल्या अंमलबजावणी योजनांनुसार, वॅकॉमच्या टॅब्लेटच्या खोक्यावर आणि त्यांच्या ‘पिक्सेल पर्च’ या क्रिएटर्स मंचावर आयआयसीटीचा समावेश करण्याची तरतूदही या करारात आहे.

या प्रसंगी बोलताना आयआयसीटीचे संस्थापक संचालक डॉ. आशिष कुलकर्णी म्हणाले की, भारताची सर्जक अर्थव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी युवा निर्मात्यांना जागतिक स्तरावरील संधी आणि व्यासपीठांशी जोडणे आवश्यक आहे. या भागीदारीमुळे जपानचे ॲनिमेशन, मंगा आणि गेमिंग क्षेत्रातील कौशल्य आणि भारताची समृद्ध कथाकथन परंपरा यांचा संगम घडणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना जागतिक प्रेक्षकांसाठी स्वतःच्या नाविन्यपूर्ण कलाकृती आणि बौद्धिक संपदा निर्माण करता येईल, असेही त्यांनी नमूद केले.

आयआयसीटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विश्वास देवस्कर यांनी एव्हीजीसी-एक्सआर (AVGC-XR) क्षेत्रात रोजगाराच्या संधी मिळवण्यासाठी प्रत्यक्ष कामाचा अनुभव महत्त्वाचा असल्याचे अधोरेखित केले. स्पर्धा, मास्टरक्लासेस, व्यावसायिक साधने आणि पोर्टफोलिओ विकास यांमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रकल्पांवर काम करण्याचा अनुभव मिळेल. तसेच, उद्योगाच्या गरजांनुसार आवश्यक कौशल्ये आत्मसात करून रोजगारासाठी स्वतःला सक्षम बनवता येईल, असे त्यांनी सांगितले.

वॅकॉमच्या सर्जनशील अनुभव (क्रिएटिव्ह एक्सपीरियन्स) विभागाचे जागतिक प्रमुख कोजी यानो यांनी ॲनिमेशन, मंगा, गेमिंग आणि डिजिटल सामग्री निर्मिती या क्षेत्रांत भारत आणि जपान यांच्यात सर्जनशील सहकार्य आणि ज्ञानाची देवाणघेवाण करण्याच्या मोठ्या संधी असल्याचे नमूद केले. डिजिटल इंकसह वॅकॉमचे तंत्रज्ञान युवा भारतीय निर्मात्यांना जागतिक स्तरावरील सर्जनशील भागीदारीत सहभागी होण्यासाठी आणि सहकार्य करण्यासाठी सक्षम करेल, असेही ते म्हणाले.

आयआयसीटी  बद्दल:

ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्स्टेंडेड रिॲलिटी (AVGC-XR) या क्षेत्रांना प्रोत्साहन देण्यासाठी भारतात ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीज’ (आयआयसीटी) या राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. केंद्र सरकारचे माहिती आणि प्रसारण मंत्रालय, महाराष्ट्र शासन, फिक्की (FICCI – भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ) आणि सीआयआय – भारतीय उद्योग महासंघ यांच्या संयुक्त सहकार्याने ही संस्था उभारण्यात आली आहे. संस्थेच्या पहिल्या केंद्राचे  (कॅम्पस) कामकाज जुलै 2025 मध्ये मुंबईतील एनएफडीसी (राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ) संकुलात सुरू झाले. फिल्म सिटी येथे संस्थेचा कायमस्वरूपी कॅम्पस उभारण्याचे काम सुरू आहे. सध्या या संस्थेत 18 अभ्यासक्रम शिकवले जात असून, जागतिक स्तरावरील आघाडीच्या तंत्रज्ञान आणि माध्यम कंपन्यांशीही भागीदारी करण्यात आली आहे.

Read IFFILOID here: https://www.pib.gov.in/iffi/57/iffiLoid.aspx?yr=2026&lang=1&reg=48

 

* * *

पीआयबी मुंबई | गोपाळ चिप्‍पलकट्टी/आशुतोष सावे/दर्शना राणे


Great films resonate through passionate voices. Share your love for cinema with #IFFI2026 and #StoriesWithoutBorders. Tag us @pibindia on Instagram and @PIB_India on X, and we will help amplify your festival moments!

For accredited journalists, critics, bloggers, and vloggers seeking 1-on-1 interviews with filmmakers and festival juries, write to us at:
iffi.mediadesk@pib.gov.in with the subject line: Take One with PIB.


Official Release ID: 2340366
•
Media Centre: Goa
•
Festival Dates: Nov 20 – 28, 2026