57th International Film Festival of India 2026
20 – 28 Nov 2026

‘रुबी क्यूब’ चित्रपटातून मानवी नातेसंबंध आणि भारतीय कुटुंबव्यवस्थेतील गुंतागुंतीचा वेध: 57 व्या इफ्फीमध्ये दिग्दर्शक पी. शेषाद्री यांचा माध्यमांशी संवाद

Posted On: 22 NOV 2026 7:05PMby PIB MumbaiRelease ID: 2340052Views: 4

गोवा, 22 नोव्‍हेंबर 2026

 

57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) निमित्ताने आज पणजी, गोवा येथे आयोजित पत्रकार परिषदेत कन्नड चित्रपट ‘रुबी-क्यूब’च्या चमूने माध्यमांशी संवाद साधला. या संवादात ख्यातनाम चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक पी. शेषाद्री तसेच प्रमुख अभिनेत्री वैनीधी जगदीश सहभागी झाल्या होत्या.

चित्रपट निर्मितीविषयीचा आपला दृष्टिकोन मांडताना पी. शेषाद्री म्हणाले की, ते सक्रियपणे कथांच्या शोधात नसतात, तर कथा स्वतःहून त्यांच्यापर्यंत येऊ देतात. एखादी कथा त्यांना मनापासून भावते आणि ती पडद्यावर साकारण्याची तीव्र इच्छा निर्माण होते, तेव्हाच ते चित्रपट बनवतात, असे त्यांनी स्पष्ट केले. ‘रुबी क्यूब’ हा आपला 13 वा चित्रपट असल्याचे सांगताना त्यांनी नमूद केले की, या चित्रपटाची कथा वास्तविक जीवनातील अनुभवांवर आधारित आहे. भारतीय कुटुंबव्यवस्थेतील गुंतागुंत आणि या व्यवस्थेत नातेसंबंधांमध्ये होणारे बदल यांचा या कथेतून वेध घेण्यात आला आहे.

दिग्दर्शकांनी स्पष्ट केले की, चित्रपटातील पात्रांच्या जीवनातून मानवी जीवनातील विविध प्रश्न आणि आव्हानांचा शोध घेतला आहे. जीवनाची तुलना रुबिक क्यूबशी करताना ते म्हणाले की, जसे या कोड्यात अनेक रंग आणि रंगांच्या विविध रचना असतात, तसेच मानवी जीवनालाही विविध छटा आणि पैलू असतात. आपल्या चित्रपटांचा उद्देश एखादा विशिष्ट संदेश देणे हा असेलच असे नाही, तर प्रेक्षकांशी भावनिक नाते निर्माण करणे हा असतो, असे त्यांनी अधोरेखित केले. इफ्फीमुळे चित्रपटांना व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची, प्रसिद्धी मिळवण्याची आणि चित्रपटप्रेमींकडून अर्थपूर्ण प्रतिसाद मिळवण्याची महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध होते, असेही त्यांनी नमूद केले.

प्रमुख अभिनेत्री वैनीधी जगदीश यांनी आपल्या व्यक्तिरेखेतील भावनिक पैलू आणि चित्रपटाच्या मध्यवर्ती संकल्पनेविषयी सांगितले. या चित्रपटात एक मुलगी आपल्या माहेरी परतते आणि हळूहळू आपल्या आई-वडिलांच्या नातेसंबंधातील गुंतागुंत अनुभवते, असे त्यांनी स्पष्ट केले. बदलते नातेसंबंध, अपेक्षा आणि भावनिक आव्हाने यांचा सामना करताना व्यक्ती अनेकदा आपापले वेगवेगळे जीवन जगत असतात, अशा समकालीन कौटुंबिक वास्तवाचे प्रतिबिंब या चित्रपटात दिसते, असे त्यांनी अधोरेखित केले. चित्रपटाचे वर्णन करताना त्या म्हणाल्या की, ही कथा सूक्ष्म आणि संयत स्वरूपाची आहे. नाट्यमय अभिव्यक्तीपेक्षा दैनंदिन जीवनातील मानवी अनुभवांवर या कथेत अधिक भर देण्यात आला आहे.

एका डोंगराळ पर्यटनस्थळी आयोजित केलेल्या छोट्या सुट्टीच्या पार्श्वभूमीवर ‘रुबीक क्यूब’ या चित्रपटात एका कुटुंबातील तीन पिढ्या एकाच छताखाली एकत्र येतात. या चित्रपटाची कथा रोहिणी या मानसशास्त्रज्ञा भोवती फिरते. तिची मुलगी चित्रा स्वतःच्या वैवाहिक जीवनातील आव्हानांचा सामना करत असताना आई आणि वडिलांना एकत्र आणते आणि त्यामुळे रोहिणीची तिच्या पूर्वाश्रमीच्या पतीशी, मूर्तीशी पुन्हा भेट होते. कुटुंब एकत्र वेळ घालवत असताना मनात दडलेल्या भावना, जुने नातेसंबंध आणि जबाबदारीविषयीचे प्रश्न हळूहळू समोर येतात.

इफ्फी 2026 मधील या संवादातून ‘रुबीक-क्यूब’ चित्रपटामागील सर्जनशील दृष्टिकोन आणि समकालीन कौटुंबिक नातेसंबंधांचा घेतलेला वेध याविषयी प्रेक्षकांना आणि माध्यमांना माहिती मिळाली. महोत्सवातील या चित्रपटाच्या प्रदर्शनामुळे विविध देशांतील चित्रपटसृष्टीतील वेगवेगळे दृष्टिकोन आणि कथाकथनाच्या परंपरांचा उत्सव साजरा करण्याच्या इफ्फीच्या प्रयत्नांना आणखी बळ मिळाले आहे.

या पत्रकार परिषदेचे सूत्रसंचालन अनिमेष वझे यांनी केले.

संपूर्ण पत्रकार परिषद येथे पाहा:

Read IFFILOID here: https://www.pib.gov.in/iffi/57/iffiLoid.aspx?yr=2026&lang=1&reg=48

 

* * *

पीआयबी मुंबई | गोपाळ चिप्‍पलकट्टी/नितीन गायकवाड/दर्शना राणे


Great films resonate through passionate voices. Share your love for cinema with #IFFI2026 and #StoriesWithoutBorders. Tag us @pibindia on Instagram and @PIB_India on X, and we will help amplify your festival moments!

For accredited journalists, critics, bloggers, and vloggers seeking 1-on-1 interviews with filmmakers and festival juries, write to us at:
iffi.mediadesk@pib.gov.in with the subject line: Take One with PIB.


Official Release ID: 2340052
•
Media Centre: Goa
•
Festival Dates: Nov 20 – 28, 2026