गोवा, 22 नोव्हेंबर 2026
सिनेमा भौगोलिक आणि सांस्कृतिक सीमा ओलांडून मानवी भावनांच्या वैश्विक भाषेच्या माध्यमातून लोकांना एकमेकांशी जोडतो, असे प्रतिपादन प्रख्यात अभिनेत्री कार्ला सोफिया गॅस्कॉन यांनी केले. गोव्यात सुरू असलेल्या 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फीअंतर्गत (IFFI - International Film Festival of India) आयोजित स्टेजेस अक्रॉस बॉर्डर्स (सीमांपलिकडचे रंगमंच) या विशेष मास्टरक्लास दरम्यान त्या बोलत होत्या.
_20261122150547_e98250.jpeg)
या मास्टरक्लास दरम्यान गॅस्कॉन यांनी एखाद्या गोष्टीचा ध्यास घेण्आयाचे आणि समर्पणाचे महत्त्व अधोरेखित केले. नवोदित कलाकारांनी स्वतःवर विश्वास ठेवावा, आपल्या व्यक्तित्वाचा स्वीकार करावा आणि आपल्या कलेप्रती निष्ठा बाळगावी, असे आवाहन त्यांनी केले. अस्सल अभिनय सादर करण्यासाठी आपल्या कलेवर निस्सीम प्रेम असणे अत्यंत गरजेचे असते, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले.
अभिनयाबद्दलचा आपला दृष्टिकोनही त्यांनी यावेळी मांडला. पडद्यावर अस्सलपणा आणण्यासाठी गहिऱ्या भावनिक गुंतवणुकीच्या आधाराने आपण प्रत्येक भूमिकेत पूर्णपणे समरस होऊन जातो, असे त्यांनी सांगितले. पारंपरिक चौकटीबाहेरील आणि आव्हानात्मक भूमिकांना आपली पसंती असल्याचे त्या म्हणाल्या. स्वतःच्या अनुभवांपेक्षा पूर्णपणे वेगळ्या भूमिका साकारल्याने सर्जनशील अनुभव, कलात्मक विकास आणि आत्मपरिक्षणाच्या संधी मिळतात, असे त्यांनी नमूद केले.

अभिनय हा आव्हाने आणि नव्या शोधांचा एक सतत चालू राहणारा प्रवास असल्याचे गॅस्कॉन यांनी सांगितले. प्रत्येक भूमिका ही एका नव्या दृष्टिकोनाची आणि वेगळ्या पद्धतीची मागणी करत असते, ही बाब त्यांनी अधोरेखित केली. सिनेमा म्हणजे भौगोलिक किंवा सांस्कृतिक पार्श्वभूमीचा विचार न करता, सामायिक मानवी भावनांच्या माध्यमातून प्रेक्षकांना एकत्र आणणारी वैश्विक भाषा आहे असे त्या म्हणाल्या.
चित्रपट निर्मिती ही सामूहिक योगदातूनच घडत असते असे त्यांनी सांगितले. चित्रपटाच्या निर्मितीत सर्जनशील चमूतील प्रत्येक सदस्याचे योगदान असते याचा दखलपूर्ण उल्लेख त्यांनी केला. कोणताही चित्रपट हा शेवटी त्या चित्रपटकर्मींच्या सामूहिक दृष्टिकोनातून आणि प्रयत्नांतूनच आकाराला येत असतो, असे त्यांनी अधोरेखित केले.

या मास्टरक्लासमधून नवोदित कलाकार, चित्रपटकर्मी आणि चित्रपटप्रेमींना सर्जनशील प्रक्रिया, अभिनयाचे बारकावे आणि चित्रपट निर्मिती प्रक्रियेतील सामूहिकतेच्या कलेबद्दल जाणून घेता आले.
Read IFFILOID here: https://www.pib.gov.in/iffi/57/iffiLoid.aspx?yr=2026&lang=1®=48
* * *
पीआयबी मुंबई | गोपाळ चिप्पलकट्टी/तुषार पवार/दर्शना राणे