गोवा, 21 नोव्हेंबर 2026
गोव्यात सुरु असलेल्या 57 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फी मध्ये आज माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार यांच्या हस्ते प्रकाशन विभागाच्या दालन क्रमांक 24 चे उद्घाटन झाले. प्रकाशन विभागाच्या महासंचालक कांचन प्रसाद याप्रसंगी उपस्थित होत्या.

यंदा गोव्यात 20 ते 28 नोव्हेंबर 2026 या कालावधीत भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फीचे 57 वे पर्व संपन्न होत आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने देशभरातील आणि जगभरातील चित्रपटकर्मी, चित्रपटप्रेमी, चित्रपट उद्योग क्षेत्रातील तज्ञ व्यावसायिक आणि प्रतिनिधी एकत्र आले आहेत.
या आयोजनाअंतर्गत दालन क्रमांक 24 हे प्रकाशन विभागाचे दालन आहे. या दालनात देशाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, इतिहास, कला, सिनेमा, साहित्य आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या इतर विषयांवरील पुस्तके आणि प्रकाशनांचा वैविध्यपूर्ण संग्रह मांडण्यात आला आहे. या दालनाच्या माध्यमातून इथे भेट देणाऱ्यांना देशाची सांस्कृतिक विविधता, सर्जनशील परंपरा आणि बौद्धिक वारशाचा अनुभव मांडणाऱ्या माहितीसंपन्न आणि समृद्ध प्रकाशनांबद्दल जाणून घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

या दालनात प्रामुख्याने भारतीय सिनेमाशी संबंधित प्रकाशने मांडली आहेत. या प्रकाशनांमधून चित्रपटप्रेमी, विद्यार्थी, संशोधक आणि प्रतिनिधींना सिनेमाची उत्क्रांती, चित्रपटकर्मींचे सर्जनशील प्रवास आणि भारताच्या सिनेमॅटिक वारशात महत्वाच्या व्यक्तीमत्वांनी दिलेले योगदान याबद्दल सखोल माहिती मिळवण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
प्रकाशन विभाग ही केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेली एक आघाडीची प्रकाशन संस्था आहे. या संस्थेच्या वतीने 1941 पासून विविध विषयांवरील पुस्तके आणि नियतकालिके प्रकाशित केली जात आहेत. प्रकाशन विभाग आपल्या प्रकाशनांच्या माध्यमातून अविरतपणे देशाच्या साहित्यिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि बौद्धिक वारशाचे जतन तसेच प्रचार प्रसार करण्याचे काम करत आला आहे.

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील प्रकाशन विभागाचा हा सहभाग म्हणजे वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी, पुस्तकांशी जोडून घेण्याकरता प्रेरणा देण्यासाठी तसेच मौल्यवान ज्ञान व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विभाग सातत्यपूर्णतेने करत असलेल्या प्रयत्नांचाच एक भाग आहे.
हे दालन सिनेमाला साहित्याशी जोडणारे एक व्यासपीठ ठरले आहे. या दालनामुळे महोत्सवासाठी आलेल्या प्रतिनिधी आणि इथे भेट देणाऱ्यांना देशाची कथात्मक मांडणीची पडद्यामागील समृद्ध परंपरा जाणून घेता येणार आहे.
या महोत्सवातील आपल्या सहभागातून प्रकाशन विभागाने वाचनसंस्कृतीला चालना देण्याप्रती, देशाच्या सर्जनशील कतृत्वाचा गौरव करण्याप्रती, तसेच वर्तमान आणि भावी पिढ्यांसाठी देशाचा सांस्कृतिक आणि साहित्यिक वारसा जतन करण्याप्रती असलेली आपली वचनबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.

Read IFFILOID here: https://www.pib.gov.in/iffi/57/iffiLoid.aspx?yr=2026&lang=1®=48
* * *
पीआयबी मुंबई | सुषमा काणे/तुषार पवार/दर्शना राणे