Posted On:
20 NOV 2026 5:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर 2026
सोमनाथ स्वाभिमान पर्व अंतर्गत आयोजित युवा सोमनाथ यात्रेला केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी नवी दिल्लीतील सफदरजंग रेल्वे स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. विविध महाविद्यालये आणि संस्थांमधील 1,100 हून अधिक विद्यार्थ्यांनी या विशेष रेल्वे गाडीतून गुजरातमधील सोमनाथच्या दिशेने प्रस्थान केले.
उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत म्हणाले की, हजारो वर्षांपासून वारंवार झालेल्या हल्ल्यांनंतरही, सोमनाथ मंदिर भारताच्या चिरंतन सांस्कृतिक वारशाचे प्रतीक म्हणून आजही उभे आहे. त्यांनी अधोरेखित केले की, आधीच्या पिढ्यांनी केवळ आपल्या श्रद्धेचेच नव्हे, तर देशाच्या समृद्ध परंपरा आणि वारशाचेही रक्षण केले. ते म्हणाले की, सोमनाथचा इतिहास भारताची श्रद्धा, दृढता आणि सांस्कृतिक सातत्याचे प्रतिबिंब आहे.
युवा सहभागींना संबोधित करताना, केंद्रीय मंत्री म्हणाले की, हा काही सामान्य प्रवास नाही, तर भारताचा संघर्ष आणि जिद्दीचा इतिहास समजून घेण्याची आणि त्याचा गौरवशाली वारसा पुढे नेण्याची संधी आहे.
‘सोमनाथ स्वाभिमान पर्वा’ अंतर्गत, आतापर्यंत 35,000 हून अधिक भाविकांना सोमनाथ महादेव दर्शनाची संधी मिळाली. हा उपक्रम सोमनाथ मंदिराचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व आणि भारताच्या वारशात त्याचे चिरंतन स्थान अधोरेखित करतो.
युवा पिढीला भारताच्या समृद्ध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाशी जोडणे, तसेच सोमनाथच्या ऐतिहासिक महत्त्वाबद्दल अधिक जागरूकता निर्माण करणे, हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.
20 ते 25 नोव्हेंबर 2026 दरम्यान, आपल्या नियोजित प्रवासात ही विशेष रेल्वे गाडी नवी दिल्लीतील सफदरजंग रेल्वे स्थानकापासून गुजरातमधील वेरावळ जंक्शनपर्यंत प्रवास करेल. तिथून विद्यार्थी सोमनाथकडे रवाना होतील, आणि भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिराचे ऐतिहासिक आणि अध्यात्मिक महत्त्व अनुभवतील.







निलीमा चितळे/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai