57th International Film Festival of India 2026
20 – 28 Nov 2026

‘सीमाविरहित कथा’ संकल्पनेवर आधारित 57व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) उद्या गोव्यात होणार उद्घाटन


जगभरातील चित्रपट सृष्टीतील मान्यवरांच्या स्वागतासाठी गोवा सज्ज, चित्रपट संगीत आणि संस्कृतीचा रंगणार भव्य सोहळा

‘सीमाविरहित कथा’ ही महोत्सवाची संकल्पना; उद्घाटन सोहळ्यात संगीत, सांस्कृतिक कार्यक्रम आणि चित्रपटांचा अनोखा मेळ

Posted On: 19 NOV 2026 7:14PMby PIB MumbaiRelease ID: 2338792Views: 6

गोवा, 19 नोव्‍हेंबर 2026

 

57वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) उद्या 20 नोव्हेंबर पासून गोव्यात सुरू होत आहे. या महोत्सवात भारतीय तसेच जगभरातील चित्रपट निर्माते, कलाकार, प्रतिनिधी आणि चित्रपटप्रेमी गोव्यात एकत्र येणार आहेत. नऊ दिवस चालणाऱ्या या महोत्सवात चित्रपट प्रदर्शन सांस्कृतिक देवाणघेवाण आणि सर्जनशील उपक्रमांची रेलचेल असणार आहे.

‘सीमाविरहित कथा’ या संकल्पनेखाली आयोजित, या वर्षीचा महोत्सव विविध देश, संस्कृती आणि चित्रपट परंपरांमधील चित्रपट आणि सर्जनशील कलाविष्कारांना एकत्र आणणार आहे. चित्रपट ही वैश्विक भाषा असल्याचा संदेश या महोत्सवातून दिला जाणार आहे.

गोव्यातील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियमवर महोत्सवाचा उद्घाटन सोहळा होणार आहे. संगीत संध्या, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध औपचारिक कार्यक्रमांच्या सादरीकरणाने या नऊ दिवसीय महोत्सवाचा प्रारंभ होईल.

या सोहळ्याची सुरुवात ध्वनी आणि प्रकाश सादरीकरणाने होईल. त्यानंतर राष्ट्रीय गीत आणि राष्ट्रगीत सादर केले जाईल. प्रकाश, जीवन आणि नवीन प्रारंभाचे प्रतीक म्हणून दीपप्रज्वलन केले जाईल आणि तुळशीच्या रोपाला जल अर्पण करून महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन करण्यात येईल. पाणी घालण्याचा कार्यक्रम होईल.

उद्घाटन सोहळ्याला उपस्थित असणारे मान्यवर

या सोहळ्यात गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच माहिती आणि प्रसारण मंत्रालयातील वरिष्ठ मान्यवर उपस्थितांना संबोधित करणार आहेत.

या उद्घाटन सोहळ्यात भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रमुख व्यक्ती खासदार रवी किशन, चित्रपट निर्माते आणि महोत्सव संचालक आशुतोष गोवारीकर, चित्रपट निर्माते मधुर भांडारकर आणि चित्रपट निर्माते आनंद एल. राय यांच्यासह भारतीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील इतर प्रतिष्ठित सदस्य सहभागी होणार आहेत.

रिकी केज यांचे सिम्फनिक ऑर्केस्ट्राचे सादरीकरण

या संध्याकाळचे एक प्रमुख आकर्षण म्हणजे तीन वेळा ग्रॅमी पुरस्कार विजेते संगीतकार आणि पर्यावरणवादी रिकी केज यांचे 'अ वर्ल्ड ऑफ सिनेमा थ्रू म्युझिक' (संगीताच्या माध्यमातून सिनेमाचे जग) हे सिम्फनी ऑर्केस्ट्रा सादरीकरण. हे सादरीकरण विविध संस्कृती आणि कथाकथनाच्या परंपरांमधून एका संगीतमय प्रवासाद्वारे चित्रपटाची वैश्विक भाषा जिवंत करेल.

या संगीत सादरीकरणानंतर 'म्युझिक विदाऊट बॉर्डर्स' हा विशेष संगीतमय कार्यक्रम होईल. महोत्सवाची संकल्पना अधोरेखित करणाऱ्या या कार्यक्रमात विविध देशातील संगीतकार एकत्र येऊन संगीत परंपरा, सलोखा आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीचा उत्सव साजरा करतील.

इफ्फी’शी संबंधित मोराचे प्रतीक 'बियॉन्ड द फ्रेम' या विशेष नृत्य सादरीकरणाद्वारे साकार केले जाणार आहे. नृत्य आणि कलात्मक अभिव्यक्तीद्वारे महोत्सवाचे प्रतिष्ठित प्रतिक जिवंत केले जाणार आहे. 

महोत्सवाच्या स्पर्धात्मक विभागासाठी चित्रपटांची निवड करण्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या भारतीय पॅनोरमा आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा परीक्षक मंडळांचाही या समारंभात विशेष सन्मान केला जाणार आहे.

आंतरराष्ट्रीय स्पर्धा ज्युरी

आंतरराष्ट्रीय स्पर्धा ज्युरीचे अध्यक्षपद चित्रपट निर्माते आनंद एल. राय भूषवणार असून जुरीच्या सदस्यांमध्ये सोल बेरुएझो पिचॉन-रिव्हिएर (अर्जेंटिना), बोगदान मुरेसानू (रोमानिया), मारिया अलेजांद्रा रोजास (कोलंबिया) आणि रॅचपूम बूनबंचचोक (थायलंड) या जगभरातील प्रतिष्ठित चित्रपट व्यावसायिकांचा समावेश आहे. उद्घाटन समारंभात ज्युरीचा सत्कार केला जाणार आहे. 

इंडियन पॅनोरमा ज्युरी

राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते मधुर भांडारकर हे इंडियन पॅनोरमा फीचर फिल्म ज्युरीचे अध्यक्ष पद भूषवणार आहेत. तर, नॉन-फीचर फिल्म ज्युरीचे अध्यक्षपद चित्रपट निर्माते आणि सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटचे माजी संचालक हिमांशू शेखर खटुआ भूषवणार आहेत.

वेव्ह्स फिल्म बाजारच्या दोन दशकांच्या वाटचालीवर आधारित एक विशेष सादरीकरण यावेळी करण्यात येणार आहे. भारतीय चित्रपट निर्मात्यांना आंतरराष्ट्रीय चित्रपट उद्योगाशी जोडणारे तसेच सर्जनशील आणि व्यावसायिक सहकार्याला चालना देणारे व्यासपीठ म्हणून वेव्ह्स फिल्म बाजारचा झालेला विकास या सादरीकरणातून अधोरेखित केला जाणार आहे. 

जगभरातील चित्रपटांची नऊ दिवसीय मेजवानी

नामांकित आंतरराष्ट्रीय चित्रपटांपासून ते उदयोन्मुख कलाकारांपर्यंत आणि वैविध्यपूर्ण भारतीय कथांपर्यंत  प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा विस्तृत सिनेमॅटिक अनुभव देण्यासाठी इफ्फी 2026  सज्ज आहे.  या महोत्सवात 86  देशांमधील  150 हून अधिक चित्रपट प्रदर्शित केले जाणार असून गोव्याच्या भूमीत  कथाकथनाच्या या बहुविध परंपरा आणि दृष्टिकोनांचा पटल उलगडला जाणार आहे.

या महोत्सवाचे उद्घाटन, प्रख्यात पोलिश चित्रपट निर्माते पावेल पावलिकोव्स्की दिग्दर्शित 'फादरलँड' या चित्रपटाने होईल, त्यांच्या या कलाकृतीला 2026 च्या कान्स चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा  पुरस्कार मिळाला आहे. महोत्सवातील मध्यांतर विशेष चित्रपट  म्हणून अलिना शेरबान दिग्दर्शित 'आय मॅटर' हा चित्रपट दाखवला जाईल. ही रोमानिया, जर्मनी आणि बेल्जियमची संयुक्त निर्मिती असून, या चित्रपटातील संवाद रोमानियन आणि रोमानी या भाषांमध्ये आहेत. जागतिक चित्रपटांच्या या नऊ दिवसांच्या सोहळ्याची सांगता 28 नोव्हेंबर रोजी सिंगापूरचे चित्रपट निर्माते अँथनी चेन दिग्दर्शित 'वी आर ऑल स्ट्रेंजर्स' या चित्रपटाने होईल. या महोत्सवात विविध स्पर्धा, विशेष नियोजित चित्रपट प्रदर्शन आणि देशनिहाय सादरीकरणांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीवरही विशेष प्रकाश टाकण्यात येणार आहे. यामध्ये स्पेन  ‘सन्माननीय देश’तर रशिया  ‘भागीदार देश’आहे.

इंडियन पॅनोरमा च्या माध्यमातून भारतातल्या 18 भाषांमधील 76 चित्रपटांच्या प्रकाशनातून भारतीय चित्रपटांचे महत्त्वपूर्ण स्थान अधोरेखित होईल. तसेच ब्रिक्स सिनेमाच्या माध्यमातून ब्रिक्स सदस्य आणि भागीदार देशांमधील चित्रपटांना प्रकाशझोतात येता येईल.

पदार्पणातील सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म स्पर्धेच्या माध्यमातून या महोत्सवात उदयोन्मुख चित्रपट निर्मात्यांच्या कलाकृतींचा सोहळा साजरा होईल तसेच यामध्ये इतर स्पर्धात्मक विभागांसह आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि आयसीएफटी-युनेस्को गांधी पदक यांसारख्या इतर स्पर्धात्मक विभागांचाही समावेश असून त्या माध्यमातून  विविध श्रेणींमधील चित्रपट निर्मितीतील सिनेमॅटिक उत्कृष्टतेचा गौरव केला जाईल.

इफ्फी 2026 मधील नवीन विभाग

कथाकथनाच्या विविध प्रकारांचा सोहळा साजरा करत प्रेक्षकांना एक भव्य सिनेमॅटिक अनुभव देण्याच्या उद्देशाने यावर्षीच्या महोत्सवात दोन नवीन विभाग सुरु करण्यात आले आहेत. अनिमेशन चित्रपट हा पहिला विभाग असून यामध्ये पाच उल्लेखनीय चित्रपट प्रदर्शित केले जातील आणि ऍनिमेटेड चित्रपटांमधील सर्जनशीलता तसेच नाविन्याचा अनुभव घेता येईल. दुसऱ्या विभागात ‘फिल्म्स अबाऊट फिल्म्स’ या संकल्पनेअंतर्गत पाच चित्रपट सादर करण्यात येणार आहेत. चित्रपट निर्मितीमागील कला, कौशल्य, तंत्र आणि सर्जनशील प्रक्रियेवर प्रकाश टाकणे हा या विभागाचा मुख्य उद्देश आहे.

सुवर्ण मयूर आणि रौप्य मयूर पुरस्कार

महोत्सवाच्या स्पर्धात्मक विभागांमध्ये प्रतिष्ठित सुवर्ण मयूर आणि रौप्य मयूर पुरस्कारांच्या माध्यमातून चित्रपट क्षेत्रातील उत्कृष्टतेला गौरवण्यात येईल, यात एकूण सहा पुरस्कारांचा समावेश आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीसुवर्ण मयूर पुरस्कार  दिला जाईल, तर रौप्य मयूर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, विशेष ज्युरी पुरस्कार आणि दिग्दर्शकाचा सर्वोत्कृष्ट पदार्पणातील चित्रपट यांचा  समावेश असेल. या महोत्सवात सहिष्णुता, आंतरसांस्कृतिक संवाद आणि शांततेच्या संस्कृतीला प्रोत्साहन देणाऱ्या चित्रपटासाठी आयसीएफटी-युनेस्को गांधी पदकही प्रदान केले जाईल.

'क्रिएटिव्ह माईंड्स ऑफ टुमॉरो' या माध्यमातून युवा उदयोन्मुख चित्रपट निर्मात्यांना चित्रपट उद्योगातील व्यावसायिकांकडून शिकण्याची संधी मिळेल, त्यांच्या समवेत काम करण्याची आणि मास्टरक्लासेस, कार्यशाळा, परस्परसंवादी सत्रे आणि 48 तासांच्या चित्रपट निर्मिती आव्हानाच्या माध्यमातून चित्रपट निर्मितीच्या विश्वाचा धांडोळा घेता येईल.

चित्रपट प्रदर्शनांच्या पलीकडे या महोत्सवात चित्रपट निर्माते, कलाकार, विद्यार्थी आणि उद्योगातील व्यावसायिकांमध्ये विशेष नियोजित संवाद आणि उद्योग-केंद्रित उपक्रमांच्या माध्यमातून अधिक व्यापक स्तरावर संवाद होऊन संबंधांना चालना मिळेल. इफ्फी च्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या वेव्ह्ज फिल्म बाजार मधून सर्जनशीलत कल्पनांची  देवाणघेवाण, सहकार्य आणि उद्योगस्तरीय संधी उपलब्ध होतील तसेच चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक आणि चित्रपट खरेदी करणाऱ्यांशी, वितरकांशी आणि इतर संबंधित  घटकांशी जोडले जातील.

वर्ष 1952 मध्ये सुरु झालेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ,इफ्फी हा भारतीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी, सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवण्यासाठी आणि जगभरातील चित्रपट निर्माते, उद्योगातील व्यावसायिक आणि  प्रेक्षकांना एकत्र आणण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ म्हणून कार्यरत आहे.

Please click here for 57th International Film Festival of India: Official Schedule 20 to 28 November 2026

 

* * *

पीआयबी मुंबई | गोपाळ चिप्‍पलकट्टी/श्रद्धा मुखेडकर/भक्‍ती सोनटक्‍के/दर्शना राणे


Great films resonate through passionate voices. Share your love for cinema with #IFFI2026 and #StoriesWithoutBorders. Tag us @pibindia on Instagram and @PIB_India on X, and we will help amplify your festival moments!

For accredited journalists, critics, bloggers, and vloggers seeking 1-on-1 interviews with filmmakers and festival juries, write to us at:
iffi.mediadesk@pib.gov.in with the subject line: Take One with PIB.


Official Release ID: 2338792
•
Media Centre: Goa
•
Festival Dates: Nov 20 – 28, 2026