आयुष मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची बुर्किना फासोचे मंत्री आणि राष्ट्राध्यक्षांचे विशेष सल्लागार, महामहीम रॉजर बारो यांच्याशी भेट

पारंपारिक औषधपद्धती क्षेत्रात बुर्किना फासोसोबत जवळून काम करण्यास भारत उत्सुक: प्रतापराव जाधव

संस्थात्मक सहकार्यामुळे पारंपरिक औषधपद्धती क्षेत्रात सहकार्याचे नवीन मार्ग खुले होतील: प्रतापराव जाधव

Posted On: 18 NOV 2026 7:02PM by PIB Mumbai

आयुष मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) प्रतापराव जाधव यांनी आज नवी दिल्ली येथे बुर्किना फासोचे मंत्री आणि राष्टाध्यक्षांचे विशेष सल्लागार, महामहिम रॉजर बारो यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाची भेट घेतली. बुर्किना फासोचे हे शिष्टमंडळ 17 ते 25 नोव्हेंबर 2026 या कालावधीकरिता भारताच्या दौऱ्यावर आले आहे. पारंपरिक चिकित्सा पद्धती आणि आयुष संस्था या गोष्टींना दौऱ्यात मुख्य प्राधान्य आहे.

भारताच्या दृष्टीने बुर्किना फासोसोबतचे द्विपक्षीय संबंध अत्यंत महत्त्वाचे असून ही भागीदारी अधिक दृढ करण्यास भारत उत्सुक असल्याचे, प्रतापराव जाधव यांनी या भेटीवेळी सांगितले. दोन्ही देशांना पारंपारिक औषधे आणि स्थानिक आरोग्यसेवा पद्धतींचा समृद्ध वारसा लाभला असल्याने तो या क्षेत्रातील सहकार्यासाठी भक्कम पाया असल्याचे त्यांनी नमूद केले.

बुर्किना फासोचे माननीय राष्ट्राध्यक्ष कॅप्टन इब्राहिम ट्राओरे यांनी, बुर्किना फासोमधील पारंपरिक औषधी वनस्पतींचे संवर्धन आणि त्यांच्या शाश्वत विकासासाठी भारताचे सहकार्य घेण्यात स्वारस्य दाखवल्याचे आपल्याला समजले आहे, असे जाधव यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की औषधी वनस्पतींचे प्रमाणीकरण, गुणवत्ता हमी, फार्माकोपियल मानके आणि नियामक आराखडा यांसारख्या बाबींमध्ये आपला अनुभव आणि कौशल्य सामायिक करून पारंपरिक औषधांच्या क्षेत्रात बुर्किना फासोच्या साथीने काम करण्यास भारत उत्सुक आहे. 

भारतातील आयुष संस्था आणि बुर्किना फासोमधील या क्षेत्राशी संबंधित पारंपारिक चिकित्सा संस्था यांच्यातील संस्थात्मक भागीदारीचे जाधव यांनी स्वागत केले. भारताचे 'राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ' आणि बुर्किना फासोमधील संबंधित संस्थाच्या सहकार्याने 'पारंपारिक वनस्पतींचे जतन आणि शाश्वत विकासासंबंधी भारत-बुर्किना फासो दरम्यान महत्त्वाचा प्रकल्प राबवण्यास मोठी संधी असल्याचे त्यांनी नमूद केले.

बुर्किना फासोमध्ये योग आणि आयुष-आधारित आरोग्य कार्यक्रमांच्या प्रसारास सहाय्य पुरविण्यासाठीही भारत उत्सुक असल्याचे मंत्र्यांनी सांगितले. संस्थात्मक चौकटीला प्रोत्साहन मिळावे, यासाठी भारताचे आयुष मंत्रालय आणि बुर्किना फासोचे आरोग्य मंत्रालय यांच्यात सामंजस्य करार करण्याच्या शक्यतेचा दोन्ही बाजूंना शोध घेता येऊ शकेल, असेही ते म्हणाले. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) आगामी काळात होणाऱ्या पारंपारिक औषध प्रणालीविषयक जागतिक शिखर परिषदा तसेच गुजरातच्या जामनगर येथील 'डब्ल्यूएचओ ग्लोबल ट्रॅडिशनल मेडिसिन सेंटर'मधील कार्यक्रमांमध्ये बुर्किना फासोच्या सहभागाचे  त्यांनी  स्वागत केले. तातडीचे पाऊल म्हणून दोन्ही देश आपापल्या स्तरावर  हा प्रस्ताव पुढे नेऊ शकतील आणि सहकार्याची विशिष्ट क्षेत्रे निश्चित करतील अशा नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी सूचना त्यांनी केली.

दक्षिणेकडील देशांमधील परस्पर सहकार्याबाबतची वचनबद्धता आणि जी20 व ब्रिक्सच्या माध्यमातून तयार झालेले संबंध अधोरेखित करुन मंत्री म्हणाले की, बुर्कीना फासोला विकासाची उद्दिष्टे गाठण्यात भारत सर्वतोपरी सहाय्य करत असून ही विकासात्मक भागीदारी बुर्कीना फासोच्या सरकारने निश्चित केलेल्या गरजा व प्राधान्यांनुसार आहे. ते म्हणाले की, भारत आयईटीसी, आयसीसीआर व पीसीएफडी अभ्यासक्रम यासारख्या कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण व शिष्यवृत्ती उपक्रमांद्वारे क्षमता बांधणीमध्येही योगदान देत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये 250 पेक्षा जास्त बुर्कीनबी नागरिकांना याचा लाभ झाला आहे.

बुर्कीना फासोमधील छोटा, परंतु उत्साही भारतीय समुदाय देशाच्या सामाजिक आर्थिक विकासामध्ये सकारात्मक योगदान देत आहे असे मंत्री जाधव यांनी नमूद केले. ते म्हणाले की, भारतीय समुदायाच्या सुरक्षेसाठी बुर्कीना फासोचे सरकार करत असलेल्या प्रयत्नांची भारताला जाणीव आहे. सहकार्याच्या माध्यमातून पारंपरिक औषधांना प्रोत्साहन, ज्ञानाची देवाणघेवाण व क्षमता उभारणी या क्षेत्रांमध्ये बुर्कीना फासो देशासोबत काम करण्याप्रति भारत वचनबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. शिष्टमंडळाची ही भेट फलदायी व यशस्वी ठरो अशा शुभेच्छा देऊन द्विपक्षीय सहकार्य आणखी वाढेल अशी अपेक्षा असल्याचे जाधव म्हणाले.

या शिष्टमंडळात उच्च शिक्षण व आरोग्य विषयक विशेष मंत्रीस्तरीय सल्लागार प्रो. रकीस्सीदा अल्फ्रेड औद्राओगो, आरोग्य मंत्रालयाच्या पारंपरिक व पर्यायी औषध  विभागाच्या संचालक आणि या अभियानाच्या अहवालकर्त्या डॉ. मरियम सावादोगो/बगायान, जोसेफ की झेरबो विद्यापीठातील औषधविज्ञान विषयातील तज्ज्ञ प्राध्यापक-संशोधक प्रो. अमिनाता पग्निमडेब्सोम नाकौल्मा आणि तज्ज्ञ औषधनिर्माते तसेच पारंपरिक औषध व एकात्मिक उपचार केंद्राचे संचालक डॉ. हायसिंथ बोन्कोउंगो यांचा समावेश होता.

बुर्कीना फासो दूतावासाचे प्रतिनिधित्व राजदूत सोमे डिझायर बोनीफेस, अभियानाचे उपप्रमुख झिंग ओट्टारा डिडियर ख्रिस्तीयन आणि दुभाषी औबा जोएल यांनी केले. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातर्फे या बैठकीला बुर्कीनो फासोचे भारतीय राजदूत ओ. पी. मीना, परराष्ट्र मंत्रालय (मध्य व पश्चिम अफ्रिका) उपसचिव कैलाश भट्ट, आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा आणि आयुष मंत्रालयाचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

भारत व बुर्कीना फासो यांच्यातील पारंपरिक औषध क्षेत्रातील सहकार्य वाढविणे आणि आयुष संस्था व त्यांच्या बुर्कीनबी समकक्ष संस्था यांच्यातील सहकार्य मजबूत करणे याबाबतची सामायिक वचनबद्धता या बैठकीमध्ये पुन्हा व्यक्त करण्यात आली.

***

Shailesh Patil / Manjiri Ganoo / Surekha Joshi / Madhura Nerurkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2338223) अभ्यागत कक्ष : 18