Posted On:
18 NOV 2026 6:42PM by PIB Mumbai
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'जागतिक सूक्ष्मजीवप्रतिबंधक औषध प्रतिरोधाविरुद्ध (अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स अर्थात एएमआर) जागरूकता सप्ताह 2026' या राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमाचे आज नवी दिल्ली येथील कर्तव्य भवनात उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून सार्वजनिक आरोग्यापुढे असलेल्या अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स म्हणजे सूक्ष्मजीवविरोधी औषधांना निर्माण होणारा प्रतिकार) या नजीकच्या काळातील एका धोक्याबद्दल मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण करण्याचा आणि सामूहिक कृती करण्यास प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याने आठवडाभर राबवण्यात येणारा हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे.

या कार्यक्रमाला दूरस्थ पद्धतीने संबोधित करताना, केंद्रीय आरोग्य सचिव पुण्या सलीला श्रीवास्तव यांनी अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्सच्या (एएमआर) वाढत्या धोक्याकडे लक्ष वेधत, हे सध्याच्या काळातील सार्वजनिक आरोग्यापुढे असलेले हे एक सर्वात गंभीर आव्हान असल्याचे सांगितले. ज्या औषधांनी असंख्य लोकांचे प्राण वाचवले आहेत, त्या औषधांच्या अयोग्य आणि अतिवापरामुळे त्यांची परिणामकारकता हळूहळू कमी होत चालल्याचे त्यांनी नमूद केले. याला आळा घातला न गेल्यास अनेक दशकांमध्ये झालेल्या वैद्यकीय प्रगतीला एएमआरमुळे सुरुंग लागू शकेल, त्यामुळे साध्या संसर्गावर उपचार करणेही कठीण होऊन मानवी आरोग्याला गंभीर धोका निर्माण होईल. असा इशारा त्यांनी दिला.

या वर्षीच्या ‘वन हेल्थ, वन ॲक्शन: प्रिव्हेंट एएमआर नाऊ’ (एक आरोग्य, एक कृती: आताच एएमआरला प्रतिबंध) या संकल्पनेचा उल्लेख करत, श्रीवास्तव यांनी विविध क्षेत्रांनी समन्वयाने कृती करण्याची गरज अधोरेखित केली. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ध्येयाकडे लक्ष वेधत त्यांनी मानवी आरोग्य, प्राण्यांचे आरोग्य, वनस्पती व अन्न प्रणाली तसेच पर्यावरण यांचा परस्परांशी संबंध असल्याचे मान्य करणाऱ्या ‘वन हेल्थ’ (एक आरोग्य) या दृष्टिकोनाचा अवलंब करण्याची गरज अधोरेखित केली. या क्षेत्रांमध्ये अँटीमायक्रोबियल्सचा अयोग्य वापर केल्यामुळे औषध-प्रतिरोधक क्षमता निर्माण होण्याबरोबरच तिचा प्रसार होण्यास मदत होते. त्यामुळे, या वाढत्या धोक्याचा सामना करण्यासाठी समन्वित कृती करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

भारत सरकारने 'अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स' (एएमआर) नियंत्रित करण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले असल्याचे केंद्रीय आरोग्य सचिवांनी अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की नोव्हेंबर 2025 च्या 'जागतिक एएमआर जागरूकता सप्ताहा'दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांच्या हस्ते सादर करण्यात आलेल्या 'नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स 2.0 (नॅप एएमआर 2.0), 2025–2029' द्वारे देखरेख , संसर्ग प्रतिबंध, अँटीमायक्रोबियल औषधांचा जबाबदार वापर, संशोधन आणि विविध क्षेत्रांमधील समन्वित कृतीच्या दृष्टीने सर्वंकष आराखडा सादर केला गेला आहे.
श्रीवास्तव यांनी आरोग्यसेवा व्यावसायिकांच्या भूमिकेवर प्रकाश टाकत, प्रतिजैविके केवळ वैद्यकीयदृष्ट्या आवश्यक असतील तेव्हाच आणि योग्य उपचार मार्गदर्शक तत्त्वांनुसारच लिहून देणे गरजेचे असल्याचे अधोरेखित केले. वैध प्रिस्क्रिप्शननुसार प्रतिजैविकांचे वितरण योग्यरीत्या होईल हे सुनिश्चित करणे तसेच रुग्णांना त्यांच्या योग्य वापराबाबत समुपदेशन करणे ही फार्मासिस्टची जबाबदारी असल्याचेदेखील त्यांनी अधोरेखित केले.

लोकांनी जबाबदार कृतींचा अवलंब करावा असे आवाहन करत, त्यांनी स्वतःहून औषधे घेणे, इतरांसोबत प्रतिजैविके शेअर करणे किंवा उरलेली औषधे वापरणे टाळावे असाही सल्ला दिला. सर्दी आणि इन्फ्लूएंझासारख्या विषाणूजन्य संसर्गांवर प्रतिजैविके प्रभावी ठरत नाहीत याची त्यांनी नागरिकांना आठवण करून दिली. याव्यतिरिक्त, प्रतिजैविकांच्या वापराची गरज कमी व्हावी यासाठी संसर्ग रोखण्याकरिता स्वच्छता, पिण्यास सुरक्षित पाणी, सुरक्षित अन्न आणि लसीकरण या गोष्टीही महत्त्वाच्या असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
***
Shailesh Patil / Sushma Kane / Madhura Nerurkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai