57th International Film Festival of India 2026
20 – 28 Nov 2026

57 व्या इफ्फीमध्ये प्रतिष्ठित 'आयसीएफटी-युनेस्को गांधी पदका'साठी 10 चित्रपटांमध्ये चुरस


डॉ.प्रा.अहमद बेदजाउई यांच्या अध्यक्षतेखालील चार सदस्यीय आंतरराष्ट्रीय परीक्षक मंडळ करणार या चित्रपटांचे परीक्षण

Posted On: 16 NOV 2026 8:30PMby PIB MumbaiRelease ID: 2337180Views: 4

पणजी, 16 नोव्हेंबर 2026

20 ते 28 नोव्हेंबर 2026 दरम्यान गोव्यात होणाऱ्या 57  व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) प्रतिष्ठेच्या ‘आयसीएफटी-युनेस्को गांधी पदका’साठी दहा भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कथापटांमध्ये स्पर्धा रंगणार आहे. महोत्सवाची मध्यवर्ती संकल्पना ‘सीमां पलीकडच्या कथा’ (Stories Without Borders) याला अनुसरून या चित्रपटांची निवड करण्यात आली आहे.

या चित्रपटांमधून शांतता, सहिष्णुता, सहानुभूती, सामाजिक न्याय आणि विविध संस्कृतींमधील संवाद अशा विषयांचा वेध घेण्यात आला आहे.

चार सदस्यीय आंतरराष्ट्रीय परीक्षक मंडळाचे (ज्युरी) अध्यक्षपद अल्जेरियातील विद्यापीठाचे प्राध्यापक, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि समीक्षक प्रा. (डॉ.) अहमद बेदजाउई भूषवणार आहेत. या मंडळात युनेस्कोच्या सांस्कृतिक विभागाच्या माजी कार्यक्रम प्रमुख, अर्जेंटिना आणि फ्रान्सच्या मारिया क्रिस्टिना इग्लेसियस; 'सीआयसीटी-आयसीएफटी'चे  माजी महासंचालक, लक्झेंबर्गचे जॉर्जेस ड्युपॉन्ट; तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले भारतीय चित्रपट निर्माते आणि आयसीएफटीचे सदस्य मनोज कदम  यांचा समावेश आहे.

आंतरराष्ट्रीय चित्रपटांच्या यादीत एमिली अतेफ दिग्दर्शित ‘कॉल मी क्वीन’ या चित्रपटाचा समावेश आहे. 1990 च्या दशकातील नैरोबीच्या पार्श्वभूमीवर आधारित हा जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन आणि केनिया यांची संयुक्त निर्मिती असलेला चित्रपट आहे. एड्सचे निदान झाल्यानंतर सामाजिक अन्यायाचा सामना करणाऱ्या एका एकल मातेला अनपेक्षित मैत्रीतून कसे बळ मिळते, याचे चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे. या चित्रपटाचा भारतातील पहिला सार्वजनिक खेळ इफ्फीमध्ये होणार आहे.

या स्पर्धेत भारताचे तीन चित्रपट सहभागी होत आहेत. सरफराज आलम दिग्दर्शित ‘कबीर सर का आखरी लेसन’ (कबीर सर) या चित्रपटात विनय पाठक यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. तंत्रज्ञानाच्या युगात ज्येष्ठ शिक्षकांना कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागते, याचे चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे. या चित्रपटाचा जागतिक प्रीमियर इफ्फीमध्ये होणार आहे.

कन्नन एस दिग्दर्शित ‘स्क्रोल’ हा चित्रपट स्मार्टफोनच्या वाढत्या व्यसनाधीनतेवर भाष्य करतो. मोबाईलचा वापर नियंत्रित करण्यासाठी एका तरुणाने ॲपवर आधारित गेमचा वापर सुरू केल्यानंतर त्याला आलेले अस्वस्थ करणारे अनुभव या चित्रपटात मांडण्यात आले आहेत.

मुस्कान अस्थाना यांचा पहिलाच चित्रपट ‘सेव मिच्चर’ हा आर्थिक आणि वैयक्तिक अडचणींचा सामना करणाऱ्या एका दुकानदाराची कथा सांगतो. त्यातून कौटुंबिक तणाव, स्पर्धा आणि परस्पर सामंजस्याचे चित्रण करण्यात आले आहे.

जेसिका  जिनिअस  दिग्दर्शित ‘मेरी मॅडालेन’  हा हैती, फ्रान्स, बेल्जियम, लक्झेंबर्ग आणि कॅनडा या देशांची संयुक्त निर्मिती असलेला चित्रपट आहे. एका स्वतंत्र विचारांच्या महिलेचे आणि तरुण धर्मोपदेशकाचे नाते हळूहळू विकसित होत जाते. या नात्याच्या माध्यमातून श्रद्धा, सामाजिक रूढी आणि वैयक्तिक स्वातंत्र्य या विषयांचा वेध चित्रपटात घेण्यात आला आहे.

घाना-अमेरिकन चित्रपट निर्माते अमरतेई आर्मर यांचा ‘अवर टाईम विल कम’  हा चित्रपट दोन अनाथ मुलांची कथा सांगतो. जिवंत असलेल्या आपल्या एकमेव पालकाचा शोध घेण्यासाठी ही दोन्ही मुले अक्रा  येथे प्रवास करतात.

तुर्कीचे चित्रपट निर्माते फैसल सोयसाल यांचा ‘रहमा’ हा चित्रपट एका महिला पुरातत्त्वशास्त्रज्ञाची कथा मांडतो. नऊ वर्षांच्या एका सीरियन अनाथ मुलाशी तिचे अनपेक्षित भावनिक नाते जुळते. या नात्यामुळे तिला मानसिक बळ मिळते आणि जीवनाकडे पाहण्याचा तिचा दृष्टिकोन बदलतो.

लैला माराक्ची दिग्दर्शित ‘स्ट्रॉबेरीज’ (La más dulce) हा चित्रपट दोन मोरोक्कन महिलांची कथा सांगतो. स्पेनमध्ये हंगामी कामगार म्हणून स्ट्रॉबेरी वेचण्याचे काम करताना त्यांना कामाच्या ठिकाणी छळ आणि शोषणाला सामोरे जावे लागते. या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे धैर्य त्या कशा मिळवतात, याचे चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे.

तुर्कीचा आणखी एक चित्रपट या स्पर्धेत सहभागी होत आहे. एलिफ एडा दिग्दर्शित ‘द फार्म’ (Süt Çiftliği) हा चित्रपट 12 वर्षांच्या एका मुलीची कथा सांगतो. दुग्धशाळेत नवजात वासरांना त्यांच्या आईपासून वेगळे केले जात असल्याचे पाहून ती व्यथित होते. गर्भवती गायींची सुटका करण्यासाठी ती एका अनाथ पशुवैद्यकीय प्रशिक्षणार्थीसोबत हातमिळवणी करते.

लू पो-शून दिग्दर्शित ‘विल यू स्टिल बी माय फ्रेंड’ (Ri guang) हा तैवान आणि सिंगापूर यांची संयुक्त निर्मिती असलेला चित्रपट आहे. वेगवेगळ्या सामाजिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीतून आलेल्या 13 वर्षांच्या दोन मुलांमधील मैत्रीची कथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे.

सुषमा काणे/आशुतोष सावे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


Great films resonate through passionate voices. Share your love for cinema with #IFFI2026 and #StoriesWithoutBorders. Tag us @pibindia on Instagram and @PIB_India on X, and we will help amplify your festival moments!

For accredited journalists, critics, bloggers, and vloggers seeking 1-on-1 interviews with filmmakers and festival juries, write to us at:
iffi.mediadesk@pib.gov.in with the subject line: Take One with PIB.


Official Release ID: 2337180
•
Media Centre: Goa
•
Festival Dates: Nov 20 – 28, 2026