सीमाविरहित कथा या संकल्पनेखाली, 57 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी), रशियाला आपला प्रतिष्ठित भागीदार देश म्हणून अभिमानाने सादर करत आहे. 20 ते 28 नोव्हेंबर 2026 दरम्यान गोव्यात होणारा हा महोत्सव, समकालीन रशियन दिग्दर्शकांच्या संवेदनशीलता आणि एका प्रसिद्ध सोव्हिएत संगीत अभिजात कलाकृतीला जोडणाऱ्या खास निवडक चार चित्रपटांचे पॅकेज सादर करून भारत-रशियाच्या चिरस्थायी सांस्कृतिक राजनैतिक संबंधांना अधिक दृढ करत आहे.
उदयोन्मुख दिग्दर्शकीय प्रतिभा आणि एका विडंबनात्मक ऑपेराच्या उत्कृष्ट कलाकृतीला एकत्र आणणारा, ‘भागीदार देश रशिया’ हा विभाग रशियन चित्रपट निर्मितीची भावनिक व्यापकता, शैलीतील धाडस आणि विषयात्मक खोली प्रतिबिंबित करतो. कौटुंबिक दुभंग, सामाजिक परकेपणा आणि वैयक्तिक मुक्तीच्या सखोल अन्वेषणापासून ते शहरी आकांक्षांवरील शोस्ताकोविच-संगीतबद्ध उत्साही व्यंग्यापर्यंत, हे प्रदर्शन महोत्सवातील प्रतिनिधी आणि चित्रपटप्रेमींना मानवी स्थितीचा एक तल्लीन करणारा प्रवास घडवून आणेल.
अनास्तासिया कुझिना यांचा 'बो बो' (98 मिनिटे), जो 57 व्या आयएफएफआयमध्ये भारतात प्रथमच प्रदर्शित होत आहे, हा ओळख, स्वीकार आणि पूर्वग्रह यांबद्दलचा एक हृदयस्पर्शी ग्रामीण नाट्यपट आहे. नादिया, चेहऱ्यावरील रक्तवाहिनीच्या गाठीमुळे (हेमॅन्जिओमा) उपहासाला सामोरे जाणाऱ्या एका लहान मुलीच्या माध्यमातून, हा चित्रपट संगीताच्या माध्यमातून तिचा आत्म-अभिव्यक्तीचा शोध दाखवतो आणि आपल्याला आठवण करून देतो की खरे परिवर्तन बाह्य रूप बदलण्यात नसून सामाजिक पूर्वग्रहांवर मात करण्यात आहे.
राउल गेदारोव्ह यांचा सिडनी लुमेट्स बर्थडे (92 मिनिटे), जो वायबोर्ग राष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील ग्रँड ज्युरी पुरस्काराचा विजेता आहे, इफ्फी 57 मध्ये भारतात प्रथमच प्रदर्शित होत आहे. हा हृदयस्पर्शी कमिंग-ऑफ-एज ड्रामा 17 वर्षीय दातोच्या आयुष्याचा मागोवा घेतो, जो कौटुंबिक तणाव, त्याग आणि क्षमाशीलतेतून मार्ग काढतो, तसेच पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या जखमा भरून काढण्यासाठी आवश्यक असलेल्या लवचिकतेचा शोध घेतो.
न्यू होम
निकिता ग्रुशिनचा न्यू होम (101 मिनिटे), ज्याचा वर्ल्ड प्रीमियर इफ्फी 2026 मध्ये होणार आहे, हा दुसरी संधी आणि उद्धाराबद्दलचा एक हृदयस्पर्शी नाट्य सादर करतो. सात वर्षे तुरुंगात काढल्यानंतर, ॲना सामाजिक सेवा आणि रोमनच्या पाठिंब्याने आपले आयुष्य पुन्हा उभारण्यासाठी संघर्ष करते. दमदार अभिनयाने नटलेला हा चित्रपट, समाजात पुन्हा एकरूप होणे, जखमा भरणे आणि नवीन सुरुवात करण्यासाठी भूतकाळाला सामोरे जाणे यातील आव्हानांचा शोध घेतो.
चेर्योमुश्की
हर्बर्ट रॅपपोर्टचा चेर्योमुश्की (91 मिनिटे), या चित्रपटाचा इंडिया प्रीमियर इफ्फी मध्ये होत असून ही युद्धोत्तर मॉस्कोमध्ये घडणारी एक आनंददायी संगीतमय विडंबनकथा आहे. चांगल्या घरांची स्वप्ने पाहणाऱ्या चार तरुण जोडप्यांवर आधारित हा चित्रपट, आकर्षक गाणी, उत्साही नृत्यदिग्दर्शन आणि विनोद यांचा मिलाफ साधून नोकरशाहीतील भ्रष्टाचार उघड करतो, तसेच सामुदायिक भावना आणि एकजुटीचा गौरव करतो. या विशेष निवडक चित्रपटांच्या माध्यमातून, इफ्फी 2026 भारत आणि रशिया यांच्यातील चिरस्थायी सांस्कृतिक संबंधांना पुन्हा एकदा अधोरेखित करत आहे, तसेच प्रेक्षकांना रशियन सिनेमाची विविधता आणि विकसित होत असलेल्या अभिव्यक्तींशी जोडले जाण्याची संधी देत आहे. चित्रपट निर्मितीच्या विविध शैली आणि पिढ्यांचा समावेश असलेले हे चार चित्रपट, भौगोलिक सीमा ओलांडण्याची आणि सामायिक मानवी अनुभवांद्वारे परस्पर सामंजस्य वाढवण्याची सिनेमाची क्षमता दर्शवतात.
57 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी), जो 20 ते 28 नोव्हेंबर 2026 दरम्यान गोव्यात आयोजित होणार आहे, स्टोरीज विदाऊट बॉर्डर्स या संकल्पनेखाली भारत आणि जगभरातील चित्रपट निर्माते, उद्योग व्यावसायिक आणि चित्रपट रसिकांना एकत्र आणेल. भारतीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटांची वैविध्यपूर्ण मालिका, विशेष देश प्रदर्शन, प्रीमियर, स्पर्धा आणि उद्योग क्षेत्रातील सहभागासह, इफ्फी 2026 चित्रपट क्षेत्रातील उत्कृष्टतेचा गौरव करण्याची आणि सिनेमाच्या माध्यमातून आंतर-सांस्कृतिक देवाणघेवाणीला प्रोत्साहन देण्याची आपली परंपरा पुढे नेत आहे.
***
शैलेश पाटील/राजेश शिरभाते/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com