57th International Film Festival of India 2026
20 – 28 Nov 2026

मल्याळम चित्रपटसृष्टीचा गौरव, ज्येष्ठ अभिनेते प्रेम नझीर यांच्या चित्रपट कारकिर्दीचे स्मरण आणि नव्या पिढीतील दिग्दर्शकांच्या चित्रपटांवर इफ्फी 2026 मध्ये विशेष भर.


सर्वम माया, ओट्टंजावलमारम आणि अजयन्ते मरणम : ओरू केस स्टडी या मल्याळम चित्रपटांचा इफ्फीमध्ये समावेश.

बेसिल जोसेफ आणि के. एस. चित्रा यांचा इफ्फीच्या विशेष संवाद सत्रांमध्ये सहभाग.

Posted On: 15 NOV 2026 2:50PMby PIB MumbaiRelease ID: 2336601Views: 8

सदाबहार रोमँटिक नायक म्हणून ओळखले जाणारे अभिनेते प्रेम नझीर यांचा चित्रपट वारसा, तसेच नव्या पिढीतील चित्रपट दिग्दर्शकांची आधुनिक कथनशैली, यातून मल्याळम चित्रपटसृष्टीची समृद्ध परंपरा आणि विविधता यंदाच्या 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) गोव्यात ठळकपणे अधोरेखित केली जाणार आहे.

मल्याळम चित्रपटप्रेमींसाठी प्रेम नझीर यांच्याशी संबंधित तुलाभारम या चित्रपटाचे विशेष प्रदर्शन हे महोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील नामवंत व्यक्तींच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमांतर्गत हे प्रदर्शन होणार आहे. यामुळे भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासावर अमिट छाप उमटवणारे जुने चित्रपट आणि त्यातील कलाकारांच्या अभिनयाचा अनुभव प्रेक्षकांना पुन्हा एकदा घेता येणार आहे.

समकालीन मल्याळम चित्रपटसृष्टीची झलक अखिल सत्यन दिग्दर्शित सर्वम माया या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. निविन पॉली, अजू वर्गीस, रिया शिबू आणि प्रीती मुकुंदन यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाची निवड भारतीय पॅनोरमा विभागातील फीचर फिल्म श्रेणीत करण्यात आली आहे. श्रद्धा, प्रेम आणि आत्मशोध या विषयांवर आधारित या चित्रपटात प्रभेंदू या नास्तिक संगीतकाराची कथा मांडण्यात आली आहे. एका तरुणीच्या आत्म्याशी त्याची अनोखी मैत्री निर्माण होते आणि त्यातून पुढे घडणाऱ्या घटनांवर या चित्रपटाचे कथानक आधारित आहे.

भारतीय पॅनोरमाच्या न्यू होरायझन विभागात श्रुती शरण्यम दिग्दर्शित ओट्टंजावलमारम (अ लोन जामुन ट्री) आणि श्रीहरी हरिदास दिग्दर्शित अजयन्ते मरणम : ओरू केस स्टडी’ या मल्याळम चित्रपटांचाही समावेश आहे. महोत्सवाच्या बिगर-फीचर फिल्म विभागात संदीप फ्रान्सिस दिग्दर्शित स्विच ऑफ हा 11 मिनिटांचा मल्याळम लघुपट दाखवण्यात येणार आहे. तसेच केरळममधील दिग्दर्शक समजाद यांच्या ‘हाफ’ या चित्रपटाचे प्रदर्शन गाला प्रीमियर विभागात होणार आहे. या सर्व चित्रपटांच्या निवडीतून मल्याळम चित्रपटसृष्टीतील विषयांची विविधता आणि कथाकथनाच्या वेगवेगळ्या शैलींचे दर्शन घडणार आहे.

महोत्सवात मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार आणि मान्यवरांचाही विशेष सहभाग असणार आहे. चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते बेसिल जोसेफ हे द एपिक जॉनर्स- मायथॉलॉजीज, सुपरहिरोज अँड न्यू वर्ल्ड्स या विषयावरील विशेष संवाद सत्रात सहभागी होणार आहेत. या सत्रात पौराणिक कथा, सुपरहिरो आणि नव्या काल्पनिक जगांवर आधारित चित्रपटांची बदलती शैली आणि त्यातील कथांची मांडणी यावर चर्चा होणार आहे.

प्रसिद्ध पार्श्वगायिका आणि मेलडी क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या के. एस. चित्रा या ज्येष्ठ गायिका आशा भोसले आणि एस. जानकी यांना आदरांजली वाहणाऱ्या विशेष स्मरण सत्रात सहभागी होणार आहेत.

सीमांच्या पलीकडील कथा ही संकल्पना घेऊन 57 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) येत्या 20 ते 28 नोव्हेंबर 2026 या कालावधीत गोव्यात आयोजित करण्यात येणार आहे. या महोत्सवात भारतासह जगभरातील चित्रपट, चित्रपट निर्माते आणि चित्रपटप्रेमी एकाच व्यासपीठावर येणार आहेत. या माध्यमातून विविध देशांमधील संस्कृतींची देवाणघेवाण होण्याबरोबरच चित्रपटांच्या वैश्विक भाषेचा उत्सव साजरा केला जाणार आहे.

***

शैलेश पाटील/राज दळेकर/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


Great films resonate through passionate voices. Share your love for cinema with #IFFI2026 and #StoriesWithoutBorders. Tag us @pibindia on Instagram and @PIB_India on X, and we will help amplify your festival moments!

For accredited journalists, critics, bloggers, and vloggers seeking 1-on-1 interviews with filmmakers and festival juries, write to us at:
iffi.mediadesk@pib.gov.in with the subject line: Take One with PIB.


Official Release ID: 2336601
•
Media Centre: Goa
•
Festival Dates: Nov 20 – 28, 2026