57 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होणाऱ्या चित्रपटप्रेमींसाठी एक विशेष पर्वणी असणार आहे, कारण हा महोत्सव स्पॅनिश चित्रपटसृष्टीतील समृद्धता आणि विविधता साजरा करणार आहे. स्पेनला कंट्री ऑफ ऑनर म्हणून स्थान देण्यात आले असून, या महोत्सवात चार निवडक समकालीन स्पॅनिश चित्रपटांचे सादरीकरण केले जाणार आहे. यामध्ये जागतिक, आशियायी आणि भारतीय स्तरावरील प्रीमियरचा समावेश असेल. हे चित्रपट प्रेक्षकांना समकालीन स्पॅनिश चित्रपटसृष्टीतील चैतन्य, सर्जनशीलता आणि विकसित होत असलेल्या कथाकथन शैलीची एक प्रभावी झलक दाखवेल.
यावर्षी इफ्फी मध्ये सादर होणाऱ्या स्पॅनिश चित्रपटांची यादी खालीलप्रमाणे आहे:
बिटर ख्रिसमस (अमारगा नाविदाद)
दोन ऑस्कर पुरस्कारांचे विजेते चित्रपट निर्माते पेड्रो अल्मोडोवर यांचा 2026 मधील हा चित्रपट, चित्रपट निर्मितीमध्ये वैयक्तिक अनुभव आणि वास्तविक घटनांचा वापर करण्यातील धोक्यांवर प्रकाश टाकतो. एक प्रामाणिक कथा शोधण्याच्या प्रयत्नात, चित्रपट दिग्दर्शक एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील किती गोष्टी उघड करू शकतो, असा प्रश्न हा चित्रपट उपस्थित करतो. कथेच्या केंद्रस्थानी राऊल नावाचा एक प्रसिद्ध, विशेष चित्रपट निर्माता आहे, जो आपल्या पुढच्या चित्रपटासाठी कल्पना शोधण्यासाठी संघर्ष करत आहे. पुढे, तो स्वतःच्या आयुष्यातील एका शोकांतिकेचा वापर नवीन पटकथेसाठी प्रेरणा म्हणून करतो.
हा चित्रपट यावर्षी कान, टोरंटो आणि सॅन सेबास्टियन सारख्या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवांमध्ये प्रदर्शित झाला असून, आता तो इफ्फी मध्ये भारतीय प्रीमियरसाठी सज्ज आहे.

लुकिंग फॉर मायकेल (पेरसिंगेंनडो मायकल)
जुआना मॅसियास दिग्दर्शित 2026 मधील हा चित्रपट पार्किन्सन आजाराने ग्रस्त एका तरुण स्त्रीची कथा सांगतो. आयुष्यात आलेल्या या दुःखासमोर हार न मानता, ती धैर्याने आपले आयुष्य वेगळ्या पद्धतीने जगण्याचा निर्णय घेते. तिच्या म्युझिक थेरपी गटातील सदस्यांच्या—ज्यांना स्वतःलाही हाच आजार आहे त्यांच्या पाठिंब्याने, ती प्रसिद्ध अभिनेता मायकेल जे. फॉक्स यांना भेटण्यासाठी प्रवास सुरू करते, जे स्वतः पार्किन्सन आजारासह जगत आहेत. हा कॉमेडी ड्रामा प्रकारातील चित्रपट इफ्फी 2026 मध्ये जागतिक प्रीमियरसाठी सज्ज आहे.

द बॅड सन (एल माल हिजो)
स्पॅनिश अभिनेता-दिग्दर्शक जेमी लोरेंते यांचा दिग्दर्शकीय पदार्पणाचा चित्रपट एल माल हिजो इफ्फी 2026 मध्ये आशिया प्रीमियर करणार आहे. हा चित्रपट पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या आघाताचे आणि कौटुंबिक संबंधांचे एक हृदयस्पर्शी चित्रण आहे. यापूर्वी सॅन सेबॅस्टियन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात, वयाच्या 11 व्या वर्षी वडिलांनी सोडून दिलेल्या एका मुलाची कथा आहे, जो आपल्या आजीकडे राहायला जातो, जिला तो फारसा ओळखतही नाही. वेदनादायक आठवणींना सामोरे जाताना आणि आपल्या कुटुंबाच्या त्रासदायक भूतकाळाचा उलगडा करताना, तो पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या भावनिक जखमांचे चक्र तोडण्याचा प्रयत्न करतो.

त्रिनिदाद
लॉरा अल्वेआ आणि होसे ओर्टुनो दिग्दर्शित, 2025 मध्ये प्रदर्शित होणारा त्रिनिदाद हा चित्रपट 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात वाइल्ड वेस्टमध्ये पळून जाणाऱ्या एका तरुण स्पॅनिश महिलेच्या साहसांचे चित्रण करतो. एका गुन्ह्याचा खोटा आरोप झाल्यावर, ती महिला दरोडेखोरांच्या एका टोळीत सामील होते आणि अॅक्शन, धोका व सूडाने भरलेल्या एका साहसी प्रवासाला निघते. या अॅक्शन चित्रपटाचा जागतिक प्रिमियर इफ्फी 2026 मध्ये होणार आहे.

***
शैलेश पाटील/राजेश शिरभाते/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com