लोकसभा सचिवालय
azadi ka amrit mahotsav

बंगळुरू येथे राष्ट्रकुल महिला संसदपटूंच्या भारत क्षेत्राच्या परिषदेचे  लोकसभा अध्यक्ष  उद्घाटन करणार

Posted On: 15 NOV 2026 2:16PM by PIB Mumbai

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हे मंगळवार, 17 नोव्हेंबर 2026 रोजी कर्नाटकमधील बंगळुरू येथील विधान सौध येथे राष्ट्रकुल महिला संसदपटूंच्या (सीडब्ल्यूपी) भारत क्षेत्राच्या परिषदेचे उद्घाटन करणार आहेत.

या दोन दिवसीय परिषदेची संकल्पना 'मजबूत पाया, अधिक बुलंद आवाज: नवीन महिला आमदारांसाठी सर्वसमावेशक सायबरस्पेस आणि मार्गदर्शनाचे मार्ग' अशी आहे. या परिषदेदरम्यान दोन पूर्ण सत्रे आयोजित केली जातील. 'महिलांचे डिजिटल सक्षमीकरण: सुरक्षित सायबरस्पेस, सूज्ञ निवड' या विषयावरील पहिले सत्र 17 नोव्हेंबर 2026 रोजी होईल आणि डिजिटल क्षेत्रात महिलांना सुरक्षितपणे व प्रभावीपणे सहभागी होण्यास सक्षम करण्यावर यात भर दिला जाईल. 'महिला आमदारांसाठी क्षमता बांधणी आणि मार्गदर्शन' या विषयावरील दुसरे सत्र 18 नोव्हेंबर 2026 रोजी आयोजित केले जाईल. यामध्ये विशेषतः विधिमंडळ संस्थांमध्ये नव्याने प्रवेश करणाऱ्या महिला आमदारांच्या विधिमंडळ क्षमता बळकट करण्याचे आणि त्यांना पाठिंबा देण्याचे मार्ग शोधले जातील. व्यापक विचारमंथनाला पूरक असा एक विशेष उपक्रम म्हणून, संयुक्त राष्ट्र महिला विभाग, भारत 17 नोव्हेंबर 2026 रोजी रजोनिवृत्ती या विषयावर एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे. डिजिटल सक्षमीकरण, क्षमता बांधणी आणि मार्गदर्शनाद्वारे महिला आमदारांचा सहभाग आणि नेतृत्व बळकट करण्यासाठी अनुभव सामायिक करणे, सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण करणे आणि मार्ग शोधणे, यासाठी हे विचारमंथन एक महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध करून देईल. हा कार्यक्रम जागरूकता वाढवण्यासाठी, माहितीपूर्ण संवादाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि जीवनाच्या विविध टप्प्यांवर महिलांचे आरोग्य, कल्याण आणि सन्मान याकडे अधिक लक्ष वेधण्यासाठी एक महत्त्वाचा विचारमंच प्रदान करेल.

बुधवार, 18 नोव्हेंबर 2026 रोजी कर्नाटकच्या राज्यपाल डॉ. सुधा यादव यांच्या समारोपाच्या भाषणाने या परिषदेची सांगता होईल. कर्नाटकचे मुख्यमंत्री, राज्यसभेचे उपसभापती आणि कर्नाटक विधान परिषदेचे सभापती हे देखील या सत्राला संबोधित करतील. राष्ट्रकुल महिला संसदपटू भारत क्षेत्राच्या अध्यक्षा या परिषदेच्या निष्कर्षाबाबत निवेदन सादर करतील.

लोकशाही संस्था बळकट करण्यात महिलांची अपरिहार्य भूमिका अधोरेखित करणारे संवाद, सहकार्य आणि सामूहिक चिंतनाचा एक चैतन्यमय विचारमंच म्हणून या परिषदेची संकल्पना मांडण्यात आली आहे. डिजिटल समावेशकता, विधिमंडळ क्षमता आणि आंतरपिढी मार्गदर्शनावरील विचारमंथनाद्वारे, महिला आमदारांना त्यांचा आवाज अधिक बुलंद करता येईल, संसदीय चर्चा समृद्ध करता येईल आणि लोकशाही प्रशासनाच्या भविष्यात अर्थपूर्ण योगदान देता येईल असे अधिक सक्षम आणि पोषक वातावरण निर्माण करण्याचा या परिषदेचा प्रयत्न आहे.

***

शैलेश पाटील/नितीन गायकवाड/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2336530) अभ्यागत कक्ष : 9