Posted On:
15 NOV 2026 1:49PM by PIB Mumbai
भारतीय हवाई दलाच्या 13 व्या बेस रिपेअर डेपोने आपल्या गौरवशाली सेवेची 50 वर्षे पूर्ण केली. यानिमित्त नवी दिल्लीतील माणेकशॉ सेंटर येथे हवाई संरक्षण 2040 : सेन्सर्स, नेटवर्क्स आणि स्वदेशी देखभाल क्षमता या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले.
देखभाल कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ एअर मार्शल यल्ला उमेश यांच्या अध्यक्षतेखाली हे चर्चासत्र पार पडले. या चर्चासत्राला वरिष्ठ लष्करी अधिकारी, माजी सैनिक, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डीआरडीओचे प्रतिनिधी, शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ आणि संरक्षण उद्योगातील आघाडीच्या भागीदारांनी उपस्थिती लावली.
1976 मध्ये स्थापन झालेला हा बेस रिपेअर डेपो भारतीय हवाई दलाच्या देखभाल व्यवस्थेतील एक महत्त्वाचा आधारस्तंभ ठरला आहे. या डेपोकडून महत्त्वाच्या रडार आणि दळणवळण उपकरणांची दुरुस्ती, सर्वंकष तांत्रिक देखभाल तसेच त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात आवश्यक तांत्रिक सहाय्य पुरविण्याचे काम केले जाते.
रडार अँड कम्युनिकेशन प्रोजेक्ट ऑफिसपासून या डेपोची सुरुवात झाली. गेल्या पाच दशकांमध्ये हवाई संरक्षण यंत्रणेतील महत्त्वाच्या प्रणालींची कार्यसज्जता आणि विश्वासार्हता कायम राखण्यात या डेपोने मोलाचे योगदान दिले आहे.
स्वागतपर भाषणात डेपोचे एअर ऑफिसर कमांडिंग यांनी डेपोच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा घेतला. तसेच, माजी कर्मचाऱ्यांच्या योगदानाची दखल घेतली. हवाई संरक्षण क्षेत्रातील 2040 सालच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्वदेशी अभियांत्रिकी आणि औद्योगिक क्षमता विकसित करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.
हवाई संरक्षण यंत्रणेची खरी परिणामकारकता ही तिच्या कार्यसज्जतेवर अवलंबून असते. संरक्षण उपकरणांची देखभाल आणि दुरुस्तीची व्यवस्था ही उपकरणांच्या रचनेपासूनच आणि त्यांच्या हवाई दलातील समावेशापासूनच महत्त्वाचा भाग असली पाहिजे, असे भारतीय हवाई दलाच्या देखभाल कमांडचे प्रमुख एअर मार्शल यल्ला उमेश यांनी स्पष्ट केले. स्वदेशी देखभाल क्षमतेचा अर्थ म्हणजे अत्याधुनिक संरक्षण यंत्रणांमधील दोषांचे निदान करणे, त्यांची दुरुस्ती करणे आणि त्यांना पुन्हा कार्यरत करण्याची क्षमता देशांतर्गत विकसित करणे,
तसेच, संरक्षण क्षेत्रातील उद्योग भागीदारांनी स्वदेशी चाचणी, दुरुस्ती आणि उपकरणांच्या संपूर्ण कार्यकाळात देखभाल व तांत्रिक सहाय्य पुरविण्याची क्षमता असलेली उपकरणे विकसित करावीत, असे आवाहन त्यांनी केले. संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेच्या संकल्पनेला यामुळे अधिक बळकटी मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.
या चर्चासत्रात क्वांटम सेन्सिंग, उपकरणांचे संपूर्ण कार्यकाळातील व्यवस्थापन, हवाई संरक्षणासाठी वापरण्यात येणाऱ्या रडारचे आधुनिकीकरण आणि परस्परांशी जोडलेल्या यंत्रणांच्या माध्यमातून हवाई संरक्षण अधिक सक्षम करण्याबाबत तज्ज्ञांनी विचारमंथन केले. रडार यंत्रणेच्या शाश्वत वापराच्या दृष्टीने या चर्चासत्रात एक महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला. राष्ट्रीय हरित हायड्रोजन अभियान आणि एनटीपीसी यांच्या सहकार्याने भारतीय हवाई दलाच्या रडार यंत्रणांना वीजपुरवठा करण्यासाठी हायड्रोजन इंधन सेल तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी घेण्यात आली.
स्वच्छ ऊर्जेच्या वापरामुळे हवाई संरक्षण यंत्रणा अधिक सक्षमपणे कार्यरत ठेवणे, ऊर्जेसाठी इतर स्रोतांवरील अवलंबित्व कमी करणे आणि या यंत्रणांचा पर्यावरणपूरक पद्धतीने वापर करणे शक्य होणार आहे. विशेषतः आव्हानात्मक परिस्थितीत हवाई संरक्षण यंत्रणा कार्यरत ठेवण्यासाठी या तंत्रज्ञानाची मदत होऊ शकते.
_20261115135045_d35e9f.jpg)
_20261115135058_020e98.jpg)
_20261115135109_61491b.jpg)
_20261115135123_8c68d5.jpg)
***
शैलेश पाटील/राज दळेकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com