Posted On:
14 NOV 2026 9:06PM by PIB Mumbai
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह हे उद्या म्हणजेच रविवार, दि. 15 नोव्हेंबर 2026 रोजी महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे इथे आयोजित कार्यक्रमात एनएचईसी म्हणजेच राष्ट्रीय अवजड अभियांत्रिकी सहकारी लिमिटेडच्या बहुराज्यीय सहकारी संस्थेचे भूमिपूजन करणार आहेत. हे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेला सहकार से समृद्धी हा दृष्टिकोन प्रत्यक्षात साकार करण्याच्या दिशेचे, तसेच देशातील सहकार चळवळीला अधिक बळकट, आधुनिक आणि सर्वसमावेशक बनवण्याच्या दिशेचे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. यावेळी अमित शाह यांच्या हस्ते केंद्रीय सहकारी संस्था निबंधकांच्या (CRCS - Central Registrar of Cooperative Societies) पश्चिम विभागीय कार्यालयाचे उद्घाटनही होणार आहे. यासोबतच पुण्यासाठी भारत टॅक्सी या सेवेचा शुभारंभही त्यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सहकार मंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली, सहकार मंत्रालय सहकारी संस्थांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी, त्यांच्या कामकाजात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवण्यासाठी, सहकारावर आधारित उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि सहकार क्षेत्रात नवीन आर्थिक संधी निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. पुण्यातील हा कार्यक्रम या उपक्रमांना पुढे नेण्याच्या दिशेने टाकलेले आणखी एक महत्त्वाचे पाऊल ठरेल.
केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह एनएचईसी मल्टि-स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे भूमिपूजन करून या उपक्रमाची सुरुवात करतील. एनएचईसी मल्टि-स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी प्रकल्पाचा पायाभरणी समारंभ हा सहकाराच्या माध्यमातून औद्योगिक आणि आर्थिक उपक्रम विस्तारण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या प्रसंगी, एनएचईसी आणि आयडीएमसी लिमिटेड यांच्यात लेटर ऑफ इंटेन्ट म्हणजेच इरादापत्राची देवाणघेवाणही केली जाईल. या उपक्रमामुळे संस्थात्मक सहकार्याला चालना मिळेल आणि सहकार क्षेत्रात नवीन संधी उपलब्ध होतील, अशी अपेक्षा आहे.
या कार्यक्रमात अमित शहा यांच्या हस्ते 'सेंट्रल रजिस्ट्रार ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज' (सीआरसीएस) च्या पश्चिम प्रादेशिक कार्यालयाचे दूरदृष्य प्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात येईल. हा उपक्रम बहु-राज्य सहकारी संस्थांसाठी प्रशासकीय आणि नियामक सेवा प्रादेशिक स्तरावर अधिक सुलभ करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असून सहकारी संस्थांच्या कामकाजात सुलभता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्वास यामुळे प्रोत्साहन मिळेल.
याच कार्यक्रमात, केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री महाराष्ट्रातील पुणे शहरासाठी 'भारत टॅक्सी' सेवांचा प्रारंभ करतील. सहकारी तत्त्वावर आधारित वाहतूक सेवांचा विस्तार करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेला हा उपक्रम, 'सारथ्यांच्या' (चालक-भागीदार) अधिक सहभागाला प्रोत्साहन देण्याबरोबरच आणि वाहतूक क्षेत्रात सहकारी प्रारुपाच्या (मॉडेल) अंमलबजावणीस अधिक बळ देईल. या कार्यक्रमात, चार 'भारत टॅक्सी' सारथींना भाग प्रमाणपत्रे (शेअर सर्टिफिकिट्स) प्रदान करण्यात येणार असून यामुळे 'सदस्य सहभाग' आणि 'मालकी हक्क' ही सहकारी मॉडेलच्या केंद्रस्थानी असलेली तत्त्वे अधोरेखित होतील.
पुण्यात होणारा हा कार्यक्रम सहकारी संस्थांना बळकटी देण्याच्या, सहकारावर आधारित उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याच्या आणि नवीन आर्थिक उपक्रमांचा विस्तार करण्याच्या दिशेने करण्यात येत असलेल्या उपायांमधील लक्षणीय पाऊल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘सहकार से समृद्धी’ ही मार्गदर्शक संकल्पना आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली, सहकार मंत्रालय देशभरातील सहकारी संस्थांना अधिक सक्षम, स्पर्धात्मक आणि लोककेंद्री बनवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे.
***
राधिका अघोर/आशिष सांगळे/तुषार पवार/राजेश शिरभाते/मंजिरी गानू/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com