Posted On:
12 NOV 2026 8:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर 2026
क्षयरोग (टीबी) निर्मूलनाच्या लढ्यात भारताने महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. 2015 सालापासून देशात क्षयरोगामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या प्रमाणात 38 टक्के घट झाली आहे. याच काळात जागतिक स्तरावर मृत्यूंचे प्रमाण 35 टक्क्यांनी कमी झाले आहे. तसेच औषधांना प्रतिसाद देणाऱ्या क्षयरुग्णांच्या उपचारांचा यशदर 94 टक्के इतका आहे. जागतिक आरोग्य संघटनेने 12 नोव्हेंबर 2026 रोजी प्रसिद्ध केलेल्या ‘जागतिक क्षयरोग अहवाल 2026’ मध्ये या प्रगतीची नोंद करण्यात आली आहे. लवकर निदान, वेळेवर उपचार, तंत्रज्ञानाचा वापर आणि रुग्णांची सर्वंकष काळजी या माध्यमातून क्षयरोग निर्मूलनाच्या दिशेने भारत सातत्याने पुढे जात असल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट होते.
क्षयरोगामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये झालेली घट ही या आजारामुळे होणारे मृत्यू रोखण्यात भारताला मिळालेल्या यशाचे द्योतक आहे. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत (NTEP) राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांमुळे ही प्रगती साध्य झाली आहे. यामध्ये एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने एक्स-रे तपासणी, सक्रियपणे रुग्ण शोधणे, जलद निदान चाचण्या, वेळेवर उपचार सुरू करणे, रुग्णांच्या गरजेनुसार उपचार आणि ‘निक्षय पोषण योजना’ तसेच ‘निक्षय मित्र’ उपक्रमांतर्गत पोषणासाठी मदत यांचा समावेश आहे. याशिवाय क्षयरोगाचे हॉटस्पॉट ओळखणे, गंभीर गुंतागुंत होण्याचा धोका असलेल्या रुग्णांचा आधीच अंदाज घेणे यासाठी एआय आधारित साधनांचा वापर करण्यात आला आहे. ‘खुशी’ एआय चॅटबॉट आणि अवतार व्हिडिओबॉट यांसारखी साधनेही या कामात मदत करत आहेत.
क्षयरोग उपचारांचा 94 टक्के यशदर हा रुग्णकेंद्रित दृष्टिकोन, अधिक प्रभावी उपचार व्यवस्था आणि क्षयरोगग्रस्तांना सातत्याने मिळणारा आधार यांचे महत्त्व अधोरेखित करतो.
क्षयरोग निर्मूलनासाठी आवश्यक असलेल्या एकूण निधीपैकी 96 टक्के निधी देशांतर्गत स्रोतांमधून उपलब्ध होत आहे. यातून या मोहिमेसाठी देशाची सातत्यपूर्ण आर्थिक गुंतवणूक, राजकीय बांधिलकी तसेच सरकार आणि समाजाच्या एकत्रित सहभागातून काम करण्याची भूमिका स्पष्ट होते.
‘निक्षय मित्र’ उपक्रमाच्या माध्यमातून नागरिक आणि विविध संस्थांना क्षयरोगावरील उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या आरोग्यसुधारणा आणि कल्याणासाठी थेट मदत करण्याची संधी मिळत आहे. यामुळे क्षयरोग निर्मूलनाच्या मोहिमेत सामूहिक जबाबदारीची भावना अधिक बळकट होत आहे.
या प्रयत्नांना पुढे नेत ‘JOSH Teams’ या उपक्रमातून क्षयरोग निर्मूलनाच्या मोहिमेत युवकांचा सहभाग वाढविण्यात येत आहे. तालुका आणि प्रभाग स्तरावर या पथकांची स्थापना केली जात आहे. प्रथम श्रेणीतील नियुक्त अधिकारी या पथकांचे नेतृत्व करणार असून, त्यांना राष्ट्रीय छात्र सेना (NCC) चे पाच छात्र आणि ‘माय भारत’चे पाच स्वयंसेवक सहकार्य करणार आहेत.
जनजागृती, समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचणे आणि लोकसहभाग वाढविणे या माध्यमातून ‘JOSH Teams’ तळागाळातील सहभाग अधिक मजबूत करत असून, क्षयरोगमुक्त भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योगदान देत आहेत.
क्षयरोगामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये 38 टक्के घट, उपचारांचा 94 टक्के यशदर आणि ‘टीबी मुक्त भारत अभियानांतर्गत’ मोठ्या प्रमाणावर करण्यात येणाऱ्या तपासण्या या भारताच्या क्षयरोग निर्मूलनाच्या प्रवासातील महत्त्वपूर्ण घटक ठरत आहेत.
* * *
माधुरी पांगे/वैभवी जोशी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai