Posted On:
12 NOV 2026 5:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर 2026
आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करी टोळ्यांविरुद्धच्या एका मोठ्या कारवाईत महसूल गुप्तचर संचालनायाने, सिएरा लिओनवरून आलेल्या एका परदेशी महिलेला पकडले असून तिच्याकडून 22 किलो वजनाचे कोकेन जप्त केले आहे. आंतरराष्ट्रीय अवैध बाजारात या अंमली पदार्थांची किंमत अनेक कोटी रुपये असल्याचे मानले जात आहे. या कारवाईतून एक अत्यंत धूर्त आणि धाडसी पद्धत उघड झाली आहे, ज्यामध्ये विमानतळावरील सुरक्षा तपासणी टाळण्यासाठी बनावट राजकीय ओळखपत्रांचा वापर केला जात होता.

संबंधित महिला, आपण एक राजकीय कुरियर असल्याचा दावा करत होती. तिच्याकडे एक मोठी ब्रीफकेससदृश पेटी होती, ज्यावर डिप्लोमॅटिक मेल आणि अधिकृत परवानगीशिवाय उघडू नये, अशा आशयाचे मजकूर लिहिलेले होते. तपासणी टाळण्यासाठी तिने काही बनावट कागदपत्रेही सादर केली, ज्यामध्ये हा माल संयुक्त राष्ट्रांच्या एका राजकीय कुरियरचा असल्याचे नमूद केले होते.
प्राप्त गुप्त माहितीच्या आधारे, डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी नियमांनुसार त्या ब्रीफकेसची कसून तपासणी केली. या तपासणीदरम्यान, प्लास्टिकच्या अनेक थरांमध्ये लपवून ठेवलेली 22 पाकिटे सापडली. या पाकिटांमध्ये पांढऱ्या रंगाचे, विटेच्या आकाराचे पदार्थ होते; प्राथमिक चाचणीत हे पदार्थ कोकेन असल्याचे निष्पन्न झाले.

कोकेनची ही 22 पाकिटे नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रोपिक सबस्टन्सेस ॲक्ट, 1985 अंतर्गत जप्त करण्यात आली आहेत. संबंधित महिलेलाही याच कायद्यान्वये अटक करून सक्षम न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
अंमली पदार्थांच्या तस्करीचे नवीन मार्ग शोधून काढणे, गुप्त माहितीच्या आधारे कठोर अंमलबजावणी करणे आणि संस्थात्मक विशेषाधिकारांचा गैरवापर करून अवैध व्यापार करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळ्यांचा पर्दाफाश करण्यासाठी डीआरआय पूर्णपणे कटिबद्ध आहे.
* * *
माधुरी पांगे/राजेश शिरभाते/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai